वारकऱ्यांचे दुखलेखुपले बरे करण्यासाठी पुण्यातील डॉक्टर पुढे सरसावले आहेत. डॉक्टरांच्या विविध संघटना वारीच्या काळात वारकऱ्यांसाठी मोफत वैद्यकीय सेवा पुरवणार आहेत. इतकेच नव्हे तर स्वत:च्याही मनाला शांती मिळावी आणि वारकऱ्यांबरोबर चालण्याचा वेगळा अनुभवही मिळावा या उद्देशाने काही डॉक्टर वारीत सहभागीही होणार आहेत.
‘आयएमए’ आणि ‘निमा’ च्या डॉक्टरांतर्फे आरोग्य शिबिरे
वारकऱ्यांना प्रचंड चालावे लागत असल्यामुळे हातापायाला भेगा पडणे, लहानसहान जखमा होणे, हातपाय दुखणे या त्यांच्या नेहमीच्या तक्रारी असतात. अशा तक्रारींवर उपचार करण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांनी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. स्वारगेटजवळील आयएमए हाऊसमध्ये रविवारी (२२ जून) सकाळी ९ ते १ या वेळात हे शिबिर होणार आहे. आयएमएच्या पुणे शाखेचे अध्यक्ष डॉ. अरुण हळबे म्हणाले, ‘‘दुखण्याखुपण्यांवर उपचार करून आम्ही वारकऱ्यांना मलमे आणि औषधेही मोफत देणार आहोत. लांब पल्ला चालत पार करण्यासाठी शरीरातील शक्ती टिकून राहावी यासाठी ‘ओआरएस’ पावडरीची पाकिटेही देणार आहोत.’’
‘निमा’ चे (नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन) डॉक्टर्स ताराचंद रुग्णालयात आरोग्य शिबिर घेणार आहेत. संघटनेचे १०० डॉक्टर या शिबिरात सहभागी होणार असल्याची माहिती समन्वयक डॉ. मंदार रानडे यांनी दिली. या शिबिरांमध्ये इतर आजारांबरोबरच वारकऱ्यांना धनुर्वाताचे इंजेक्शन देणे, डोळ्यांची तपासणी करणे, हातापायाला फ्रॅक्चर झाले असल्यास त्यावरील उपचार याचाही समावेश आहे.

तुकारामांच्या पालखीच्या मार्गावर फिरता दवाखाना
संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या मार्गावर वारकऱ्यांसाठी एक फिरता मोफत दवाखाना सेवा देणार आहे. बारामतीच्या ‘कै. रामचंद्र भिसे (गुरुजी) वैद्यकीय प्रतिष्ठान’ चे डॉक्टर हा फिरता दवाखान चालवणार आहेत. प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. विजय भिसे म्हणाले, ‘‘शुक्रवारी रात्री पालखी आकुर्डीला येणार आहे, तर पुढचे दोन दिवस पालखी पुण्यात मुक्काम करणार आहे. या काळात आमचा फिरता दवाखानाही पालखीच्या ठिकाणी सेवा देईल आणि पुढेही पालखीबरोबर पंढरपूपर्यंत जाईल. सध्याच्या विषम हवामानात सर्दी, ताप, खोकला आणि बाहेरचे पाणी प्यावे लागल्यामुळे उलटय़ा आणि जुलाब या आजारांचा वारकऱ्यांना मोठय़ा प्रमाणावर त्रास होतो. अशा साध्या आजारांवर आम्ही उपचार करणार आहोत. हातापायांना जखमा झाल्यास त्याची मलमपट्टीही केली जाईल. नेहमीची साधी औषधे वारकऱ्यांना मोफत मिळतीलच शिवाय एखाद्या वारकऱ्याला तातडीने रुग्णालयात हलवावे लागल्यास त्यासाठीही मदत करण्याचा प्रयत्न करू.’’ मदतीसाठी डॉ. भिसे यांचा दूरध्वनी क्रमांक- ९३२५३३०६२४

डॉक्टरही होणार ‘माउली’!     
वारकऱ्यांच्या पावलावर पाऊल टाकत डॉक्टरही त्यांच्याबरोबर चार पावले चालणार आहेत. आयएमए आणि जीपीएचे (जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन) ४० ते ५० डॉक्टर दिंडीबरोबर सासवडपर्यंत जाणार आहेत असे डॉ. हळबे यांनी सांगितले. जीपीएचे डॉक्टर आळंदी ते पुणे या मार्गावरही चालत येणार आहेत, अशी माहिती संघटनेचे डॉ. संताजी कदम यांनी दिली. सर्व डॉक्टरांनी एकत्र जमण्याचा आनंद आणि वारकऱ्यांबरोबर चालताना मिळणारी मानसिक शांतता असा या उपक्रमाचा हेतू असल्याचे डॉ. कदम यांनी सांगितले.