‘सरयू तीरावरी अयोध्या मनुनिर्मित नगरी..’ अहाहा! गदिमांनी काय अप्रतिम वर्णन केले आहे त्या नगरीचे! ते म्हणतात – ‘त्या नगरीच्या विशालतेवर, उभ्या राहिल्या वास्तू सुंदर, मधून वाहती मार्ग समांतर, रथ, वाजी, गज, पथिक चालती, नटुनी त्यांच्यावरी..’ या काव्यपंक्ती ऐकल्या नि वाटले, गदिमा हे केवळ महाकवीच नव्हते, तर ते द्रष्टे महाकवी होते. वाल्मीकींच्या रामायणास आधार घेऊन गीतरचना करणे हे तुलनेने सोपे. परंतु योगीजींच्या रामलीलेची आधीच कल्पना करून त्यावर लिहिणे हे शिवधनुष्य पेलण्यासारखेच. गदिमांनी ते नक्कीच पेलले. कोणी काहीही म्हणो, त्यांनी हे गीत रचले ते सरयू तीरावर बुधवासरी झालेल्या त्या स्वर्गीय सोहळ्यास अनुलक्षूनच. तो सोहळा याचि देही याचि डोळा च्यानेलांवरून पाहिला आणि चर्मचक्षूंचे पारणेच फिटले. वाटले, रामराज्य म्हणतात ते आणखी का वेगळे असते? इक्ष्वाकुवंशीयांची ती राजधानी. बारा योजने लांब, तीन योजने रुंद. रोज प्रातकाली जिच्या मार्गावर पुष्पे अंथरली जात. जल शिंपडले जाई. ती आज नसेल का योगीजींची राजधानी, ते रस्ते असतील धुळीने माखलेले खड्डेयुक्त. ती सरयू झाली असेल मैली. परंतु योगीजींमुळे तीच नगरी इंद्राच्या अमरावतीहून अधिक स्वर्गीय झाली आहे. किती छान देखावे रचले होते तेथे योगीजींनी. आजकाल राम तर कशातच राहिलेला नाही. परंतु त्यांनी नाटकातील राम, सीता, लक्ष्मणास तेथे पुष्पक हेलिकॉप्टरातून आणले. लक्षलक्ष दिवे लावले. अचंबाच वाटतो. कसे सुचले असेल ना त्यांना हे सारे? त्याकरिता प्रतिभाच हवी हो. एका निषादाने क्रौंच पक्ष्यांच्या जोडीतील एकाची हत्या केली. ते पाहून संतापलेल्या वाल्मीकींच्या मुखातून पंक्ती निघाल्या. मा निषाद प्रतिष्ठां त्वमगम.. हे निषादा, क्रौंचाची हत्या केलीस तू. आता तुला अनंत वर्षांपर्यंत प्रतिष्ठा प्राप्त होणार नाही. यातून श्लोक छंद निर्माण झाला आणि त्यातून रामायण. योगीजींनाही अशाच प्रकारे ‘बालकाण्डा’तून स्फूर्ती मिळाली असेल का? नक्कीच. त्यातूनच त्यांचे हे योगी रामायण अवतरले. कलियुगातील चमत्कारच तो. नतद्रष्टांस तो दिसणार नाही. त्यांस केवळ हिंदूंवर टीकाच करता येते. पण श्रद्धावानांना नक्कीच तो चमत्कार, ते रामराज्य, त्यातील ते सुखी नगरजन, त्यांची आनंदी घरे, त्यातून किलकिलणारी बालके, सरयूच्या लाटांवरून विहरत येणारा तो प्राणवायू हे सारे सारे दिसेल. अगदी ‘वहीं’ बनलेले मंदिरही दिसेल. या दिसण्यातच खरे रामराज्य असते. बाकी मग सारी मोहमायाच. त्याची हाव न धरणे हेच उत्तम. प्रगती, विकास हे सारे भौतिक छंद. तमोगुणी गोष्टी त्या. त्या मारिची काव्याला बळी पडायचे की देखाव्यांच्या प्राणवायूच्या धुंदीत आयुष्याचे सोने करायचे हे ज्याचे त्यानेच ठरवावे. योगी रामलीलेचा हाच तर संदेश आहे.