शॉल आणि श्रीफळ देऊन आमदार बाळासाहेब मानेंनी विद्याचा सत्कार केला. कितीतरी वेळ टाळ्या कडकडत होत्या. त्यावेळी विद्या मात्र शॉलखाली पार दबून गेली होती.
सत्कारानंतर कांबळेसरांनी बाळासाहेब मानेंना भाषणाची विनंती केली. तेव्हा अण्णासाहेबांकडे मिश्किलपणे बघत त्यांनी भाषणाला सुरुवात केली.
‘‘माननीय आमदार अण्णासाहेब मोहिते, आमदार दादासाहेब घोटवडकर, प्रदेशाध्यक्ष सदाशिवराव भोसले, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष आप्पासाहेब पाटील, व्यासपीठावरील इतर मान्यवर मंडळी… बंधू आणि भगिनींनो, मी आमदार झालो, पण असा भव्य सत्कार माझा अजून झाला नाही. त्याला कारण माझ्या हातून अनेक मोठी कामं झाली असली तरी, असा सत्कार होण्यासारखं मोठं काम अजून झालं नाही, असं आज वाटतंय. खरं तर ज्यांनी आम्हाला निवडून दिलं, त्यांच्या शिक्षणाची खरी जबाबदारी आमची आहे. पण बाकीचे व्याप सांभाळता या शिक्षणाकडे आमचं थोडं दुर्लक्ष होतंय, याची आम्हाला जाणीव आहे. आम्ही आजच्या पोरांच्या शिक्षणाची काळजी घेतो, पण विद्याताईंनी प्रौढांना शिकवण्याचं काम हाती घेऊन ते करून दाखवलं. आज त्यांनी एक गाव साक्षर केला आहे, उद्या तालुका, परवा जिल्हा, मग राज्य, देश ही साखळी अशी चालू राहिली पाहिजे तरच साक्षर भारताचं आपलं स्वप्न पूर्ण होईल. पण त्यासाठी एकटी विद्याताई पुरी पडणार नाही. अशा अनेक विद्याताईंनी एकत्र येण्याची गरज आहे. एवढेच नाही तर त्याला पुरुषांचीही साथ लाभली पाहिजे…’’
मग महिलांच्या बाजूला बघत ते शेवटचं वाक्य बोलले,
‘‘मला आशा आहे, साक्षर झालेल्या या जामगावातल्या अनेक विद्या विद्याताईंना येऊन मिळतील आणि साक्षरतेचं काम पुढं चालू ठेवतील.’’
टाळ्यांच्या आवाजात बाळासाहेब मानेंचं भाषण संपलं. आपण केलेलं काम किती मोठं आहे याची जाणीव विद्याला खऱया अर्थाने आता झाली. क्षणभर तिला स्वतःचा अभिमान वाटला. आतापर्यंत जमिनीला लावलेली नजर तिने वर केली. समोर दिसणाऱया दृश्याने मात्र ती पुन्हा अस्वस्थ झाली. स्त्री-पुरुषांचे ते दोन स्वतंत्र विभाग. किती केविलवाण्या वाटत होत्या त्या स्त्रिया! अशा कधीच त्या तिला दिसल्या नव्हत्या. त्यांच्या इतक्या जवळ राहूनही त्या कधी तिला इतक्या लाचार वाटल्या नव्हत्या. मग आताच तिला त्या पुरुषांनी टाकून दिल्यासारख्या, बाजूला लोटल्यासारख्या का वाटायला लागल्या. तिला एकदम प्रकाशची आठवण झाली. हे पुरुष आपल्या बायकांना केवळ गरजेपुरतेच जवळ घेतात का? काम झालं की बाजूला लोटायचं. एखाद्या वस्तूसारखं वापरायचं. तरीही स्त्रीने ते निमूटपणे सहन करायचं. केवळ स्त्री म्हणून?
आजपर्यंत विद्याला स्त्रीमधील या लाचारीची जाणीव झाली नव्हती. मग आजच तिला हे सर्व का जाणवायला लागलं?
कदाचित या व्यासपीठाच्या उंचीचा परिणाम असेल. इतक्या उंचीवरून तिने या स्त्रियांना अजून कधी पाहिलंच नव्हतं.
अण्णासाहेबांचं भाषण सुरू झालं आणि भानावर आल्यासारखं तिने त्यांच्याकडे पाहिलं. अण्णासाहेब बोलत होते,
‘‘हा सत्कार एकटय़ा विद्याचा नसून साक्षर झालेल्या जामगावातल्या प्रत्येक व्यक्तीचा आहे. आज स्त्री कोणत्याच क्षेत्रात मागे राहिलेली नाही…’’
