शेतकरी विकास पक्ष आणि राष्ट्रीय समतावादी पार्टीने पाठिंबा काढून  घेतल्याने राष्ट्रीय लोकसंघ पार्टीचं राज्यातलं सरकार कोसळलं. आता बहुमत सिद्ध करण्याची कोणतीही शक्यता दिसत नसल्याने मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे दिलेला राजीनामा त्यांनी स्वीकारला आणि निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाची तयारी सुरू झाली. जागा वाटपाच्या संदर्भात बैठका सुरू झाल्या. पक्षाचे अंतर्गत वाद वर्तमानपत्रांमुळे आणि वृत्तवाहिन्यांमुळे लोकांसमोर येऊ लागले. आपल्या स्वार्थासाठीच या तीन पाटर्य़ा एकत्र होत्या हे आता लोकांना कळल्याशिवाय राहिलं नाही. मनासारखी मंत्रिपदं मिळेना म्हणून सरकार पाडणारे आणि लोकांचा विश्वासघात करून पुन्हा जनतेच्याच पैशावर निवडणुका घ्यायला लावणाऱया प्रस्थापित राजकारण्यांवर जनतेचा रोष माध्यमांतून दिसू लागला आणि अनेकांना आपल्या जागा आता डळमळीत वाटू लागल्या. त्यामुळे मोठमोठय़ा घराण्यांतून सत्तांतर होण्याची चिन्ह दिसू लागली.
निवडणुकांची चाहूल लागल्याबरोबरच मुंबईला जाऊन बसलेले अण्णासाहेब पार्टीची बैठक झाल्याझाल्या आपल्या पुण्यातल्या घरी परतले. ते पुण्यात आलेत हे समजल्याबरोबर मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे हजेरी लावली. वर्तमानपत्रातून पक्षाच्या बैठकीसंदर्भात उलटसुलट छापून यायला लागलं होतं. काही वृत्तवाहिन्यांवर नेत्यांच्या मुलाखतींनी कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होत होता. त्यामुळे सर्वच कार्यकर्ते, छोटेमोठे नेते आणि जनतेलाही राष्ट्रीय लोकसंघ पार्टीत नेमकं काय चाललंय ते जाणून घेण्याची उत्सुकता होती.
पण अण्णासाहेबांनी लगेचंच त्या विषयाला हात घातला नाही. त्यांनी सर्वप्रथम आपल्या सर्व कार्यकर्त्यांसमोर पुढाऱयाचं अभिनंदन केलं. नवनिर्वाचित सभापती काशीबाईंचा सत्कार केला. पुढाऱयाची छाती तेव्हा एकदम गर्वाने फुगली. त्याच्या शेजारी बसलेल्या कांबळेसरांच्या चेहऱयावर उसणं हसू असलं तरी मनात अलकाविषयीची खदखद होती. दोघांकडे बघत अण्णासाहेब शांतपणे म्हणाले,
‘‘खरं तर जामगावमध्ये घडायला नको ते घडलं. पण काही हरकत नाही. सभापती पद बाहेर गेलं नाही, तेवढं चांगलं झालं. आणि त्यांचं सगळं श्रेय दिलं पाहिजे ते पुढाऱयांना.’’
फार मोठी कामगिरी केल्याचा अभिमान पुढाऱयाच्या चेहऱयावर दिसायला लागला. बसलेले कार्यकर्ते त्याच्याकडे हेव्याने पाहत होते. अण्णासाहेब तोंडाने एक बोलत असले तरी त्यांची नजर मात्र त्यावेळी पुढाऱयाला वेगळंच सूचित करत होती. पुढाऱयाने ती लगेच ओळखली. म्हणजे आपलं कौतुक हे वरवरचं आहे. ते सध्या वेगळ्याच विचारात आहेत. अण्णासाहेबांच्या या वरवरच्या कौतुकाला काय उत्तर द्यावे हे पुढाऱयालाही सूचेना, पण त्याला एवढं कळत होतं, की आपण जे केलं ते अण्णासाहेबांमुळेच. आपल्या बहिणीला सभापती करण्यामागं खरा हात आहे तो त्यांचाच. ते उपकार अण्णासाहेब येणाऱया निवडणुकीत विसरणार नाहीत हे पुढाऱयाला माहीत होतं. ते सगळं मनात ठेवूनच तो म्हणाला,
‘‘अण्णासाहेब, तुमचा हात पाठीशी आहे म्हणून घडतंय सगळं, नाही तर आपले विरोधक आम्हाला पुढं जाऊन देण्याइतके कमजोर नाय राह्यले आता.’’
