पण आपण तेवढय़ासाठी निवडणूक लढविली नाही. आपल्याला काहीतरी वेगळं करायचं आहे. एका ठिकाणी एकवटलेली सत्ता उखडून  काढायची. लोकांनी दिलेल्या सत्तेचा केवळ स्वत:साठीच उपयोग करणाऱयाच्या विरोधात आहोत आपण. असं घराणं नष्ट करण्याच्या उद्देशाने आपण निवडणूक लढविली, पण सध्याचं चित्र पाहता तिला इथंही परिस्थिती तिकडच्या सारखीच दिसायला लागली. म्हणजे या सत्तेने केवळ घराणं बदलल्यासारखं झालं आणि ते आपल्याला होऊन द्यायचं नाही.
पण प्रकाशच्या ताब्यात असंच सगळं जात राहिलं तर आपण निवडून येण्यानं केवळ एकच बदल होईल, आणि तो म्हणजे एका नव्या राजकीय घराण्याचा जन्म आणि ते घराणंही मागच्या घराण्याचा वारसा पुढं चालविणारं.
याला वेळीच आळा घातला पाहिजे. प्रकाशने सगळ्याच गोष्टी आपल्या ताब्यात घेऊन आपल्याला पांगळी करण्याआधी आपण पाऊल उचललं पाहिजे. असा मनात विचार करूनच ती अलकाला म्हणाली,
‘‘अलका, राखीव जागेचा फायदा घेऊन आपण निवडून येतो, आणि सत्ता नवऱयाच्या ताब्यात देऊन मोकळे होतो. खरं तर कशाची माहिती नसताना, क्षमता नसताना आपण हे धाडस करतो आणि दुसऱयांना बोकाळायला संधी देतो. खरं तर आपण पहिल्यांदा अशा जबाबदारीच्या गोष्टी पेलण्यासाठी सक्षम झालं पाहिजे. पुरुषांच्या वर्चस्वाखाली आपली मानसिकता बदलली पाहिजे. आपणही ती सगळी कामं करू, असा आत्मविश्वास आपण आपल्यात निर्माण केला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, संकोच सोडून दिला पाहिजे. संस्कृतीच्या नावाखाली आपल्या समाजाने घातलेली आणि आपल्या मनाने स्वीकारलेली बंधनं झुगारून दिली पाहिजे. सर्वप्रथम आपण मनाने स्वतंत्र झालं पाहिजे. म्हणजे आपल्या पायातल्या  बेडय़ा आपोआप गळून पडतील. असं खऱया अर्थानं मुक्त झाल्यावर मग कसल्या आरक्षणाची, कसल्या राखीव जागेची गरज उरणार नाही. अशा सर्वार्थाने सक्षम स्त्रिया स्वत: होऊनच असल्या गोष्टी नाकारून  पुरुषांच्या बरोबरीने लढतील.. पण स्त्रियांची ही मानसिकता बदलायला वेळ लागणार. ती घडायला जितका वेळ लागला, त्यापेक्षाही जास्त वेळ.’’
‘‘पण असं नुसतं म्हणून काय उपयोग! याला सुरुवात कोणी तरी केलीच पाहिजे ना!’’
‘‘आपण करायची.’’
 मोठय़ा निर्धाराने विद्या म्हणाली. अलकाला तिच्याकडून ती अपेक्षा होतीच. पण तरीही मनात शंका आली म्हणून तिनं विचारलं. म्हणाली,
‘‘पण तुला प्रकाश या सगळ्या गोष्टी करून देईन का?’’ अलकाच्या या शंकेने विद्याच्या चेहऱयावर अलकाला थोडी नाराजी दिसली. पण तरी शांतपणे विचार करत ती म्हणाली,
 ‘‘त्यांनी या सगळ्या गोष्टीत लक्ष घालायला सुरुवात केली आहे, म्हणजे मला मागे ठेवण्याचाच त्यांचा विचार असणार. आणि मी एकदा मागे पडले की कायमचीच मागे पडणार. मग आयुष्यभर त्यांच्या बोटावर नाचत राहणार. मग तेही मन मानेल तसे खेळवत राहणार… म्हणून सुरुवातीलाच विरोध केला पाहिजे. कंबर कसून आपणच सगळ्या गोष्टीत पुढाकार घेतला पाहिजे. ज्या गोष्टी माहीत नाहीत त्या गोष्टी माहीत करून घेतल्या पाहिजेत. लोकांशी संपर्क वाढवला पाहिजे. भीडभाड सोडून दिली पाहिजे.’’
‘‘पण कशी?’’
‘‘सगळा कारभार आपल्या हातात घेऊन.’’
‘‘तो सहजासहजी सोडणार आहे का ते सगळं?’’
