‘आज १ मे. महाराष्ट्रदिन आहेच. शिवाय पाऊस सुरू होण्यास अजून किमान महिना बाकी आहे, हे सांगणाराही हा दिवस. आणि आजच्या घडीला आपल्या राज्यातील जलाशयांतील पाणीसाठा आहे २९ टक्के. पाऊस लांबला तर कसं होणार? पाणी कसं पुरणार? पुन्हा एकदा दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागणार?’  ‘जाऊं द्या ना. कुठल्या नको त्या प्रश्नांची उत्तरं शोधत बसलायत. एका महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं का?’ ‘कुठल्या?’

‘कटप्पानं बाहुबलीला का मारलं?’ ‘अहो.. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा प्रश्न केवढा गंभीर होतोय. रोज शेतकरी आत्महत्येची एखादी तरी बातमी असतेच असते पेपरात. कर्जाच्या सापळ्यात अडकलाय शेतकरी. मध्यंतरी शीतल वायाळ नावाच्या एका शेतकऱ्याच्या मुलीनं आत्महत्या केली घरच्या आर्थिक हलाखीला त्रासून. हे कसं थांबवायचं?’

‘जाऊं द्या ना. उगाच डोक्याला त्रास करून घेऊ नका असल्या प्रश्नांचा. ते राहू देत तसेच. तुम्ही एकाच प्रश्नाचं उत्तर शोधा बघू. कटप्पानं बाहुबलीला का मारलं?’ ‘अहो, त्या तुरीच्या खरेदीचा प्रश्न केवढा गंभीर झालाय. शेतकऱ्यांनी तुरीचं बक्कळ पीक घेऊन ठेवलं आणि सरकार विकत घेईना झालंय ते. त्या शेतकऱ्यांच्या हाती पैसा कसा लागणार? ते कसे जगणार? काय खाणार?’

‘ते बघतील हो काय खायचं ते. काहीच नाही तर तूर खातील. ह्य़ॅ ह्य़ॅ ह्य़ॅ.. तुम्ही असले प्रश्न ऑप्शनला टाका आणि कटप्पानं बाहुबलीला का मारलं, या प्रश्नाचं उत्तर आधी द्या.’

‘आपल्या विदर्भाला लागून असलेल्या छत्तीसगडमध्ये परवा त्या नक्षलवाद्यांनी केवढा मोठा हल्ला केला जवानांवर. २५ जवान मुकले प्राणांना. कसे थांबणार हे हल्ले? त्या नक्षलींना हवंय तरी काय? सरकारकडे काही उत्तर नाही का या समस्येवर?’

‘ते सरकार बघून घेईल हो नक्षलीबिक्षली. त्याची चिंता तुम्ही करू नका. तुम्ही फक्त इतकंच सांगा की कटप्पानं बाहुबलीला का मारलं ते कळलं का तुम्हाला?’

‘महाराष्ट्र राहू दे. छत्तीसगडही राहू दे. पण तिकडे आपल्या काश्मीरमध्ये काय गंभीर परिस्थिती आहे. रोजची दगडफेक. रोजचा गोळीबार. रोजचे दहशतवादी हल्ले. फारच वाईट स्थिती आहे तिकडची. हा वणवा कसा शमवणार? कधी या समस्येचं उत्तर मिळणार?’ ‘कुठली समस्या म्हणताय? काश्मीरची. ती जाऊं द्या ना. ते सरकार काय ते ठरवेल. त्याची चिंता तुम्ही नका करू. ती चिंता करण्यासाठी आपण सरकारं निवडून दिली आहेत. मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं का?’ ‘कुठल्या?’

‘तोच तो. कटप्पानं बाहुबलीला का मारलं? अहो असे कानावर हात का ठेवताय? तसं केलंत तरी मी माझा प्रश्न विचारणं सोडणार नाही. मी विचारत राहणार. प्रश्न विचारणं हा लोकशाहीनं दिलेला हक्क आहे. तो आम्ही बजावणारच. मी प्रश्न विचारत राहणारच. कटप्पानं बाहुबलीला का मारलं? कटप्पानं बाहुबलीला का मारलं? कटप्पानं..’