‘‘जामगावची जागा आमच्या दृष्टीने फार महत्त्वाची आहे. पुढचा विचार करता काही गैरप्रकार करण्याची आमची इच्छा नव्हती. पण आता परिस्थिती तशी आहे. वाट्टेल ते करा, पण जामगाव गणामधून कांबळेसरांनाच निवडून आणा.’’
अण्णासाहेबांचाच आदेश मिळाला आहे म्हटल्यावर काय! कार्यकर्त्यांना मनाला येईल तसं बोकाळण्याची परवानगीच मिळाली. तरी मीडियाचा थोडा धाक आणि बाईमाणूस म्हणून अलकावर नको ते आरोप झालेच. मात्र, ती थेट हल्ल्यापासून वाचली असली तरी पंचायत समितीच्या या निवडणुकीत अण्णासाहेबांच्या राष्ट्रीय लोकसंघ पार्टीतील कार्यकर्त्यांनी तालुक्यात करता येतील तेवढे  गैरप्रकार केले. जांभूळवाडी आणि जामगावमध्ये तर त्याचा कहरच झाला. अण्णासाहेब आणि कांबळेसरांनी कार्यकर्त्यांना पैशाची कमी पडून दिली नाही. सामदामदंडभेद…सगळं सगळं वापरून झालं.
पण तरीही अण्णासाहेबांच्याच जामगावमध्ये पार्टीला यश मिळालं नाही. जांभूळवाडीत काशीबाईंनी आपल्या भावाच्या जीवावर  मात्र बाजी मारली. जामगावमधील जागा अलकाने अगदी सहज पटकावली. नव्याने साक्षर झालेल्या या गावाला चांगल्या वाईटाची जाण आली आहे, अशा आशयाच्या बातम्या जिल्हाभर पसरल्या. वर्तमानपत्रातून अशा बातम्या छापून येणं अण्णासाहेबांच्या पक्षाला हानिकारकच होतं. दैनिक लोकशाहीचा तालुका प्रतिनिधी प्रताप. एक दिवस त्याला अण्णासाहेबांनी बोलावलं. त्याला पुन्हा एकदा केलेल्या उपकाराची जाणीव करून दिली. आणि पुढच्या वेळेस हे लक्षात ठेवण्याची तंबीही दिली.
पराभवाचं खापर आता दुसऱयावर फोडण्यातही काही उपयोग नव्हता. त्यांनी जवळची माणसंच दुरावण्याची शक्यता होती. आता शहाणपणा होता तो गप्प राहण्यात. गडबड करून वातावरण चिघळवून ठेवलं, तर कधीही येणाऱया विधानसभा निवडणुकीला सामोरं जाणं अवघड होऊन बसेल, हे अण्णासाहेब ओळखून होते, कारण राज्यातल्या अस्थिर परिस्थितीची त्यांना चांगली जाण होती.

मध्ये पंधरा दिवस गेले आणि झालंही तसंच.
अण्णासाहेबांची राष्ट्रीय लोकसंघ पार्टी ज्या दोन पक्षांच्या पाठिंब्यामुळे सत्तेवर होती, त्या दोन्ही पक्षांनी पाठिंबा काढून घेतला आणि त्यांच्या पार्टीचं सरकार कोसळलं.
दुसऱया दिवशीच अण्णासाहेबांनी कार्यकर्त्यांची मिटिंग घेऊन त्यांना काही सूचना केल्या आणि लगेच पार्टीअध्यक्षांना भेटण्यासाठी मुंबईला गेले.

