रामाच्या बावळ्या वेषात काय दडलंय ते चेअरमन आणि पुढाऱयाच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. तिघंही क्षणभर निःशब्द झाले. मग चेअरमनच कोंडलेला श्वास सोडत बोलायला लागला. म्हणाला,
‘‘विद्या अण्णासाहेबांची भाची आहे म्हणून असेल कदाचित, पण पोरीच्या कामाकडं कानाडोळा करून चालणार नाही. गावातल्या या सगळ्या दगडांना लिहायला वाचायला शिकवायचं म्हणजे साधं काम नाही. एका वर्षांत तिनं सगळा गाव साक्षर केला आहे. जिल्ह्यातलं पहिलं गाव आहे हे आणि ते सुद्धा अण्णासाहेबांच्या मतदारसंघातलं. तेव्हा या सत्कारामागे अण्णासाहेबांचाही काही उद्देश असेल. सत्कारार्थीचं तर नाव होणारच, पण अण्णासाहेबांचंही झाल्यावाचून राहणार नाही. आणि त्यात ती त्यांची भाची. त्याचंही भांडवल केल्याशिवाय राहणार नाहीत ते… काय पुढारी, तुम्हाला काय वाटतं?’’
‘‘तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. पण इतर ठिकाणच्या अनुभवावरून बायकांना जास्त डोक्यावर बसवणं  बरोबर नाय. या सत्कारानी अण्णासाहेब आपल्या भागात एका मोठय़ा हस्तीला जन्माला घालत्यात. याचाही विचार करायला पायजे व्हता त्यांनी. माणसाला एकदा सत्काराची सवय झाली की, ती शेवटपर्यंत सुटत नाय.’’
‘‘आणि त्यात विद्याचा नवरा आपल्याच पक्षातला असला तरी विरोधी  गटातला. या सत्कारानी बसलेली घडी विस्कटू नये म्हणजे झालं.’’
चेअरमनही मग अंदाज बांधायला लागला. वातावरण एकदमच गंभीर झालं. म्हणून रामाच मध्ये बोलला. म्हणाला,
‘‘जाऊ द्या, काहीबाही आळूयेळून काय व्हणारंय. आता या घडीला तुमाला काय करायचं हाये ते बघा.’’
‘‘ते पण खरंच आहे.’’
म्हणत पुढारी खुर्चीतून उठला. चेअरमनच्या हातातला बॅनर घेऊन जाताजाता रामाला सूचना देऊ लागला. म्हणाला,
‘‘रामा, मी कार्यक्रमाच्या ठिकाणी चाललोय. अण्णासाहेबांचा मोबाइल लागत नाही, पण तुला फोन आला की मला निरोप पाठव. ते डायरेक कार्यक्रमाच्या ठिकाणी येणार आहेत, का पहिले घरी येणार तेही विचार.’’
पुढारी वाड्याबाहेर पडला आणि पाठोपाठ चेअरमननेही आपली जागा सोडली. घड्याळाकडे बघत तो रामाला म्हणाला,
‘‘सगळ्यांचेच डोळे अण्णासाहेबांकडं लागलेत. रामा, आता तीन वाजलेत. इथं जो कुणी येईल त्याला कार्यक्रमाच्या ठिकाणीच पाठवायचं आणि महत्त्वाचं म्हणजे कार्यक्रम सुरू झाला की वैणींना घरातच थांबायला सांग, नाहीतर तिकडं सत्कार होईल आणि इकडं घर साफ होईल.’’
‘‘असल्या गोष्टी कळत नाय का आमाला, चेअरमन.’’
‘‘सगळं कळत असलं तरी काही गोष्टींची आठवण करून दिलेली चांगलं असतं.’’
‘‘असं का? मंग आपल्यालाही तिकडची तयारी करण्याची आठवण करून द्यायला पायजे.’’
‘‘आरे, हो.’’
म्हणत जीभ दाताखाली धरून चेअरमन घाईघाईत निघून गेला.