‘‘ते सोडणार नसले तरी तो आपण घ्यायचा. कोणत्याही गोष्टीवर विचार करून निर्णय घ्यायला शिकलं पाहिजे आता. तालुक्याच्या ठिकाणी आपलं संपर्क कार्यालय सुरू झालंय. सुरू झाल्यापासून हेच जातात तिथं. त्यामुळे सर्वाशी संपर्क यांचाच.. पण आता आपण जायचं तिथं. थेट आपण राह्यचं लोकांच्या संपर्कात. आपली जबाबदारी समजून घ्यायची. कामं जाणून घ्यायची. लोकांच्या अडचणी समजून घ्यायच्या. त्या दूर करण्याचा आपण स्वत: प्रयत्न करायचा. आणि ते सांगतात म्हणून केवळ कशावरही सही करायची नाही.’’
विद्याचा हा निर्धार पाहून अलकाला तिचा हेवा वाटला. वाटलं तिच्यात असला निर्णय घेण्याचं धाडस तरी आहे. आपल्यात आणि  नंदात तर तेही नाही. बरं झालं आपण सभापती झालो नाही. नाहीतर काशीबाईसारखीच तालुकाभर आपलीही आता चेष्टा होत राहिली असती.  विद्याच्या धाडसाचं मात्र तिला कौतुक वाटलं. ते सांगण्यासाठीच मग ती नंदाकडे गेली.
आता हे एकदा प्रकाशच्या कानावर घालून आपल्या कामाला आपण सुरुवात करावी, या उद्देशाने रात्री विद्या प्रकाशची वाट पाहत बसली.                                                  तो नेहमीप्रमाणेच उशिरा आला.                                                                        जेवण झाल्यावर तिनं विषय काढला. दबक्या आवाजात, पण ठाम निर्णयाने ती म्हणाली,
‘‘उद्यापासून मी संपर्क कार्यालयात येणार आहे.’’
प्रकाश तिच्याकडे बघतच राहिला. ती असं काही अनपेक्षित बोलेल याची त्याने कल्पनाच केली नव्हती. ती कार्यालयात येऊन काय करणार, सगळं तर मी बघत आहे, असं समजून तो सहजपणे म्हणाला,
 ‘‘कशाला?’’
‘‘कशाला म्हणजे? आमदार कशाला झाले मी?’’
‘‘काही आवश्यकता वाटत नाही मला. गरज असेल तेव्हा मी बोलवत जाईल. सध्या तरी सगळं व्यवस्थित बघतोय मी.’’
विद्याला प्रकाशच्या अशा बोलण्याचा राग आला. तसे काय हेच आमदार! गरज असेल तेव्हाच मला बोलवणार, बाकी वेळ घरात कोंडून ठेवणार. म्हणजे आमदार होऊनही किंमत काय आपली! सहन न होऊन मग ती शेवटी रागारागानेच म्हणाली,
‘‘तुम्हाला माझी गरज केव्हा लागते आणि केव्हा लागणार आहे ते मला चांगलं माहीत आहे. तुमच्या गरजेची वाट पाहत नाही बसायचं मला आणि आता केवळ तुमचीच गरज नाही बघायची मला…’’
‘‘बाकीच्यांच्या गरजा समजून घ्यायला आणि त्या पूर्ण करायला मी समर्थ आहे. तुझ्यापेक्षा त्या गोष्टी मला चांगल्या पार पाडता येतील.’’
प्रकाशच्या बोलण्याच्या रोखावरून तो विद्याला रोज सहजासहजी संपर्क कार्यालयात येऊन देणार नव्हता. त्याला माहिती आहे, की एकदा विद्या पुढं यायला लागली, की आपण आपोआप मागे पडत जाणार आहोत. आणि केवळ बायकोचं शेपूट बनणार आहोत.
पण इथं त्याला स्वत:ला मिरवायचं होतं. विद्याला समोर आणली, की माणसं तिच्याभोवतीच गोळा होणार, जे काही चालणार ते तिच्यामार्फत. आपण अगदी सहजपणे दुर्लक्षिले जाणार. तिचं महत्त्व वाढणार. आपलं कमी होणारं. आणि असलं कमीपणाचं, लाजिरवाणं जगणं त्याला नको होतं, म्हणून त्याचा हा आटापिटा.
 आपल्या या निर्णयाला प्रकाश विरोध करणार हे विद्याला माहीत होतं. पण तो आपल्याला  इतका किरकोळ समजत आहे हे पाहून तिची  त्याच्याशी बोलण्याची इच्छा राहिली नाही. तो आपलं म्हणनं सहजासहजी मान्य करणार नाही. उगाच शब्दांनी शब्द वाढवून भांडणं करण्यापेक्षा काहीच न बोलता हिम्मत करून आपण प्रत्यक्ष कृतीच केलेली बरी. मनाशी असा पक्का विचार करून ती त्याच्यासमोरून उठली.
दुसऱया दिवशी प्रकाश कसल्यातरी कामासाठी पुण्याला गेला.
सरूआक्काला सांगून विद्याही दुपारच्या आत अलकाला घेऊन तालुक्याला कार्यालयात पोहोचली.

(क्रमश:)

– बबन मिंडे