पंचायत समिती मात्र आता तालुक्यातच काय पण जिल्ह्यात गाजण्याची चिन्हं दिसायला लागली होती. कारण पंचायत समितीचं सभापतिपद स्त्रियांसाठी राखीव झालं होतं. त्यासाठी तालुक्यातील मुरलेल्या राजकारण्यांनी महिलांसाठी राखीव झालेल्या आपल्या पारंपरिक  गणातून आपल्याच पत्नीला उभं करून निवडूनही आणलं होतं. त्यामुळे पत्नीला बाहुलीसारखी उभी करून सत्ता आपल्याच हातात ठेवण्याचे मनसुबे अनेकांनी आखले होते. सभापतिपद कोणाला मिळणार, यात मात्र आमदारांची भूमिका निर्णायक ठरणार होती. त्यामुळे अनेकांनी अण्णासाहेबांची पाठ धरली होती. ते मर्जीतल्या व्यक्तीचीच तिथं वर्णी लावणार हे तालुक्यातील कार्यकर्त्यांना माहीत होतं. गेली पंचवीस वर्षे पंचायत समितीवर सत्ता गाजवणाऱया अण्णासाहेबांची ही कीर्ती पार्टीतले कार्यकर्ते चांगलेच ओळखून होते. मात्र यावेळेस परिस्थिती वेगळी होती. राष्ट्रीय लोकसंघ पार्टीच्या जागा कमी झाल्या होत्या. अशा वेळी केवळ मर्जी न बघता चांगलं काम करणाऱयाला ते संधी देतील असं वाटत होतं. आणि म्हणूनच इच्छुकांच्या त्यांच्याकडील वाऱया वाढल्या होत्या, कारण त्यांना माहीत होतं, अण्णासाहेब घोडेबाजार करून सत्ता आपल्याच हाती ठेवणार.
 दुसरीकडे नव्याने निवडून आलेले आणि पंचवीस वर्षांतील  पंचायत समितीतील अनागोंदीला कंटाळलेले फणसी, जांभूळवाडी, जामगाव, ढोरवाडीचे काही कार्यकर्ते एक दिवस पंचायत समितीवर नव्याने निवडून आलेल्या अलकाला येऊन भेटले. मग अलकाने विद्यालाही बोलावून घेतलं. जामगावातलाच रोहिदासही त्यांना येऊन मिळाला. फणसीच्या कार्यकर्त्यांनी सभापतिपदाचा विषयी काढला. म्हणाले,
‘‘सरकारच्या कृपेमुळे या वेळेस पंचायत समितीवर स्त्रियाच जास्त निवडून आल्यात. पण त्या सगळ्या केवळ आपल्या घराण्याचा वारसा पुढे चालवणाऱया आहेत. निवडून आलेल्यांमध्ये अलका सोडली, तर एकही धड शिकलेली नाही. तेव्हा राखीव जागेतील सभापतिपदी अलका आली तरच भलं आहे या पंचायत समितीचं.’’
विद्याने त्या संदर्भात अलकाला विचारलं. पण तिचं उत्तर लगेच मिळणं अवघड होतं. गप्प बसलेल्या अलकाकडे बघून मग जांभूळवाडीचा एक कार्यकर्ता मध्येच बोलला. म्हणाला,
‘‘काशीबाईंसाठी पुढाऱयाची हालचाल चालू आहे. चुलीपुढून उठून ती पंचायत समितीत सभापतीच्या खुर्चीवर बाहुलीसारखी बसेल. आणि मग पुढारी पंचायत समिती चांगलीच गाजवतील.’’
‘‘फुटाफुट नाही झाली तर आपल्याही पाठीमागं आवश्यक तेवढे सदस्य येतील.’’
दुसऱया एका कार्यकर्त्यांने अलका उत्सुक असेल तर बहुतेक सदस्य आपल्यालाच पाठिंबा देतील अशी आशा व्यक्त केली. त्याला कारण विद्या त्यांच्या बरोबर होती. तिच्यामुळेच अलका सभापती होईल असं त्यांना वाटत होतं. तसं सगळ्यांनी विद्याला बोलूनही दाखवलं.
मग रोहिदास आणि विद्यानेही मनावर घेतलं. धाडस केल्याशिवाय काही मिळणार नाही, असा विचार करून त्यांनी अलकाला सभापतिपदाच्या रिंगणात उभी केली.
राजकारणात नवख्या असलेल्या या कार्यर्त्यांनी तशी घोषणाही केली. दैनिक लोकशाहीत ही बातमी पहिल्या पानावर छापून आली. जिल्हाभर पुन्हा एकदा अलकाचं नाव गाजलं.  मात्र अलकाला आणि विद्यासह तिच्याबरोबरच्या सर्वांनाच अजून खरं राजकारण कळायचं होतं. राजकारणातून समाजकारण करायला निघालेली ही मंडळी अण्णासाहेब आणि पुढाऱयासारख्यासमोर अजून अडाणीच होती.
