एखाद्याच्या हातून घडलेल्या गुन्ह्य़ांची शिक्षा त्याला मिळाली की त्यानंतर त्याचे शुद्धीकरण झाले असे समजून त्याला पुन्हा माणूस म्हणून सन्मानाने वागविण्याचा आजकाल दुर्मीळ होऊ  पाहत असलेला संस्कार पुन्हा सामाजिकरीत्या जिवंत केल्याबद्दल मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांचे कौतुक करण्याऐवजी त्यांना नाके मुरडणाऱ्या प्रवृत्तींचा परिवारप्रमुखांनी पुरेपूर समाचार घेतला पाहिजे. ‘एके-४७’सारखे शस्त्र आणि दारूगोळा बाळगल्याबद्दल मुंबईतील १९९२-९३च्या दंगल व बॉम्बस्फोट खटल्यात आरोपी असलेल्या संजय दत्तने त्याच्या गुन्ह्याची शिक्षा भोगलेली असल्यामुळे त्याचे शुद्धीकरण झाल्याचा साक्षात्कार आशीष शेलारांना झाला, आणि त्यांनी भाजपच्या महाराष्ट्र दिन कार्यक्रमात संजय दत्तच्या कपाळावरील गुन्हेगारीचा शिक्का अंतिमत: पुसून टाकला, हे संस्कृतिरक्षणाचे थोर कार्य केल्याबद्दल खरे तर भाजप आणि परिवारश्रेष्ठींना कौतुकच वाटायला हवे. गेल्या काही महिन्यांपासून भाजप आणि परिवारातील लोकांच्या माथी बसलेला असहिष्णुतेचा कलंक पुसून काढण्यासाठी शेलार यांची ही एक कृती केवढी मोलाची ठरेल याची कल्पना टीकाकारांना आहे का? आज संजय दत्त व्यासपीठावर आला, तशा उद्या झेबुन्निसा काझीसुद्धा येऊ शकतात, हे कळण्याइतकी दूरदृष्टी परिवारजनांना येणार तरी कधी? महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात संजय दत्त या अभिनेत्याचे स्वागत करताना त्याचा पूर्वेतिहास विसरण्याचा मानसिक निर्मळपणा त्यांनी दाखविला असेल, तर सकारात्मकतेने त्याकडे पाहण्यास काय हरकत आहे? पण एखाद्या घटनेकडे अशा विशाल मनाने पाहण्याऐवजी लोकांच्या मनात राजकारण आणि बॉलीवूड यांच्यातील जवळिकीतून येणाऱ्या फायद्या-तोटय़ांच्या गणितांचे जंजाळ माजत असेल, तर तो लोकांच्याच दृष्टीचा दोष मानला पाहिजे. संजय दत्तचे वडील आणि बहीण काँग्रेसचे खासदार होते, स्वत: संजय दत्त एका देशविरोधी कटाच्या खटल्यातील गुन्हेगार होता आणि पॅरोल किंवा फलरे मिळवत, ‘चांगल्या वर्तणुकी’बद्दल सूट घेत.. कशी का होईना, त्याने त्याची शिक्षा भोगली आहे, ही पाश्र्वभूमी विसरून निरपराध सामान्य नागरिकासारखीच- नव्हे त्यापेक्षा जास्तच अगत्याची- वागणूक देण्यासाठी मनाचे मोठेपण असावे लागते. झेबुन्निसा काझी यांनाही अशीच वागणूक भाजप देईल, याबाबत आता कोणास तिळमात्रही शंका नसावी. संजय दत्तकडे जी ‘एके-४७’ रायफल सापडली, ती दत्तकडे जाण्याआधी झेबुन्निसा काझी यांच्याकडे ठेवण्यात आली होती, अशी माहिती पोलिसांकडे असल्यामुळे तंतोतंत तशीच्या तशी- संजय दत्तवर लावली तीच आणि तेवढीच घातक गुन्ह्य़ांची कलमे झेबुन्निसा काझींवरही लावण्यात आली. शिक्षासुद्धा तेवढीच सुनावण्यात आली. सामान्य गृहिणीला जितकी जगाची ओळख असते, तितकीच झेबुन्निसा यांना असल्यामुळे लोकांनाही त्यांचे नाव माहीत नसणे साहजिकच. झेबुन्निसा आता ७३ वर्षांच्या आहेत आणि अनेकांनी त्यांच्यासाठी विनंत्या करूनही त्यांना शिक्षेत सूट मिळालेली नाही, इतकाच काय तो फरक! तोही आशीष शेलार अथवा त्यांच्याऐवजी अन्य भाजपनेत्यांनी जरूर मिटवावा आणि ‘शिक्षा भोगल्यानंतरचे पावित्र्य’ काय असते हे पुन्हा एकदा जगाला दाखवून द्यावे. नाहीच तेवढे धैर्य झाले, तर संजय दत्तबाबत आम्ही मन थोर केले होते हे दिसले नाही का, असा युक्तिवाद तरी करता येण्याची सोय मुंबई भाजपनेच या राष्ट्रीय पक्षाला महाराष्ट्रदिनी बहाल केलेली आहेच!