पण अण्णासाहेब त्याचे हे कृत्य नजरेआड करणारे नाहीत. इथं माणसं जशी पोसावी लागतात, तशी वेळ पडली तर ती मारावीही लागतात. मग ते मारणं कधी मानसिक पातळीवरचं असतं तर कधी शारीरिक. इतकी वर्षे सत्ता भोगणाऱया अण्णासाहेबांना या गोष्टी नवीन नाहीत. त्यामुळेच सतूच्या या करणीनं त्यांना धक्का बसला असला, तरी ते हताश झाले नाहीत. वेळ आली की एक ना एक दिवस सतूला याचं प्रत्युत्तर देणार. पण सध्यातरी गप्प बसणंच त्यांना शहाणपणाचं वाटत होतं.
सध्यातरी विद्याची सरशी आहे. आणि तिच्या छायेखाली सतू निर्धास्त आहे. त्यासाठी आपल्याला आपली ताकद गहाण ठेवावी लागत आहे, याची जाणीव मात्र अजूनही त्याला नाही.
विद्याच्या उपोषणाने तालुकाभर खळबळ उडाली. गावोगावची माणसं विद्याला आणि तिच्या सहकाऱयांना भेटू लागली. जामगाव, फणसी आणि जांभूळवाडी अशी बंधाऱयाचा फायदा असणारी गावं जागी झाली. तालुक्याला ठाण मांडून बसली.
हळूहळू जिल्हाभर चर्चा होऊ लागली. मंत्रिमंडळापर्यंत प्रश्न गेला.
आतापर्यंत उंबराच्या माळावरच बंधारा बांधण्यासाठी हटून बसलेल्या अण्णासाहेबांची कोंडी झाली. नुकत्याच स्थापन झालेल्या पक्षातल्या काही नेत्यांनी पक्षहितासाठी  अण्णासाहेबांना बंधाऱयाचा नाद सोडून देण्याचा आग्रह केला. पण उंबराच्या माळाच्या त्या पडिक माळरानावर त्यांनी केलेला खर्च त्यांना माघार घेऊन देत नव्हता आणि या परिस्थितीत माघार म्हणजे आपल्या स्वार्थीवृत्तीची कबुलीच होती.
बंधाऱयाची जागा बदलून आपण चूक केली याची जाणीव खऱया अर्थानं त्यांना आता झाली. आज तालुकाभर अण्णासाहेबांची जी प्रतिमा आहे ती तयार होण्यास पन्नास वर्षांचा अवधी लागला आहे. आणि आज या घटनेने ती एका क्षणात धुळीत मिळण्याची वेळ आली आहे. आता बंधाऱयाची जागा बदलणं हा त्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न झाला आहे.
एक वेळ आपण केलेला खर्च ते सोडूनही देतील, पण असं करण्याने त्यांचं खरं रूप लपून राहणार नाही.
आता प्रश्न केवळ बंधाऱयाचा उरला नाही, तो अण्णासाहेबांच्या प्रतिष्ठेचा  झाला आहे.
उपोषणाच्या तिसऱया दिवशीच जिल्हाधिकारी आले. त्यांनी विद्याशी आणि तिच्याबरोबर उपोषणाला बसलेल्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली. परिस्थिती लक्षात घेऊन त्यांनी बंधाऱयाला मान्यता देणाऱया अधिकाऱयाना बोलावून घेतलं. जागेची पाहणी पुन्हा करायचं ठरलं. पाहणी करायला जाण्याचा दिवसही ठरवला.
त्या जागेवर बंधारा बांधल्याने मोजक्याच लोकांना पाणी मिळणार असेल, आणि बंधाऱयात पाणीच साठणार नसेल तर जास्तीत जास्त लोकांना पाणी मिळू शकेल अशा कोंडीवर तो बांधला जाईल. त्यासाठी जिल्हाधिकारी पाटबंधारे खात्यातील अधिकाऱयाशी बोलण्याचं आश्वासन देऊन गेले. त्यांचं आश्वासन मिळाल्यामुळं विद्याने आणि तिच्या सहकाऱयानी उपोषण सोडलं.
प्रकाशनेही पाटबंधारे मंत्र्यांपर्यंत ही गोष्ट पोहोचवली.
पुढच्या दोन दिवसांनी जिल्हाधिकारी आणि बंधाऱयाला मान्यता देणारे अधिकारी उंबराच्या माळावर आले. यावेळेस विद्याही तिथं पोहोचली. तिला तो माळ आणि त्याच्या आसपासची जमीन पाहून आश्चर्य वाटलं. थक्क होऊन लांबपर्यंत सपाट झालेल्या त्या जमिनीकडे ती नुसतीच पाहत राहिली. किती मोठमोठय़ा दगडी होत्या त्या माळावर! आसपास उंच टेकडय़ा, चढ-उतार, पण आता सगळं सपाट झालंय. सलग चाळीस – पन्नास एकराचं रान.
दुपारच्या रणरणत्या उन्हात जिथं हवा सुद्धा फिरकत नाही, तिथं अण्णासाहेबांचा गडी रामा रानाची राखण करीत झाडाखाली निवांत बसला होता.
अधिकाऱयाने सगळ्या जमिनीची पाहणी केली. माळाशेजारचा ओढा, तिथं पाणी साठण्याची क्षमता. या सगळ्या गोष्टींची चर्चा झाली. आणि या सर्व गोष्टी होत असताना रामा मात्र त्यांच्याजवळ अजिबात फिरकला नाही. या गोष्टींशी आपला कसला संबंध नसल्यासारखा त्यांच्याकडे नुसता पाहत राहिला.
मुद्दामून आलेल्या रोहिदासने मात्र जिल्हाधिकाऱयांना रानाची सर्व माहिती सांगितली. इथं बंधारा झाल्याने कोणाकोणाला फायदा होईल आणि कोणाकोणाला  तोटा होईल याची यादीच त्याने मांडली. तेव्हा झाडाखाली बसलेल्या रामाचे कान सशासारखे टवकारले
सगळी माहिती घेऊन अधिकारी निघून गेले.
आठवडय़ाच्या आत दैनिक लोकशाहीमध्ये बंधाऱयाची जागा बदलल्याची बातमी आली. आणि ती जागा तिन्ही गावांच्यामध्ये कोंडीवर नक्की झाली.
तालुकाभर पुन्हा एकदा विद्याचं कौतुक झालं.
अण्णासाहेबांच्या विरोधात आपल्या घराण्याचे पाय तिनं अजून खोल नेले.