गावाबाहेर शाळेसमोरच्या मैदानात कार्यक्रमाची सर्व तयारी झाली होती. आकर्षक भल्यामोठय़ा स्टेजभोवती कार्यकर्त्यांची गडबड मात्र अजून चालूच होती. सजवलेला स्टेज मोठा देखणा दिसत होता. कार्यकर्ते सारखे त्याच्याकडे न्याहाळून बघत होते. मागच्या बाजूला सोडलेल्या फुलांच्या माळा, लांबलचक बॅनर, टेबल-खुच्र्या… सगळंसगळं व्यवस्थित करण्याचा प्रयत्न. मध्येच एखादा कार्यकर्ता स्टेजवर जायचा, नीटनेटकी लावलेली खुर्ची नुसतीच हालवून परत यायचा. मग दुसरा कोणीतरी वर जाऊन माईक फुकत बसायचा. हॅलो हॅलो, माईक चेक, माईक चेक म्हणून परत खाली यायचा.
 नाही म्हटलं तरी मैदान आता भरत आलं होतं. कार्यकर्त्यांनी महिलांना एका बाजूला आणि पुरुषांना एका बाजूला, अशी बसण्याची सोय केली होती. पुरुषांना स्त्रियांच्या बाजूला आणि स्त्रियांना पुरुषांच्या बाजूला जाता येऊ नये म्हणून मैदानाच्या मध्ये सुरुवातीपासून पार शेवटपर्यंत बांबू लावले होते. हे वेगळेपण नजरेत चटकण भरत होतं. रोज एकमेकांत सहजपणे वावरणारे, एकमेकांशिवाय अधुरे वाटणारे या मैदानात मात्र आपल्यातला वेगळेपणा दाखवत होते. एकमेकांकडे उत्सुकतेनं पाहात होते. पुरुषांची निर्भिड नजर स्त्रियांच्या चोरटय़ा नजरेला जमीन दाखवत होती.
या मैदानात एका बांबूने, केवळ एका बांबूने एका समाजात दोन समाज आहेत हे दाखवून दिलं होतं. एका एकजीव समाजाचे दोन तुकडे. केवढी ताकद आहे त्या बांबूत! आणि त्याहूनही अधिक तो बांबू लावणाऱयाच्या हातात.
स्टेजच्या अवतीभोवती मात्र एकही स्त्री कार्यकर्ती दिसत नव्हती. तिथं सगळा पुरुषांचाच बाजार होता, हातातल्या पॅडला चार-पाच कागद लावून आणि मोबाइल सतत कानाला लावून फिरत कांबळेसर सर्वकाही मीच करतोय, अशा अविर्भावात मिरवत होते. माईकवाल्याकडे जाऊन त्याला सारखे काही ना काही सांगत होते. शेवटी न राहून त्या माईकवाल्याने त्यांना हटकलच. म्हणाला,
‘‘कांबळेसर, तुमच्या आधी मला काळजी आहे तुमचा आवाज सर्वांपर्यंत पोचवण्याची. धंदा बंद करायचा नाय मला! आन् तुमी बायकांवाणी थोडंच बोलणारंय घसा आकसून! वर्गात बोलता तसं रांगडं बोला, माईकची गरजसुद्धा लागणार नाय तुमाला.’’
‘‘मला माझ्या आवाजाची कल्पना आहे. पण तरी मागच्या प्रचारसभेत झाला तसा गोंधळ व्हायला नको. आम्ही काय नुसतीच फालतू बडबड करीत नसतो. काहीतरी विचार असतात त्यात. ते सर्वांपर्यंत पोचले, की बरं वाटतं.’’
एवढय़ात पुढारी घाईघाईत स्टेजजवळ आला. कांबळेसरांचा आवाज ऐकूण त्यांच्याजवळ गेला. त्यांचा हात धरला. म्हणाला,
 ‘‘जाऊ द्या हो कांबळेसर, विश्वासातली माणसं आहेत ती, बरोबर करतील सगळं.’’
 ‘‘अहो, मागच्या प्रचारसभेतला अनुभव…’’
‘‘कांबळेसर, ती प्रचारसभा होती. आणि तो विरोधी पार्टीतल्या लोकांचा डाव व्हता. एक धडा मिळाला आपल्याला. परत नाय व्हणार तसं, आणि झालं तरी त्याला काय पर्याय नसतो.’’
बोलता बोलताच त्यानी कांबळेसरांना बाजूला घेतलं. आणि स्टेजवर मागच्या बाजूला लावलेला बॅनर दाखवत म्हणाला,
‘‘तो बॅनर बघा.’’
‘‘काय झालं? तिरका लागला का? सरकवून घेऊ?’’
बॅनरकडे बघत कांबळेसर म्हणाले. तसे आजूबाजूला बघत पुढारी त्यांच्या कानात पुटपुटला,
‘‘कांबळेसर, बॅनरवर अण्णांसाहेबांचं नाव बघा आणि त्या विद्या जाधवच नाव बघा. तिच्या नावाने अण्णासाहेबांचं नाव पार खाऊन टाकलंय. नजरेत भरतंय ते तिचं नाव, अण्णासाहेब गेले कोपऱयात.’’
कांबळेसरांनी पुढाऱयाच्या वैतागलेल्या चेहऱयाकडे पाहिलं. एवढी साधी गोष्ट आपल्या लक्षात आली नाही याचं त्यांना वाईट वाटलं. पण त्याहूनही अधिक हूरहूर लागून राहिली ती उद्या पुढारी अण्णासाहेबांना ही गोष्ट सांगून त्यांची शाबासकी मिळवतील याची. मग स्वतःलाच दोष देत त्यांनी हातातलं पॅड डोळ्यासमोर धरलं. त्यातली पानं वरखाली करत ते पुढाऱयाला म्हणाले,
‘‘जाऊ द्या पुढारी, शेवटी लोकांचं कान भरण्याचं काम आपल्याकडंच आहे. तिथं करू बरोबर लेवल.’’
‘‘कोणाची लेवल करताय? आमची तर नाही ना!’’
असं म्हणत चेअरमन त्यांना येऊन मिळाला. मग त्यांच्या चर्चेला आणखीनच रंग चढला. सोमा पेंटरच्या नावाने जेवढा शंख फुंकता येईल तेवढा फुंकला.

बऱयाच वेळानंतर रामाने येऊन सांगितलं. म्हणाला,
 ‘‘अण्णासाहेबांचा फोन आला व्हता. ते डायरेक कार्यक्रमाच्या ठिकाणीच येणार हायेत. आणि आज रात्री मुक्कामाला इथंच ऱहाणार हायेत. सरपंचांनाबी मोबाइलवर सांगितलंय त्यांनी.’’
रामा निरोप सांगून गेला आन् मग तिघे तीन दिशेला हुकूम सोडत पांगले.

(क्रमशः)

– बबन मिंडे