ग्रामपंचायतीच्या निवडणुका जवळ यायला लागल्या, तसा प्रकाशचा जोर वाढायला लागला. जवळ असलेल्या सत्तेमुळे आणि हाताशी असलेल्या माणसांमुळे त्याचा आत्मविश्वास आता वाढला होता.
अण्णासाहेबांचे हात मात्र मोडल्यासारखे झाले होते. आपल्याच माणसांनी केलेल्या विश्वासघाताने त्यांची शक्तीही क्षीण झाली होती. तरी सुद्धा मन उभारी घ्यायला अजून तयार होतं.
पोसलेली माणसं उलटली.
ती उलटणारच. जिथं शितं तिथं भुतं, अशी त्यांची अवस्था. जिकडं मिळणार तिकडच ती धावणार… पण ती धावली म्हणून काय झालं, माणसांचा आता तुटवडा नाही. एक लोंढा गेला की दुसरा येतो. आपल्या ओंजळीने पाणी पिणारी त्यातली पाहिजे ती निवडून घ्या. बाकी द्या ढकलून तशीच पुढं! या राजकारणात वर्षांनुवर्षे असंच चालत आलंय आणि पुढंही असंच चालत राहणार आहे.
अशा नव्या माणसांना घेऊन अण्णासाहेबांच्या नव्या पक्षाची ही पहिलीच ग्रामपंचायत निवडणूक. पुढाऱयासारख्या एकमेव जुन्या कार्यकर्त्याला घेऊन त्यांनी आपल्या नव्या पक्षाच्या पॅनेलमधील उमेदवार जाहीर केले. पुढारी आणि नंदाचा नवरा सोडला तर सगळे नव्या पिढीतले तरुण हाताशी धरलेले.
या निवडणुकीत प्रकाशने मात्र वेगळीच नीती अवलंबली होती. निवडणुकीत बाजी मारायची असेल, तर तालुक्यातल्या तरुणांना खूश ठेवलं पाहिजे. या छोटय़ा निवडणुकीत त्यांना आपण हात दिला, तरच ते उद्या मोठय़ा निवडणुकीत आपल्याला हात देतील, हे तो जाणून होता. म्हणून त्याने हजार तरुणांना वळणाऱया पन्नास तरुणांना संधी देण्याचं ठरवलं.
प्रकाशच्या या धोरणाने विद्याबरोबरच्या काही कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ लागला. तशी त्यांची तक्रारही विद्याकडे यायला लागली. पण इथं  प्रकाशने स्वीकारलेल्या धोरणात विद्याही सहभागी होती. नीती प्रकाशची, पण ती चालत आहे विद्याच्या नावाने. आणि विद्यानेही ती आपली म्हणून स्वीकारली. तिने ती आपली म्हणून स्वीकारली नसती, तर तिने ती आपल्या नावावर खपवूनच दिली नसती. आमदार होण्याआधीची विद्या अशाप्रकारच्या राजनीतीच्या जवळपासही फिरकत नव्हती. राजकारणातले हे खेळ तिला माहीतसुद्धा नव्हते. पण पाण्यात पडल्यावर माणूस पोहता येत नसलं, तरी हात पाय हलवतोच की, जगण्यासाठी ती त्याची धडपड असते.
विद्यालाही आता या गढूळ राजकीय प्रवाहात राहूनच जगायचं आहे. मग तिथं जगण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते केलंच पाहिजे. इथं तिने हातपाय नाही हलवले तर हा प्रवाह आणि या प्रवाहातले खाचखळगे, दगडधोंडे तिला संपवल्याशिवाय राहणार नाहीत.
तिने स्वीकारलेली नीती मात्र तिला या राजकारणात ढकलणाऱयाना पटणारी नव्हती, म्हणून तर ते तिला जाब विचारण्यासाठी आले.
ग्रामपंचायत निवडणुकीत विद्याने नको त्यांना उमेदवारी दिली अशी सगळीकडे ओरड होऊ लागली. दादागिरी करणाऱया गुंड तरुणांना हाताशी धरून त्यांनाच संधी दिली, म्हणून चार दिवस ओरड होईल, पण उद्या हेच तरुण ओरडणारी तोंडं बंद करतील याची तिला खात्री वाटायला लागली. त्यामुळे तिला आपल्या विरुद्ध वाजणाऱया चार-दोन तोंडांची चिंता अजिबात वाटेनाशी झाली.
