दुसऱया दिवशी विद्याला मोबाईलवरून निरोप पोहोचवून तिच्या आधीच नंदा सुमनकडे पोचली. दुपारच्या वेळेला सुमन निवांत बसली होती. कसलंसं पुस्तक होतं तिच्या हातात. नंदाला बघताच तिनं हातातलं पुस्तक बाजूला ठेवलं. म्हणाली,
‘‘धन्य झालं आमचं घर आज. गावच्या सरपंचिणीचे पाय लागले आमच्या उंबऱयाला.’’
‘‘तूच राहिली होतीस डिवचायची.’’
तिच्या शेजारीच बसत नंदा म्हणाली.
‘‘अगं, त्यात डिवचायचं कसलं. तू काय कोणत्या सरपंचाची बायको नाहीस. सरपंच म्हणून तुझी स्वत:ची ओळख आहे. सरपंच म्हणून घ्यायची लाज आता तुझ्या नवऱयाला वाटली पाहिजे. तुला कसली!’’
‘‘पण खूप ओझं झालंय गं त्याचं आता. नको नको झालंय. भंडावून सोडतात नुसती लोकं. नाही नाही ते प्रश्न विचारतात. रस्त्याचं काम अर्धवट का थांबलं? गावात होणारा बंधारा नेमका कुठे होणार? दुष्काळाची मदत आली का? गावातल्या विकास योजना कोणकोणत्या… एक ना अनेक प्रश्न…’’
‘‘आणि त्यात आमची ही भांडणं!’’
सुमन हसत हसत मध्येच बोलली. पण लगेच गंभीर होत ती पुढं म्हणाली,
‘‘मग तू या प्रश्नांची उत्तर देत नाहीस का?’’
 तशी थोडी अस्वस्थ होऊन नंदा बोलायला लागली. म्हणाली,
‘‘माझ्याकडे उत्तरे असतील तर देईन ना!’’
‘‘म्हणजे?’’
‘‘म्हणजे गावात काय चाललंय याचा मला कधीच पत्ता नसतो. मी नुसती नावाला सरपंच आहे. सगळा कारभार बघतात ते हेच. मी नुसतं बुजगावणं आहे, गावात उभं केलेलं.’’
‘‘मग घालत जा लक्ष. जाणून घे या प्रश्नांची उत्तरं.’’
सुमन अगदी सहजपणे बोलली. तसा एक दीर्घ श्वास सोडत नंदा म्हणाली,
‘‘ते एवढं सोपं असतं तर ही वेळ कशाला आली असती… जाऊ दे. माझं रडगाणं असंच चालू राहील आता.’’
एवढय़ात नंदाचं लक्ष बाजूच्या पुस्तकाकडे गेलं. ते पुस्तक हातात घेऊन त्यावरील नाव वाचत ती म्हणाली,
‘‘पण लक्षात कोण घेतो? ह. ना. आपटे. कसलं गं पुस्तक हे?’’
‘‘माहीत नाही?’’
सुमनने आश्चर्याने विचारलं.
‘‘आम्हाला कुठं असली जाडजूड पुस्तक माहीत?’’
‘‘म्हणून म्हणते, मुलींनी शिकलं पाहिजे. दोन-तीन वर्षे का होईना, पण कॉलेजात घासली पाहिजेत. तरच असल्या गोष्टी कळून जीवनाला चकाकी येते.’’
‘‘आम्हाला नाही जमलं बाई तुझ्यासारखं कॉलेजात जायला. पण काय आहे या पुस्तकात?’’
नंदाने उत्सुकतेनं विचारलं. सुमनने लगेच सांगायला सुरुवात केली.
‘‘कादंबरी आहे. स्त्रियांच्या प्रश्नांना, त्यांच्या पिळवणुकीला सुरुवातीच्या काळात वाचा फोडली ती हरिभाऊंच्या याच कादंबरींने. पण इतकी वर्षे झाली तरी अजून स्त्रियांच्या जीवनात, त्यांच्या जगण्यात काहीच फरक पडला नाही. आता त्यांच्या पिळवणुकीचं स्वरूप फक्त बदललंय. पिळवणूक मात्र संपली नाही. पूर्वी होती तशीच आताही आहे. शारीरिक…मानसिक… याला जबाबदार कोण आहे ते सांगू शकशील?’’
‘‘नाही बाई, आपल्याला नाही तुमचं हे वरच्या लेवलचं कळत. ती विद्यासुद्धा कधीकधी असं डोकं खाती. येईल ती आता इथं, तेव्हा घाल तिच्याशी वाद.’’
नंदाने आपण त्या गावची नसल्यासारखं दाखवलं. मात्र विद्याचं नाव काढताच सुमनने नंदाकडे आश्चर्याने पाहिलं. म्हणाली,
‘‘विद्या माझ्याकडं येणार आहे?’’
‘‘हो. का? नाही येऊ शकत का?’’
‘‘तसं नाही गं. ती आता मोठी झालीये. आणि त्यात अण्णासाहेबांची भाची म्हटल्यावर तिचं मोठेपण अजूनच वाढतं. तेव्हा अशा मुलींनी आपल्या घरी येणं म्हणजे नवलच.’’
विद्याने आपल्या घरी येणं हे सुमनने विनाकारण प्रतिष्ठेचं केल्यासारखं नंदाला वाटलं. म्हणून ती जरा विद्याची बाजू घेत म्हणाली,
‘‘तसं काही नाही, विद्या स्वत:ला कधीच मोठी समजत नाही. आणि अण्णासाहेबांच्या नावाचा वापर तर कधीच करत नाही. लोकं उगीच तिच्याविषयी मनात गैरसमज घेऊन बसतात.’’