बंधाऱयाचं प्रकरण मिटतंय न मिटतंय तेच तालुक्यातील ग्रामविकास योजनांमधील प्रश्न उभे राहिले. डोंगरगाव, फणसी, आदरवाडी, जामगाव, जांभूळवाडी… अशा सगळ्याच गावांमधून विद्याच्या कार्यालयात तक्रारी येऊ लागल्या. रस्ते योजना, विहिरी, संडास, घरकुल, समाजमंदिर… या सगळ्याचं योजनांमधील भ्रष्टाचार उघड होऊ लागला.
एक दिवस फणसीचा एक माणूस विद्याकडे तक्रार घेऊन आला. म्हणाला,
    ‘‘विद्याताई, फणसीमधी विकासयोजना आल्या, पण त्या ज्यांच्यासाठी आल्यात ते त्या योजनांपासून लांबच राह्यला लागलेत. त्यांचा फायदा भलतीच लोकं घ्यायला लागलेत. ज्याच्या हाती सत्ता तेच पारधी व्हायला लागलेत. गरिबांच्या तोंडाजवळ आलेला घास ते हिसकावून खायला लागलेत… त्यापेक्षा त्या योजना न आलेल्या बऱया.’’
थोडा संतापानेच तो बोलत होता. अशा तक्रारी आता रोजच यायला लागल्या होत्या. विद्या त्या शांतपणे  ऐकून घेत होती. फणसीच्या त्या माणसाचं संतापाचं बोलणं ती समजू शकत होती. त्यांच्यावर झालेल्या अन्यायाने ते चिडून उठणारच. आपण त्यांच्यावर झालेल्या अन्यायासंबंधी त्यांना बोलण्याची तरी संधी द्यावी म्हणून ती ऐकत राहिली. फणसीच्या त्या माणसानेही मग सगळं सांगितलं. म्हणाला,
‘‘आम्ही त्यांच्या दारात खेटय़ा घालून घालून आपल्या व्हाणा झिजवायच्या आणि त्यांनी आमच्या अडाणीपणाचा, आमच्या कमजोरीचा फायदा घेऊन आपलीच झोळी भरायची. गावात संडास बांधण्यासाठी जे अनुदान आलं त्यात सरंपच आणि त्यांच्या माणसांचेच संडास झाले. स्वत:च्या आधीच दोन विहिरी असतानाही त्यांनी आणखी विहीर खोदली, ती सरकारच्या पैशानीच. घरकुल योजना राबवली, त्यातूनही आपल्या जुन्या घराचं नवं घर केलं… म्हणजे सरकार फक्त या पुढाऱयांसाठीच योजना राबवतं की काय? का अशा योजनांचा फायदा घेण्यासाठी ही लोकं पुढारी बनतात?’’
आता काहीतरी बोललंच पाहिजे, म्हणून फणसीच्या सरपंचाचं नाव माहिती असतानाही तिनं विचारलं म्हणाली,
‘‘फणसीमध्ये सरपंच कोण आहेत?’’
तसा अगदी तुच्छतेने त्याने सरपंचाच्या नावाचा उच्चार केला. म्हणाला,
‘‘हाये आमच्याच भावकीतला उतारा, सदू ढगे. आता सदाभाऊ झालाय.’’
विद्याने फणसीच्या त्या माणसाची समजूत काढत सरपंचाने जर गावच्या विकास योजनांचा गैरवापर केला असेल, तर त्यांच्यावर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं.
पण तरीही समाधान न झाल्यासारखा तो उठून गेला.

(क्रमश:)

– बबन मिंडे