भाजपचे सर्वच खासदार काही स्वत:चे नाव जरतारीने लिहिलेला सूट घालत नाहीत, या सत्ताधारी पक्षाच्या खासदारांना त्यांच्या तोलामोलाच्या चिनी पदाधिकाऱ्यांसह झोपाळय़ावर वगैरे बसण्याची संधी मिळत नाही आणि महाराष्ट्राच्या आमदारांना दुष्काळात पाणी पाहून जसा सेल्फी काढण्याइतका आनंद होतो, तसाही भाजपच्या सर्वच्या सर्व संसद-सदस्यांना होणे कठीण आहे. तरीही या साऱ्या खासदारांकडून अपेक्षा अशी, की त्यांनी ट्विटर, फेसबुक.. इतकेच नव्हे तर पिन्टेरेस्ट, यूटय़ूब आदी सर्व प्रकारच्या समाजमाध्यमांवर खाती उघडून काही ना काही बोलत राहावे! बरे, ही नुसती अपेक्षाच नव्हे, तर त्यांची परीक्षाही यासाठी घेतली जाते आहे. बडय़ा कॉपरेरेट कंपन्यांपासून स्मार्ट छोटय़ा ‘फर्म’पर्यंत जे ‘अप्रेझल’चे खूळ विशेषत: कंत्राटी नोकऱ्यांच्या प्रथेनंतर बळावले, त्या शैलीची ही परीक्षा खासदारांना द्यावी लागते आहे. या साऱ्यावर नियंत्रण साक्षात नरेंद्र मोदी यांचे आहे, असे सांगण्यात येते. कॉपरेरेट जगतात ‘अप्रेझल’ नंतर पगार वाढवण्याचे गाजर दाखविण्यात येते, तसे काही भाजपने खासदारांना दाखविले असल्याचे ऐकिवात नाही खरे, पण डिजिटल इंडियाच्या नागरिकांचे प्रतिनिधी म्हणून समाजमाध्यमांची किमान ओळख करून घेण्याची जबाबदारी आता भाजपच्या खासदारांवरच आहे. कुणाची ट्विटर आणि फेसबुक खाती रिकामी पडून आहेत, कुणी अद्याप ही खाती काढलेलीच नाहीत, या साऱ्याची नोंद सध्या खासदारांच्या या ‘डिजिटल अप्रेझल’मधून होते आहे.. उत्तर प्रदेशाच्या ७१ खासदारांपैकी ४३ जण समाजमाध्यमांच्या वापरात कच्चेच आहेत, राजस्थानच्या १५ हून अधिक खासदारांना ट्विटर खाते म्हणजे काय हे माहीतच नाही, अशी धक्कादायक माहिती या परीक्षेतून बाहेर येत असली, तरी ही भाजपची अंतर्गत बाब असल्यामुळे तो राष्ट्रीय चर्चेचा विषय होऊ नये, याची पुरेपूर काळजीही घेतली जाईल. ही परीक्षा काही कोण ढ आहे किंवा कुणाला नापास करावे हे ठरवण्यासाठी नाहीच, सर्वच्या सर्व गोष्टींकडे सकारात्मकच दृष्टिकोनातून पाहायचे असे ठरलेलेच असल्याने या परीक्षेकडेसुद्धा पक्षात ‘सुधारणेची संधी’ म्हणून पाहिले जाते आहे. एकदा का सर्व २८२ खासदार ट्विटर आणि फेसबुकवर ‘अ‍ॅक्टिव्ह’- म्हणजे केवळ बोलके म्हणून का होईना, पण कार्यरत- झाले, की मग ही किती राष्ट्राभिमानाची बाब आहे, आणि हा डिजिटल चमत्कार घडवण्याचे खरे श्रेय कोणाला आहे, याचीही चर्चा होईल. यात कुठेही, खासदारांनी केले काय हा मुद्दा महत्त्वाचा नसून त्यांनी ट्विटरवर किती टिवटिवाट केला, त्यांना किती ‘फॉलोअर’ मिळाले, फेसबुकवर किती ‘लाइक’ मिळाले यापुरतेच हे सारे मर्यादित आहे. जाता जाता- डिजिटल, अप्रेझल हे इंग्रजी शब्द मराठी वृत्तपत्रात वाचताना सुजाण वाचकांना खटकत असतीलही, पण किमान महाराष्ट्रीय खासदारांना ते खटकू नयेत, इतका इंग्रजी टिवटिवाट हे खासदार करीत असतात.