नंदाचं बोलणं आपल्याला पटल्यासारखं सुमनने ऐकूण घेतलं. थोडावेळ शांत बसली. पण नंतर एकदम मर्मावर बोट ठेवल्यासारखी म्हणाली,
‘‘असेल तुझं बरोबर, सुमन. पण गावात साक्षरतेचं काम करणाऱया अनेक जणी होत्या. पण एवढय़ा जणींमधून विद्याचाच सत्कार झाला. असं का?’’
सुमनला नेमकं काय म्हणायचं आहे ते नंदाला समजलं. पण ती विद्याला चांगली ओळखून होती. गावाच्या विकासात मनापासून कोण झटत असेल तर ती विद्या, हे ती जाणून होती. परवाच्या तिच्या सत्काराने अनेकांच्या मनात प्रश्न पडले असतील. काही जण मनातल्या मनात तिचा द्वेषही करीत असतील. पण अण्णासाहेबांच्या नावाचा इतका प्रभाव आहे की त्याच्यापुढं विद्याविषयीचा द्वेष कोणी व्यक्त करीत नाही. तरी सुमनसारख्या शिकलेल्या मुलीचा असा गैरसमज नको म्हणून तिनं सुमनला सांगितलं. म्हणाली,
‘‘सुमन, खरं तर हा सत्कार विद्यालाच नको होता. सत्कार करायचाच तर या कामात जेवढे सहभागी होते तेवढय़ांचा करा, असं तिचं म्हणनं होतं. तसा तिनं आग्रहसुद्धा धरला होता. पण अण्णासाहेबांच्या मनात काय होतं, कोणाला माहीत. मग विद्याही त्यांच्यापुढं जाऊ शकली नाही. पण तिनं भाषणात सगळ्यांचा उल्लेख केला. स्वत:ला मिळालेली रक्कम सुद्धा तिनं गावाच्या विकासासाठी वापरायचं ठरवलंय…आता तिच्या नवऱयाने काही अडथळा नाही आणला तर त्यातून कायतरी चांगलं काम होईल. फक्त इथं निर्मल गाव पुरस्काराच्या कार्यक्रमासारखं तिचा नवरा आन् अण्णासाहेबांमध्ये परत राजकारण व्हायला नको म्हणजे झालं. वाईट नाही ती. तीही माझ्यासारखीच राजकारणाची बळी.’’
‘‘माहीत आहे गं मला सगळं, नको सांगत बसू. विद्याला मी चांगली ओळखते. तिच्या जागी दुसरा कोणाचा सत्कार झाला असता तर खरंच वाईट वाटलं असतं मला, एवढं तिचं योगदान आहे या कामात. तिच्या सत्काराने समाधानच वाटलं मला. आहेच मुळात ती सत्कार करण्यासारखी. तरी ती अण्णासाहेबांची भाची आहे, हे काय मनातून जात नाही..दुसऱया दिवशी पेपर वाचला असशील, गाव साक्षर केल्याचं सगळं क्रेडीट कोणी घेतलं? विद्याचा मामा म्हणून अण्णासाहेबांनीच ना! सगळ्या न्यूज चॅनेलवर बातम्याही त्याच. सगळ्या पेडन्यूज. स्वत:चा उदोउदो करून घेतला अण्णासाहेबांनी. आता त्याचं भांडवल करणार निवडणुकीत. आयतं लोणी खाणार. शिकलेली असूनही विद्या अशा गोष्टींना बळी पडते याचंच वाईट वाटतं.’’
नंदाला सुमनचं पटत होतं. पण त्यात ती विद्याला दोष द्यायला तयार नव्हती.
अण्णासाहेबांविषयीच्या कोणत्याही गोष्टी मात्र ती मान्य करेल, कारण त्यांचे अनेक कारनामे ती घरात रोज ऐकत आहे. आपला नवरा अण्णासाहेबांच्या नादाला लागल्यापासूनच लोकांच्या माना पिळायला लागला आहे, हे सुद्धा ती जाणत होती. म्हणून तर ती सुमनपुढे निरुत्तर झाली. पण थोडा वेळ गप बसून तिनं आपलं मत मांडलं. म्हणाली,
‘‘सुमन, पण विद्याविषयी तू मनात काही अढी ठेवू नकोस. खूप चांगली आहे ती. गाव सुधारण्याची तळमळ मनापासून आहे तिच्या मनात. आणि विशेष म्हणजे मला तिचा खूप आधार वाटतो.’’
सुमननेही मग तो विषय बदलला. म्हणाली,
‘‘आपण कोठे होतो?’’
काहीच न कळल्यासारखं नंदाने सुमनकडे पाहिलं. तिच्या प्रश्नार्थक नजरेकडे पाहात सुमन थोडी हसून म्हणाली,
‘‘म्हणजे आपण कोणत्या विषयापासून विद्याकडे वळलो?’’
नंदाने बाजूला पडलेल्या पुस्तकाकडे पाहिलं. मग सुमनचंही लक्षं परत त्या पुस्तकाकडे गेलं आणि एकदम लक्षात आल्यासारखी ती म्हणाली,
‘‘हां. हरिभाऊंपाशी…’’

(क्रमश:)

– बबन मिंडे

(पुढील आठवड्यात वाचा : जामगावधील महिला सरपंचाची घुसमट. पंचायत समिती निवडणुकीतील राजकारण, सडलेली राजकीय व्यवस्था आणि या व्यवस्थेत राजकीय आरक्षणाने लाभ घेणारी स्त्री.)