विद्या अण्णासाहेबांकडे एकटक पाहत, त्याचं भाषण ऐकत होती. आपले मामा स्त्रियांच्या विषयी इतके सुधारित वृत्तीचे आहेत याचं तिला समाधान वाटत होतं. त्यांच्या प्रत्येक वाक्यावाक्याला तिच्या अंगातलं रक्त सळसळत होतं.
भाषण करताकरताच मग अण्णासाहेबांनी टेबलावरची पिशवी हातात घेतली. विद्याकडे बघून त्यांनी हातातल्या पिशवीकडे पाहिलं. म्हणाले,
‘‘विद्याचं हे काम बघून अनेकांना असं काम करण्याचं प्रोत्साहन मिळेल याची मला खात्री आहे. तरी सुद्धा एक शाबासकीची थाप म्हणून ही एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांची पिशवी भेट म्हणून मी विद्याला देत आहे. तिने या पिशवीचा स्वीकार करावा.’’
पुन्हा एकदा सर्व मैदान टाळ्यांच्या कडकडाटात दणाणून गेलं.
विद्याला हा अनपेक्षित धक्काच होता. तिच्या मनाला सत्कारच अवजड झाला होता. त्यात आणखी एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांची भर पडली. तिला आणखीनच दबल्यासारखं वाटलं. पण आता मागं सरता येत नव्हतं. आणि मनावरचा बोजा झटकूनही टाकता येत नव्हता.
मोठय़ा संकोचाने तिने अण्णासाहेबांच्या हातून ती पिशवी स्वीकारली.
ठरल्याप्रमाणे विद्या स्टेजवरच येणार नव्हती. म्हणजे तिचं सर्वांसमोर बोलणं लांबच राहिलं. पण हा सर्व प्रकार कांबळेसरांच्या मनात कुठेतरी खूपत होता. म्हणूनच तर तिची फजिती करण्यासाठी त्यांनी तिला बोलण्याची विनंती केली.
विद्याला स्टेजवर आल्याचा खरा पश्चात्ताप झाला तो आता. चार लोकांसमोर आपल्याला बोलता येत नाही, याची लाजही वाटली. आपल्यातली ही उणीव ती लपवू शकली नाही. आतापर्यंत लटपटणारे पाय खुर्चीच्या आधाराने तग धरून होते. पण आता तर त्यातलं अवसानच गेल्यासारखं वाटलं. तिने गोंधळलेल्या नजरेने अण्णासाहेबांकडे पाहिलं. तिच्या केविलवाण्या तोंडाकडे बघत मग अण्णासाहेब हळू आवाजात म्हणाले,
‘‘विद्या, काहींना संधी मिळत नाही म्हणून ते मागे राहतात. तुला मनात नसताना संधी चालून आली आहे. काही गोष्टी मनात नसताना, आवडत नसताना करायला गेलं, की जमायला लागतात. हळूहळू आवडायला लागतात. तेव्हा संकोच सोड, ज्यांना तू शिकवलंय तीच लोकं समोर बसल्यात. काही बोल. तेच खरं असेल. उठ.’’
विद्याने कोपऱयात उभं राहून हसणाऱया कांबळेसरांकडे पाहिलं. त्यांच्या नजरेला नजर देण्याची हिम्मत अजून तिच्यात आली नव्हती, पण लटलटत्या पायांनी उभं राहण्याइतपत अवसान तिने मिळवलं. माईकची उंची तिच्यापेक्षा जास्त होती. बाजूला कांबळेसर होते, पण त्यांनी ती कमी करण्याचे कष्ट घेतले नाहीत.
विद्याने समोर नजर फिरवली. सर्व नजरा तिच्यावरच होत्या. असंख्य अनोळखी नजरा तिला न्याहळत होत्या. त्यांच्याकडे बघून काय बोलावं ते तिला सुचेना. त्यात स्टेजवरच जायचं नाही असं ठरवलं होतं त्यामुळे भाषणाचीही तयारी केली नव्हती. पण तेवढय़ात तिची नजर जामगावमधल्या ओळखीच्या चेहऱयांकडे गेली.

(क्रमशः)

– बबन मिंडे

(पुढील आठवड्यात वाचा :                                                                             आमदार अण्णासाहेब मेहिते यांचं खरं राजकीय रूप. त्यांचा स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि त्यातून जामगावमध्ये घडणारं राजकारण… केवळ स्त्री आरक्षणाने सरपंच झालेली बाई खरंच आपल्या मनासारखं काम करते, की ती आपल्या नवऱयाच्याच चालीने चालते…?)