रात्री जेवणं झाल्यानंतर अण्णासाहेब आपल्या प्रशस्त घराच्या हॉलमध्ये मंद प्रकाशात या त्रिकुटाला घेऊन बसले. काही महत्त्वाच्या गोष्टी सर्व कार्यकर्त्यांना सांगण्यापेक्षा मोजक्याच, पण विश्वासातल्या कार्यकर्त्यांना सांगण्याची त्यांची ही जुनी पद्धत. तिघांकडे बघत अगदी मनापासून ते मनातलं सांगायला लागले. म्हणाले,
‘‘माझ्या इथंपर्यंतच्या प्रवासात मला प्रामाणिकपणे साथ देणारी जी थोडी माणसं आहेत. त्यापैकीच तुम्ही. आणि म्हणूनच आज मी तुम्हाला थांबवून घेतलंय.. पक्षातून बाहेर पडण्याचा माझा निर्णय कदाचित तुम्हाला आवडला नसणार…’’
‘‘छे! छे! तुम्ही जे काय करणार ते विचारपूर्वकच…’’
कांबळेसरांनी मध्ये बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना थांबवून माझं ऐकूण घ्या म्हणत ते पुन्हा पुढे बोलायला लागले. म्हणाले,
‘‘राजकारण खेळायचं म्हणजे काही तडजोडी कराव्या लागतात. त्याशिवाय सत्ता मिळत नाही आणि मिळाली तरी टिकून राहत नाही. आम्ही तडजोडी केल्या, गैर मार्ग अवलंबले, कारण ते आम्ही केलं नसतं तर दुसरं कोणीतरी केलंच असतं. त्यांनी घडणाऱया गोष्टीत काहीच फरक पडला नसता. फक्त घराणं बदललं असतं. आता या सत्तेची इतकी सवय झाली की ती जाण्याची कल्पनाच सहन होत नाही. या राजकारणात सत्ता मिळाली आणि अण्णासाहेब मोहित्यांचा जन्म झाला. आता ती सत्ता जाणं म्हणजे अण्णासाहेब मोहित्यांचा एक प्रकारचा मृत्यूच आहे. मग स्वत:च्या मृत्यूचं भय कोणाला वाटणार नाही. त्या भयापोटीच आम्ही काही आमदारांनी पार्टीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.’’
यावर पुढारी थोडा विचार करून बोलला. म्हणाला,
‘‘अण्णासाहेब, पार्टीतून बाहेर पडून निवडणूक जिंकणं अवघड आहे. जामगाव साक्षर झाल्यापासून मतदारसंघातलं चित्र बदललंय. मोबाइल, सोशल मीडिया आणि न्यूज च्यानेलमुळं कुणतीही गोष्ट एका क्षणात सगळीकडं पोचती. त्यातूनच विद्याच्या सत्काराने सगळा गोंधळ झालाय. तिनं उभी केलेल्या अलकाला आम्ही प्रयत्न करूनही पाडू शकलो नाही. आणि तुम्ही पार्टीतून बाहेर पडताय म्हणजे प्रकाशला आयतीच संधी मिळणार.’’
 ‘‘शक्यता आहे. पण तो उभा राहिल्याने आपल्या मतांवर फार फरक पडेल असं वाटत नाही. पंचायत समिती आपल्या ताब्यात आहे, म्हणजे तालुक्यावर आपला दबदबा आहे. चार गावं त्याच्या मागं आहेत. तेवढय़ावर निवडून येणं अवघड आहे. आणि राजकीय डाव खेळण्यात अजून तो कच्चा आहे.’’
अण्णासाहेबांनी प्रकाश आपल्याला फार मोठा अडसर ठरू शकत नाही हे आपल्या आजवरच्या अनुभवावरून सांगितलं.
पण काहीच न बोलणाऱया चेअरमनलाही अण्णासाहेबांनी पार्टी सोडणं तितकसं पटत नव्हतं. पार्टी न सोडता घराणं कसं टिकविता येईल या विचारात असतानाच त्याला अण्णासाहेबांच्या मुलाची, बाळासाहेबांची आठवण झाली. आणि तो एकदम बोलून गेला. म्हणाला,
‘‘अण्णासाहेब, पार्टी तरुणांनाच संधी देणार असेल, तर बाळासाहेब आहेत आपल्याकडं. पार्टीतून बाहेर पडण्यापेक्षा त्यांचं नाव सूचवा.’’
पुढाऱयाला आणि कांबळेसरांनाही चेअरमनची ही कल्पना आवडली. त्यांनीही तसं अण्णासाहेबांना सुचवलं.
यावर मात्र अण्णासाहेब काही बोलण्यास उत्सुक दिसेनात.
खरं तर त्यांनी बाळासाहेबांचा विचार केला नव्हता, असं नव्हतं. आपल्या नावाखाली बाळासाहेबांना घराण्याची गादी पुढं चालवणं अवघडही जाणार नव्हतं. पण प्रश्न होता पार्टीने स्वीकारलेल्या धोरणाचा. पार्टीला पार्टीसाठी झटणारे तरुण पाहिजे होते. तरुण रक्त मिळालं तर ती मजबूत होईल. कारण सध्याच्या परिस्थितीतली घराणेशाही आणि त्याचत्याच नेत्यांचा चेहरा  लोकांना आता नको होता, हे पार्टीला मागच्या निवडणुकीत मिळालेल्या कमी जागांमुळे कळून चुकलं होतं. त्या फटक्यामुळेच त्यांच्यावर त्रिशंकू सरकार स्थापण करून ते कोसळताना बघण्याची वेळ आली होती. पार्टीच्या हितासाठी अहोरात्र झटणारे कार्यकर्ते महाराष्ट्रात कमी नाहीत तसेच अण्णासाहेबांच्या मतदारसंघातही कमी नाहीत. त्यापैकीच कोणाचा तरी विचार व्हावा असं पार्टीअध्यक्षांचं मत.