विद्यामधील हा बदल तिला ओळखणाऱया सगळ्यांनाच अचंबित करणारा होता.
एकेकाळी विद्या जिचा आदर्श होती त्या अलकालाही विद्याचं हे वागणं पटलं नाही.
आपण पंचायत समितीचे सदस्य असताना ग्रामपंचायत निवडणुकीत विद्याने आपल्याला कोणतीच गोष्ट विचारली नाही. उमेदवार निवडीत आपलं मत घेतलं नाही. याचा नाही म्हटलं तरी तिच्या मनात राग होता. कारण या अगोदर विद्या कोणतीच गोष्ट आपल्या सहभागाशिवाय करत नव्हती आणि आता एवढय़ा मोठय़ा गोष्टीत तिने आपल्याला विचारलंही नाही. या रागापोटीच ती एकदिवस विद्याला भेटायला गेली. तेव्हा बरेच कार्यकर्ते तिच्या घरात बसले होते. चेअरमन आणि कांबळेसरही विद्याच्या डाव्या बाजूला खुर्चीत बसले होते, तर उजव्या बाजूला सतू निवडणुकीआधीच जामगावचा सरपंच झाल्याच्या ऐटीत दिसत होता.
अलका थोडी बिचकतच आत गेली. एवढय़ा लोकांना बघून ती पदर सावरत विद्याकडे बघायला लागली. विद्या एखादी मुरलेली राजकारणी बाई वाटत होती. आज पहिल्यांदाच विद्या तिला अशी बदललेली दिसत होती.
विद्याचं लक्ष जेव्हा अलकाकडे गेलं, तेव्हा संकोचून पदर सावरत उभ्या असलेल्या अलकामध्ये ती स्वत:लाच पाह्यला लागली. एक दिवस तीही असंच अंग आकसून घेणारी होती. पण तेही क्षणभरच. तिची टवटवीत मुद्रा एकदम बदलली. अलकासमोर तिला अपराध्यासारखं वाटायला लागलं. पण मनातला अपराधी भाव तिने चेहऱयावर दिसून दिला नाही. असल्या भूमिका आता तिला चांगल्या करता येतात. मनात एक आणि तोंडावर एक. असं क्षणाक्षणाला रंग बदलणं आता तिला नवीन राहिलं नाही.
पण इथं अलकाला कोणताच रंग दाखविण्याची गरज तिला वाटली नाही. कारण तिला अजूनही अलका आपली मैत्रीनच वाटत होती. मैत्रीच्या या भावनेनेच मोठय़ा आस्थेने तिने तिची चौकशी केली. म्हणाली,
‘‘अलका, आज बऱयाच दिवसांनी तुला बघून खूप बरं वाटलं. बरी आहेस ना? तुझ्या बाळंतपणात एक दिवस येऊन जाईन म्हटलं होतं, पण कामाच्या व्यापाने जमलंच नाही.’’
‘‘चालायचं, तुझं कामच तसं आहे… तिथं आपल्या माणसांचा विसर पडायचाच.’’
खरं तर अलकाचं हे खोचक बोलणं विद्याला लागलं पाहिजे होतं, पण तिने ते हसण्यावारी नेलं. म्हणाली,
‘‘अगं, आई झालं म्हणजे नुसतं आईच होऊन राह्यचं नसतं. निवडलेल्या मार्गाने पुढं चालतच राह्यचं असतं. पण आपल्या स्त्रिया तो विचारच करत नाहीत. त्यांना आई होण्यात आणि जन्माला घातलेल्या मुलाला वाढविण्यातच धन्यता वाटते. आपला स्वत:चा विचार राहतो मग जागेवरच. तुझ्यापासूनच घे ना. वर्षभर तू घर सोडलं नाहीस. कसा तुझ्याशी संपर्क राहणार…’’
विद्या बोलतच राहिली. तिच्यातल्या एका महत्त्वाकांक्षी स्त्रीकडे अलका मात्र बधिर झाल्यासारखी नुसतीच पाहत राहिली.

(क्रमश:)

– बबन मिंडे