दौलतीचे जे धनी कलाकारांची, विद्वानांची कदर करतात, रमणे भरवून मोहरा-मोत्यांची खिचडी ओगराळ्याने वाढतात, त्यांनाच खरे कदरदान म्हणतात. हिंदुस्थानच्या इतिहासात असा एकच राज्यकर्ता होऊन गेला. ते म्हणजे श्रीमंत धाकटे बाजीराव पेशवे. ते कलाकारांची कदर करीत ते काही डोळे झाकून नव्हे. पुण्यातील व्यंकट नरसीनामक सुप्रसिद्ध वारांगनेच्या नृत्यकौशल्याची सलग तीन दिवस परीक्षा घेतल्यानंतरच श्रीमंतांनी तिला तब्बल २६ हजार रुपये (त्या काळातील!) बक्षीस दिले होते. पुढे राज्यकर्त्यांमधील हा गुण नामशेष झाला. कलाकारांची गुणांनुरूप कदर होणे संपले आणि वशिलेबाजीचे राज्य सुरू झाले. गेल्या ६० वर्षांत तर त्याने कळसच गाठला. लोक ज्यांना ओळखतही नाहीत, अशा कलाकारांनाही केवळ राज्यकर्त्यांचे निकटवर्ती म्हणून सरकारदरबारी मानसन्मान मिळू लागले. याचे मोठे उदाहरण म्हणजे सत्यजीत राय. ‘पथेर पांचाली’सारखा चित्रपट काढणारा हा माणूस. त्या काळी पहेलाज निहलानींसारखे कलामहर्षी सेन्सॉर बोर्डावर नव्हते म्हणून अशा चित्रपटांना प्रमाणपत्रे तरी मिळाली. अन्यथा साध्या दूरदर्शनच्या पडद्यावर येण्याचीही त्यांची योग्यता नव्हती. पं. रविशंकरांसारख्या सतारियाला तर यापूर्वी भारताचे सांस्कृतिक राजदूतच बनविण्यात आले होते. त्यांच्यापेक्षा थोर संगीतकार अन्नू मलिक यांचे अल्बम अधिक विकले गेले असतील. आता मात्र अशा वशिलेबाजीला, कंपूशाहीला अजिबात लगाम बसणार आहे. सरकारी मेहरनजरीचे धनी केवळ गुणवंत, प्रतिभावंत असे साहित्यिक, कलाकारच बनणार आहेत. त्यासाठी केंद्राच्या सांस्कृतिक मंत्रालयाने एक खास योजना आणली आहे. महाराष्ट्रासाठी ही बहुमानाची गोष्ट आहे की साधारणत: आपल्या कापूस एकाधिकार खरेदी योजनेच्या धर्तीवरच ही योजना आहे. या योजनेत कापसाप्रमाणेच कलाकारांचेही ग्रेडिंग करण्यात येणार आहे. त्यासाठी अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धती वापरण्यात आल्या आहेत. म्हणजे कलाकाराचे वय, अनुभव आणि लोकप्रियता या निकषानुसार त्याचे ओ- सर्वोत्तम, पी – होनहार आणि डब्लू- प्रतीक्षाधीन असे अप्रायझल होणार आहे. त्यातील ओ आणि पी श्रेणीच्या कलाकारांनाच सरकारी कार्यक्रमांसाठी, फेस्टिव्हली रमण्यांसाठी निवडण्यात येणार आहे. येथे शंकाखोरांच्या मनात एक प्रश्न येईलच, की हे ग्रेडिंग करणार तरी कोण? तर अर्थातच मंत्रालयातील सर्वगुणसंपन्न बाबूलोक किंवा मंत्र्यांनी नेमलेले तज्ज्ञ. त्यात अर्थातच गजेंद्र चौहानांसारख्या दिग्गजांचाच समावेश असेल. त्यांनी प्रायोगिक तत्त्वावर १८५ जणांचे असे ग्रेडिंग केलेही आहे. त्यांच्या लोकप्रियतेची चाचणी कशी केली हे मात्र गुलदस्त्यात आहे. कदाचित फेसबुकवरील लाइक्स वगैरे आधुनिक डिजिटल तंत्राचा वापर त्यात केला असावा. काहीही असो, यातून वशिलेबाजीला नक्कीच फाटा बसणार असून, आता बाबूग्रेडेड कलाकारांची एक वेगळी ग्रेड तयार होणार आहे. यामुळे पुरस्कारवापसीसारखे कलाबाह्य़ अवगुणही साफ होतील ही कलेचीही मोठी सेवाच घडेल. तमाम कलाप्रेमी कला क्षेत्रातील भ्रष्टाचारास आळा घालणाऱ्या या कलाकार अप्रायझल योजनेस आणि कदरदान सांस्कृतिक खात्यास शुभेच्छाच देतील यात शंका नाही.