विरोधकांचं नाव काढल्याबरोबर अण्णासाहेब भानावर आल्यासारखे पुढाऱयाकडे पाहायला लागले. त्यांच्या मनातली चिंता त्यांचा चेहरा लपवू शकत नव्हता. पार्टीच्या बैठकीत अण्णासाहेबांच्या अस्तित्वाला धक्का बसण्यासारखं काहीतरी घडलं असणार असं बसलेल्या प्रत्येकालाच वाटलं. येणाऱया निवडणुकीसंदर्भात प्रत्येक कार्यकर्त्यांला अण्णासाहेबांशी बोलायचं होतं. पण चिंताग्रस्त अण्णासाहेबांकडे बघून कोणाचीच बोलण्याची हिम्मत होईना. बराच वेळ सगळे शांत बसले. मग अण्णासाहेबच हळू आवाजात, गंभीरपणे बोलायला लागले. म्हणाले,
‘‘मंडळी, तुमच्या सहकार्याने मी अनेक निवडणुका जिंकल्या. सरपंचापासून आमदारकीपर्यंत गेलो ते तुमच्यामुळंच. इथून पुढंही तुमचं सहकार्य असेच राहील यात शंका नाही. पण आपल्या पार्टीची अवस्था आता पहिल्यासारखी राहिलेली नाही. पक्षातली फूट आता उघडपणे बंडखोरी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्या एका पार्टीच्या दोन पाटर्य़ा होण्याची शक्यता आहे. असं घडलं तर आपल्या वेगळ्या गटाचा वेगळा पक्ष करून त्याचं चिन्हही बदलावं लागेन. आणि चिन्ह बदललं तर त्याचा मतांवर परिणाम होणार.’’
‘‘अण्णा, फुटीमुळे मतं विभागणी होईल, पण चिन्ह बदलल्याने काय फरक पडणार आहे?’’
सतू पहिलवाणाच्या या शंकेने सगळ्यांनाच हसू आलं, पण ते त्यांनी ओठातच दाबून धरलं, त्याला समजावून सांगत मग अण्णासाहेब त्याच गंभीरतेनं पुढे बोलायला लागले. म्हणाले,
‘‘सतू, आपलं चिन्ह  घराघरात पोचलं आहे. प्रत्येक मतदाराला ते आपलं वाटतंय. लोकं त्या भाकरीच्या तुकडय़ावरच शिक्का मारणार. पण ते चिन्ह आता आपल्या विरोधी गटाकडेच राहण्याची शक्यता आहे.’’
‘‘का?’’
सतूने पुन्हा एकदा आपलं राजकारणातलं अज्ञान दाखवलं, पण अण्णासाहेबांनी त्याच्या या प्रश्नाचंही उत्तर दिलं. म्हणाले,
‘‘आपण अध्यक्षांच्या विरोधात गेलो. त्यामुळे आपला दहा-बारा आमदारांचा गट पक्षातून बाहेर पडण्याची शक्यता आहे. त्यासंदर्भात चार-पाच दिवसांत निर्णय होईल. आपण  आग्रही आहोत तेवढय़ा जागा नाही मिळाल्या तर नवीन पक्ष, नवीन चिन्ह हे ओघाने आलंच. माझ्या कार्यकर्त्यांनीही कधीतरी आमदार झालं पाहिजे. त्यासाठीच मी भांडतोय.  मग पार्टी सोडायला लागली तरी चालेल.’’
अण्णासाहेबांच्या या माहितीने सगळेच कार्यकर्ते विचारात पडले. त्यांनी पक्षातून असं बाहेर पडणं त्यांना पटत नव्हतं. पण त्यांच्या तोंडावर उघडपणे सांगणं शक्य नव्हतं. त्यामुळे गप्प बसलेल्या कार्यकर्त्यांमधील शांतता आणखीनच वाढली. ती विचित्र शांतता अण्णासाहेबांना मोठय़ा संकटाची चाहूल वाटत होती. कारण आपण आपल्या स्वार्थासाठी पार्टी सोडतोय हे त्यांना माहीत होतं. पार्टीने तरुणांना संधी देण्याचं धोरण अवलंबलं, स्त्रियांनाही संधी देण्याचं ठरवलं. त्यामुळे अण्णासाहेबांसारख्या काही नेत्यांना पार्टीकडून तिकीट मिळण्याची शक्यता कमी झाली. आपलं अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळेच त्यांनी बंडखोरी करण्याची तयारी केली होती. हे न कळण्याइतके कार्यकर्ते आता मूर्ख राहिलेले नाहीत हे ते ओळखून आहेत. तरीसुद्धा आपल्या घराण्याची सत्ता टिकविण्यासाठी त्यांनी केलेलं धाडस आणि त्यातून घेतलेला निर्णय त्यांनी सर्वासमोर सांगितला. त्यांना माहीत आहे, की यामुळे चार-दोन कार्यकर्ते नाराज होतील, पण आता पैसे फेकले की पाहिजे तेवढे कार्यकर्ते मिळतात हे सुद्धा ते जाणतात. त्यामुळे पैसा आहे तोपर्यंत अण्णासाहेबांना कार्यकर्त्यांची चिंता नसली, तरी थोडय़ा नाराजीनेच सर्व कार्यकर्ते त्यांच्या घरून परतले. पुढारी, चेअरमन आणि कांबळेसर या त्रिकुटाला मात्र त्यांनी त्या दिवशी आपल्याकडे मुक्कामीच ठेवून घेतलं.

(क्रमश:)

– बबन मिंडे