उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना आपले पु. ल. देशपांडे, त्यांचं लिखाण ठाऊक आहे की नाही, कुणास ठाऊक. ठाऊक नसणारच बहुधा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पु. ल. देशपांडे ठाऊक आहेत की नाही कुणास ठाऊक. मोदी यांचं राज्य गुजरात. आपल्या महाराष्ट्राला लागून असलेलं. शिवाय मोदींचे मित्र, शिष्य आणि गुरूदेखील महाराष्ट्रातले. त्यातले काही गुरू पुलंच्या अगदी जवळचे. या आप्तांनी, शिष्यांनी, गुरूंनी मोदी यांना जरा पुलंची ओळख करून द्यावी. त्यांच्या लेखणीतून उतरलेलं पानवाल्याचं रसभरीत व्यक्तिचित्र उलगडून दाखवावं. पान-तंबाखू ही तर आपली जुनी संस्कृती. पानवाला म्हणजे त्या जुन्या संस्कृतीचा पाईकच. पूर्वीचे ऋषीमुनी गुहेत वगैरे जाऊन तपश्चर्या करीत असत. आता खोकेवजा दुकानात बसून आपली संस्कृती-परंपरा पुढे चालवण्यासाठी पानवाला जे काही करतो ती म्हणजे तपश्चर्याच की. पुलंच्या पानवाल्याची ओळख मोदींना का करून द्यायची? तर त्यांनी त्याबाबत योगी आदित्यनाथ यांना चार शब्द सांगावेत म्हणून. आदित्यनाथ यांना मोदी यांनी चार शब्द का सांगायचे? तर, त्यास कारण योगींनी काढलेला आदेश. काय आहे हा आदेश? ‘सरकारी कार्यालयांतील कर्मचाऱ्यांनी कार्यालयांमध्ये पानमसाला, गुटखा, तंबाखू खाऊ नये’ असा. योगींनी म्हणे मुख्यमंत्री झाल्यानंतर तातडीने काही सरकारी कार्यालयांना भेट दिली. तेथे जागोजागी उडविण्यात आलेल्या रसरंगीत पिचकाऱ्यांनी ते व्यथित झाले व त्यांनी तातडीने हा आदेश काढला. ही तर हुकूमशाही झाली. कत्तलखाने बंद करणे, बगिच्यांमध्ये युगुलांच्या प्रेमलीला बंद करणे हे फारच आवश्यक.. त्यामुळे समाजाची नैतिकता केवढी बिघडते! पण सरकारी कार्यालयांत पान-तंबाखूबंदी म्हणजे मन लावून आपले काम इमानेइतबारे करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य खच्ची करण्याचा प्रकार. तंबाखूमिश्रित एकसो बीस तीनसो पान खाणे म्हणजे परमानंदच. त्यातील सात्त्विक रस पाझरू लागले की ब्रह्मानंदी जी टाळी लागते त्यातून उलट सरकारी कामे झरझरा होऊ लागतात. या तांबूलसेवनाने कर्मचाऱ्यांना काळाचा-वेळेचा विसर पडतो. कितीही काळ काम करण्याची त्यांची तयारी होते. अत्यंत एकाग्र होऊन ते कामं करू शकतात. असे किती तरी फायदे. आदित्यनाथ बिचारे पडले योगी, महंत. त्यांची समाधी लागणार ती जपजाप्याने, सूक्ष्मात गेल्यावर. पण तसं काहीही न करता स्थूलात राहूनही समाधी लागू शकते हे तंबाखूनं सिद्ध केलं आहे. शिवाय, त्या पानाचे जिन्यांमध्ये, भिंतीवर उडणारे रससंग ही कार्यालयांची शोभाच खरं तर. त्यात बाधा कशाला आणायची? त्यामुळे मोदी यांनी पुलंचा हवाला देत हे सारे फायदे योगींच्या कानावर घालावेत. पुलंच्या ‘पानवाला’मधील समारोपाच्या पुढील ओळीही योगींना ऐकवाव्यात. ‘कृष्ण चालले वैकुंठाला, राधा विनवी पकडून बाही, इथे तंबाखू खाऊन घे रे, तिथे कन्हैया तंबाखू नाही..’ योगींना मराठी कळणार नाही.. पण मुळात या ओळी हिंदीतूनच अनुवादित केलेल्या आहेत!