अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारीसाठी इच्छुक असलेले थोर बिल्डर डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच महात्मा गांधी यांच्या नावाने इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर एक उद्धृत प्रसारित केले. ट्रम्प यांनी गांधींवर टीका न करता उलट आपली मते मांडण्यासाठी त्यांच्या नावाचा आसरा घेतला. हे एक हल्लीचे चलनच पडून गेले आहे. मोहनदास नावाचा तो वृद्ध महात्मा जिभेवर भिजत घालायचा. त्यायोगे मग तुमच्या बगलेत काय आहे याकडे लोकांचे लक्षच जात नाही. सत्ताधाऱ्यांना तेच सोयीचे असते. ट्रम्प यांनीही तेच करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही लोक हसू लागले, काही नुसतेच अचंबित झाले. हसायचे कारण म्हणजे ट्रम्प यांनी महात्मा गांधी यांचे नाव घ्यावे हाच एक मोठा विनोद आहे. साम्राज्यवाद, वंशवाद, जाती-धर्मभेद, हिंसाचार अशा सर्व वाईट गोष्टींविरोधातल्या अहिंसक लढय़ाचे प्रतीक म्हणजे महात्मा गांधी आणि ट्रम्प यांच्याबद्दल वेगळे काही सांगायलाच नको. देशभक्ती हे लुच्च्यांचे शेवटचे आश्रयस्थान असते असे म्हणतात. अशा देशभक्तांमध्ये ट्रम्प यांचे स्थान पहिले आहे. ते वर्णभेदाचे समर्थक आहेत. साम्राज्यवादी आहेत. अमेरिकेतील सगळ्या अल्पसंख्याकांना, निर्वासितांना हुसकावून लावणे त्यांना शक्य झाले तर ते हे काम एका क्षणात करतील. ती त्यांची मनीषा आहे आणि ती लपून राहिलेली नाही. हा गृहस्थ बांधकाम व्यवसायातील असण्याशी याचा संबंध आहे की नाही हे वेगळे तपासून पाहावे लागले, परंतु तो एवढा हुच्च आहे की त्यांनी उभ्या आयुष्यात कधी महात्मा गांधी वाचले असतील काय याबद्दलच शंका आहे. खरे तर अशी शंका असण्याचेही कारण नाही. तेथे खात्री हाच शब्द योग्य ठरेल. याचे साधे कारण म्हणजे ट्रम्प हे बांधकाम व्यावसायिक आहेत. या व्यवसायातील लोक गांधी वगैरे वाचून अंत्योदय, सत्य, अहिंसा, अपरिग्रह, झालेच तर खेडय़ाकडे चला अशा गोष्टी बोलू लागले तर शहरांत टाऊनशिप कोण उभारणार? पण ट्रम्प यांनी गांधी वाचलेलेच नाहीत, हे सिद्ध करणारा एक पुरावा समोर आला आहे. तो म्हणजे गांधींच्या नावावर त्यांनी जे विधान खपविले आहे ते मुळात गांधींचे नाहीच. ‘प्रथम ते तुमच्याकडे दुर्लक्ष करतील. नंतर ते तुम्हाला हसतील, मग ते तुमच्याशी लढतील आणि मग तुम्ही जिंकाल’ हे वाक्य अमेरिकेतील एक कामगार नेते निकोलास क्लेन यांचे असल्याचे सांगण्यात येते. यावरून समाजमाध्यमांतून ट्रम्प यांची प्रचंड खिल्ली उडविण्यात आली. पण एका दृष्टीने झाले ते बरेच झाले. तसेही ट्रम्प यांनी गांधींचे नाव घेणे अनैतिकच ठरले असते. अशा इतरांबद्दलचा द्वेष पाळणाऱ्या माणसांनी गांधींवर टीकाच करायची असते..