कर्नाटक भाजपचे नवनियुक्त अध्यक्ष श्रीमान बी एस येडियुरप्पा यांच्या दुष्काळग्रस्त भागाच्या दौऱ्यासाठी केवळ एक कोटी रुपये किमतीच्या एसयूव्ही गाडीची व्यवस्था करण्यात आल्याच्या बातम्या येताच त्यांच्यावर जो टीकेचा भडिमार करण्यात आला तो अत्यंत अश्लाघ्य आणि अनैतिक असाच म्हणावा लागेल. येडियुरप्पा हे लोकनेते आहेत. आता ते भाजपचे आहेत. पण त्याआधी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते आहेत. तेव्हा त्यांच्या नैतिकतेबाबत कोणासही शंका घेता येणार नाही. त्यांच्या राजकारणात धनशक्ती, झुंडशक्ती आणि जातशक्ती यांचा दिलखुलास प्रयोग असतो असे म्हटले जाते. पण तो राजकीय आरोप मानावा. त्यांच्यावर बंगळुरातील रेड्डीबंधूंवर खाणकाम कंत्राटात मेहरनजर केल्याचे, बंगळुरातील मोक्याच्या जागा आपल्या नात्यागोत्यात वाटल्याचे आदर्शवत आरोप झाले. ते तर स्पष्टच राजकीय मानले जावेत. तसे नसते तर त्यांनी स्वत:चा वेगळा पक्ष काढून, कर्नाटकातील भाजपची वाताहत करून काँग्रेसला सत्तेचे दान दिल्यानंतरही मोदींनी त्यांचा घरवापसी समारंभ घडवून आणलाच नसता. आता तर कर्नाटकातील २२४ पैकी किमान दीडशे जागा मिळवून देण्याचे राष्ट्रकार्य त्यांच्या खांद्यावर टाकण्यात आले आहे. त्यासाठी अर्थातच त्यांना राज्याची यात्रा करावी लागणार. आजच्या परिस्थितीत यात्रेकरिता सर्वोत्तम तीर्थक्षेत्र म्हणजे दुष्काळग्रस्त भाग. त्यात येडियुरप्पा यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने होरपळावे असे कोणी म्हणत असेल, तर ते माणुसकीशून्यच म्हणावे लागेल. वस्तुत: येडियुरप्पा यांच्यासारखे नेते म्हणजे लाखोंचे – त्यातही त्यांच्या समाजातील लाखोंचे पोशिंदेच. ते संघाचे असल्याने समरसतेच्या राजकारणावर त्यांचा नेहमीच भर असतो. परंतु कर्नाटकातील सर्वसामान्य लोकच वक्कलिग विरुद्ध लिंगायत असे जातीचे राजकारण करतात, तेव्हा मग येडियुरप्पा यांच्यासारख्यांना आपल्या लिंगायत जातीची काळजी घ्यावीच लागते. अखेर ही स्वत:ची पेढी सांभाळण्याची नैतिक नीती असते. असा लोककल्याणाची काळजी वाहणारा वयोवृद्ध नेता जेव्हा राज्यात दौरे काढतो तेव्हा त्याच्या किमान आरामाची काळजी लोकांनी वाहायला नको? केवळ या आणि याच विचाराने येडियुरप्पा यांना त्यांच्या एका चाहत्या माजी मंत्र्याने एक कोटी रुपयांची लँडक्रूझर भेट दिली. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना त्यांच्या एका चाहत्याने अशाच एका किमती घडय़ाळाची भेट दिली होती. तेव्हा भाजपने त्यावर, मोदी यांच्या दहा लाखांच्या सुटावर काँग्रेसने जशी टीका केली होती अगदी तशीच टीका केली होती. त्याचे कारण म्हणजे ती भेट अनैतिक होती. येडियुरप्पा यांना मिळालेली भेट नैतिक आहे; कारण की ती दुष्काळग्रस्तांच्या कामास येणारी आहे. हा साधा फरकही कोणी लक्षात घेत नसेल, तर त्यास या राष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही असेच म्हणावे लागेल. पण येडियुरप्पा यांचे थोरपण असे की ते या टीकेने व्याकूळ झाले आणि त्यांनी ही एक कोटींची गाडी चक्क ज्याची त्याला परत केली. ती आता जर येडियुरप्पांनी वापरलीच, तरी ती त्यांच्या मालकीची असणार नाही. याला म्हणतात संघातून आलेली नैतिक शिस्त. यानंतर ते दुष्काळग्रस्त भागात एसटीने जाणार की अन्य कोणत्या वाहनाने हे स्पष्ट झालेले नाही, पण ते ज्या गाडीने जातील त्या गाडीचा रथच होईल आणि त्याची चाके जमिनीपासून निश्चितच चार अंगुळे वरून धावतील!