पण बाळासाहेबांना आपला मतदारसंघ कुठून कुठपर्यंत आहे तेच अजून माहीत नाही. त्यातच दोन वर्षांपूर्वी जमीन व्यवहारात आलेलं त्याचं नाव. त्यातून दाखल झालेला गुन्हा…मग ते प्रकरण मिटवण्यासाठी अण्णासाहेबांनी वापरलेलं आपलं वजन…यातून नाही म्हटलं तरी तालुक्यात बाळासाहेबांची प्रतिमा थोडी मलिनच झालेली. मात्र अण्णासाहेब आपली प्रतिमा सांभाळून आहेत. अनेक वर्षे परदेशात शिक्षणासाठी घालवलेल्या आणि शहरामध्ये विलासी जीवन जगण्यात रमलेल्या बाळासाहेबांची मतदारांशी ओळख केवळ अण्णासाहेबांचा मुलगा एवढीच आहे. अण्णासाहेब एवढय़ा ओळखीनेही बाजी मारून नेतील, पण अंतर्गत फुटीने बाळासाहेबांना उभं करणं  त्यांना धोक्याचं वाटतं. सध्याच्या परिस्थितीत घराण्याची सत्ता टिकवायची असेल तर तिथं अण्णासाहेबांसारखाच, नव्हे अण्णासाहेबच पाहिजे हे ते ओळखून आहेत.
त्यामुळे पुढच्या लोकसभेला आपण उभं राहायचं आणि हा मतदारसंघ बाळासाहेबांसाठी तयार करायचा ही अण्णासाहेबांची कल्पना मध्यावधी निवडणुकीने जागेवरच राहिली.
मग केवळ घराण्याची सत्ता टिकविण्याच्या स्वार्थापोटी अण्णासाहेबांनी पार्टीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
पण चेअरमनने बाळासाहेबांचा विषय छेडला, तेव्हा त्याला काहीतरी उत्तर दिलंच पाहिजे म्हणून ते म्हणाले,
‘‘चेअरमन, वेळ आली तर बाळासाहेबांना उभं करूच, पण सध्याच्या परिस्थितीत सत्ता बाहेर जाऊन द्यायची नाही. कारण सत्ता ही मधाच्या बोटासारखी आहे. ते बोट दुसऱया कोणाच्या जिभेला लागलं तर इथं नवं घराणं निर्माण होण्यास वेळ लागणार नाही.’’
अण्णासाहेबांना काय म्हणायचं आहे ते या त्रिकुटाला समजलं नाही तरच नवल! अण्णासाहेबांची ही नीती स्वार्थासाठी आहे, हे त्यांना कळतंय. पण यांचीही मने स्वार्थानेच बरबटलेली आहेत. शेवटी अण्णासाहेब आहेत म्हणून ते आहेत. म्हणजे एका अर्थाने अण्णासाहेबांचा स्वार्थ हा त्यांचाही स्वार्थच आहे. मग अण्णासाहेबांच्या या राजनीतीवर कोण कशाला नाराज होईल!
पुढाऱयाने तर अण्णासाहेब जे काही करतील तीच पूर्वदिशा समजून विषयच बदलला. म्हणाला,
‘‘अण्णासाहेब, दोन बंधारे मंजूर होऊन सहा महिने झालेत. काम चालू करायचं, का निवडणूक होऊन द्यायची ?’’
‘‘आता आधीमधी कसलीच कामं घेऊ नका. ती कामं करण्याची आश्वासनं मात्र द्या. आणि जामगावमधल्या बंधाऱयासंदर्भात तर वादच निर्माण होण्याची शक्यता आहे. तेव्हा तो बंधारा सध्या कागदावरच राहू द्या. आता महत्त्वाची आहे ती निवडणूक. पार्टीतल्या या वादाचं काय होतंय हे पाहण्यासाठी मला सारखी पुण्या-मुंबईला धावपळ करावी लागणार आहे. तेव्हा आता तालुक्यात कार्यकर्त्यांना एकत्र जमविण्याचं काम तुमचं. पैशाची कसलीही चिंता करायची नाही. उद्या जाताना आपली जीप घेऊन जावा. दोन दिवसात डिझेलची तिपाडं पाठवतो. प्रत्येक गावात सभा झाली पाहिजे. प्रत्येक मतदारापर्यंत आपल्याला पोचलं पाहिजे.’’
‘‘पण तुम्ही एकदा गावात येऊन कार्यकर्त्यांशी बोलून गेला असता तर बरं झालं असतं.’’
कांबळेसरांनी अण्णासाहेबांना गावात येण्याचं सूचवलं. पण  त्यांच्या दृष्टीने आता महत्त्वाचा होता तो पार्टीअंतर्गत वाद.
 ‘‘कांबळेसर, दोन-चार दिवसांत आम्ही गावात येतोच आहे. पहिल्यांदा पार्टीअध्यक्षांच्या आणि आमच्या वादाचं काय होतंय ते पाहिलं पाहिजे. प्रचाराची तयारी करण्याआधी निवडणूक कशी लढवायची ते ठरवलं पाहिजे.’’
यावर मग कोणीच काही बोललं नाही.
दुसऱया दिवशी अण्णासाहेबांची जीप घेऊन हे त्रिकुट जामगावला परतलं.

(क्रमश:)

– बबन मिंडे