आषाढी एकादशीच्या निमित्ताने चित्रवाहिन्यांच्या सर्व च्यानेलांवर आणि वर्तमानपत्रांच्या रंगीत पानांवर मुख्यमंत्र्यांसोबत झळकलो, म्हणून त्या सावळ्या पांडुरंगाने बहुधा सरकारचे आभार मानले असावेत. एवढय़ा प्रचंड गर्दीत, प्रत्येक जण आपला चेहरा फोटोत यावा यासाठी धडपडत असतानाही, फोटोतल्या किंचितशा जागेतून आपलेही दर्शन जनतेला, म्हणजे, यात्रेला न येऊ शकलेल्या भाविकांना घडविण्याचे औदार्य दाखविले, हा सरकारी यंत्रणेच्या मनाचा मोठेपणा पाहून त्या दिवशी पांडुरंगाला अंमळ बरेच वाटले असावे. दारी जमलेल्या भाविकांच्या मांदियाळीत राज्याचे खुद्द मुख्यमंत्री सपत्नीक हजर राहिले, कॅमेऱ्यांच्या झगमगाटात महापूजा आटोपल्यानंतर आपल्या गळ्यातील तुळशीमाळ स्वत: धारण करून ते सुहास्य वदनाने पुन्हा एकदा कॅमेऱ्याला सामोरे गेले, तेव्हा जणू याच क्षणाच्या प्रतीक्षेत आपण युगे अठ्ठावीस कटेवरी कर ठेवून विटेवरी उभा राहिल्याचे चीज झाले असेच त्या सावळ्याला वाटले असेल. दुष्काळाच्या चटक्यांनी बेजार झालेल्या आणि पावसाच्या सरींनी सुखावलेल्या बळीराजाच्या आठवणीने क्षणकाळासाठी सद्गदित होऊन ‘इडापीडा टळो’ अशी प्रार्थना केल्याचे मुख्यमंत्र्यांनी माध्यमांसमोर सांगितले, तेव्हा भरून आलेले डोळे पुसण्यासाठी क्षणभरासाठी कटेवरीचे हात काढून टाकावेत असेही त्याला वाटले असेल.  विठुरायाच्या चरणाशी लीन होण्याच्या ओढीने  आलेल्या भाविकांच्या मेळ्यात एवढा एकच प्रसंग जणू महत्त्वाचा असावा. वर्षांतून एकदाच येणाऱ्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने खुद्द मुख्यमंत्र्यांचे पाय लागतात, हे त्या मंदिराचे केवढे भाग्य! खुद्द विठ्ठलाच्या दरबारात, आषाढीची उत्सवमूर्ती कोण, असा प्रश्न पडावा असाच हा आगळावेगळा सोहळा याचि देही याचि डोळा अनुभवण्याचे भाग्य मिळावे, यापरता आनंदाचा क्षण त्या विठुरायासाठी तरी कोणता असणार? महापूजेचे सोपस्कार आटोपल्यानंतर होणारा मुख्यमंत्र्यांचा तो जंगी सत्कार, त्याप्रसंगीची स्तुतिसुमने उधळून केली जाणारी ती महापूजा आणि राजाने घातलेल्या साकडय़ाचे कौतुकभरले पोवाडे यापुढे चंद्रभागेच्या वाळवंटावरील टाळमृदंगांचा गजरही लाजून जावा, असा हा अभूतपूर्व सोहळा पाहण्याची सोय सरकारने करून ठेवली, हे आपले परमभाग्य असावे, याची जाणीवही त्या दयाघनाला त्या दिवशी झाली असावी. बळीराजा सुखी झाला तर राज्य सुखी होईल, म्हणून बळीराजाला सुखी ठेव असे साकडे घालून आपल्यासमोर नतमस्तक झालेल्या मुख्यमंत्र्यांची छबी कॅमेऱ्यात टिपता यावी यासाठी वाहिन्यांची कोणतीही गरसोय होऊ नये म्हणून काळजी घेणाऱ्या सरकारी यंत्रणांना प्रसंगाचे महत्त्व ओळखण्याची जाण आहे, हे पाहूनही पांडुरंगाला आनंद झाला असेल. आता  हा सरकारी सोहळा संपल्यानंतरच्या शांत, एकांतात त्या प्रसंगाची आठवणीतील चित्रफीत पुन्हा एकदा न्याहाळताना, यंदाच्या फोटोत दिग्गीराजा कसा दिसला नाही, हे कोडे तर तो सावळा विठ्ठलु मनातल्या मनात सोडवत नसेल?