अलकाची कुणकुण लागल्यावर पुढारी शांत बसणे शक्य नव्हतं. ते मोबाइलवर सतत अण्णासाहेबांशी संपर्कात होतेच, पण मुंबईला जाऊनही त्यांनी अण्णासाहेबांच्या कानावर या सगळ्या गोष्ट घातल्या. त्यांच्याशी चर्चा करून ते दोन दिवसात पुन्हा तालुक्यात परतले.
निवडून आलेल्या सर्व सदस्यांना त्यांनी जांभूळवाडीत आपल्या बहिणीच्या घरी चहापानाचे आमंत्रण दिले. निम्म्याच्या वर सदस्यांनी त्यांच्या या आमंत्रणाचा मान राखला. लोकशाहीमध्ये ही बातमी आल्यावर राज्यात रुजलेल्या पार्टीसमोर एक अपक्ष उमेदवार किती टिकणार ही चर्चा जशी सुरू झाली, तशीच  काशीबाईच सभापती होणार ही चर्चाही तालुकाभर ऐकायला येऊ लागली!
पण असं होणं तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने घातक होतं. शिवाय स्त्रियांसाठी राखीव असलेलं सभापतिपद पुरुषांच्याच हाती राहणार होतं. जामगावात पडलेले कांबळेसर पुढाऱयाच्या मदतीने अलकाला छळून आपल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी टपूनच बसले होते.
म्हणजे सभापतिपदी काशीबाई आल्याने नवीन असं काहीच घडणार नव्हतं. उलट काशीबाईमुळे पुढाऱयालाच पंचायत समितीवर राज्य करण्याची संधी मिळणार होती.
विद्याने या सर्व गोष्टींचा विचार करून अलकालाच सभापती करण्याचा निर्धार केला. तिनं अलकाला बरोबर घेऊन प्रत्येक सदस्याला भेटण्याची सुरुवात केली. अलका सभापतिपदी येणं कसं फायद्याचं आहे ते सर्वाना आत्मविश्वासाने सांगितलं. तोंडावर सगळ्यांनीच चांगला प्रतिसाद दिला. ही बातमीसुद्धा लोकशाहीमध्ये आली. त्यामुळे कधी नाही ते या पंचायत समितीच्या सभापतीच्या निवडीची चर्चा जिल्हाभर बऱयाच दिवस सुरू राहिली.
या लढाईत एकीकडे अण्णासाहेब पुढाऱयासारख्याला मोकळं रान देऊन सूत्रं हलवतात, तर दुसरीकडे विद्या. त्यामुळे पुढाऱयाला आपल्या स्वत:साठीही हा प्रतिष्ठेचा प्रश्न वाटत होता. त्यासाठी इथंही ते वाट्टेल तो करण्यास तयार होता. मुंबईला जाऊन अण्णासाहेबांची तशी परवानगीही त्याने आणली होती.
या पंचायत समितीवर अण्णासाहेब आणि त्यांच्या पार्टीचं वर्चस्व पाहता, इतक्या वर्षांची सत्ता ते सहजासहजी सोडणार नव्हते. पण तरीही विद्याला निवडून आलेल्या सदस्यांवर विश्वास होता.
पण तिचा हा विश्वास सभापती निवडीच्या दिवशी खोटा ठरला. तिथं सगळं चित्रच पालटलेलं दिसलं.
अनेक सदस्य गैरहजर असण्यामागं पुढाऱयाचा हात असणार ही गोष्ट लक्षात यायला तिला वेळ लागला नाही.
सदस्यांना खरेदी करून त्यांचा बाजार मांडणाऱया अण्णासाहेबांनी इथं मात्र बाजी मारली. आणि काशीबाईला खुर्चीवर बसवून पंचायत समिती पुढाऱयाच्या हातात दिली.
निराश झालेल्या विद्याला राजकारणातला एक नवा धडा शिकायला मिळाला.

(क्रमश:)

– बबन मिंडे

( पुढील आठवड्यात वाचा : त्रिशंकू सरकारची अस्थिरता. राजकीय हितसंबंध…राजकारणातील महत्त्वाकांक्षा आणि त्यासाठीच्या करघोड्या…कोसळलेलं सरकार आणि मध्यावधी निवडणुकांचं गुपित…)