खांबाला टेकून बसलेली विठाबाई, तिच्या शेजारची शांताक्का, नुकतंच मोतिबिंदूचं ऑपरेशन झाल्यामुळे काळा चष्मा लावलेली मथूआजी, तिच्याशेजारी रडक्या मुलाला मांडीवर घेऊन बसलेली तिची सून, रोज नवऱयाचा मार खाणारी सजी, संशय घेऊन नवऱयाने टाकलेली बायजा, मुंबईला गेलेल्या नवऱयाची वर्षांनुवर्षे वाट पाहणारी नंदा… या सर्व जणी आपल्याकडं अपेक्षेनं पाहतात, असं तिला वाटायला लागलं.
आपण यांना शिकवलं म्हणजे असं कोणतं मोठं काम केलं? आणि त्यांनी जर शिकण्याची इच्छा दाखवली नसती तर? त्यांनी मनावर घेतलं, म्हणून तर त्या शिकल्या. मग माझा सत्कार कशासाठी?
मनात विचारांचा गोप विणला जाऊ लगाला आणि ती एकदम बोलायला लागली. म्हणाली,
‘‘खरं तर हा सत्कार माझा नसून जामगावात साक्षर झालेल्या प्रत्येक व्यक्तीचा आहे. त्यांनी मनात आणलं म्हणून ते शिकले. पण केवळ लिहिता-वाचता येणं म्हणजे शिकणं नाही. शिक्षणातून स्वत:चा विकास करता आला पाहिजे. हा सत्कार आपणा सर्वांचा आहे. अण्णासाहेबांनी दिलेल्या पिशवीवर आपणा सर्वांचा समान हक्क आहे. त्याचा उपयोग गावाच्या विकासासाठीच होईल.’’
विद्याच्या या घोषणेने मैदानात पुन्हा एकदा टाळ्यांचा आवाज झाला. आणि त्या आवाजातच विद्याचं छोटंसं भाषण संपलं, तेव्हा कांबळेसर तोंडात मारल्यासारखे विद्याकडं बघत राहिले. नंतर अण्णासाहेबांचं विद्याचं कौतुक करणारं लांबलचक भाषण संपल्यावर आजचा सत्कारसमारंभाचा कार्यक्रम संपला, एवढं बोलण्याचं अवसानही त्यांच्या तोंडात राहिलं नाही.

दुसऱया दिवशी सकाळी अण्णासाहेब वाडय़ासमोर गावातल्या काही कार्यकर्त्यांशी चर्चा करत बसले होते. वाडय़ासमोरचं हे अंगण त्यांना खूप आवडतं. याच अंगणात ते पावसाने साठलेल्या पाण्यात होडी करून सोडायचे. तरुण वयात बरोबरीच्या पोरांना गोळा करून त्यांनी याच अंगणात जामगाव तरुण मंडळाची स्थापना केली होती. सरपंच झाल्यावर याच अंगणात त्यांनी गावातले अनेक तंटे मिटवले आहेत. पहिल्यांदा आमदारकीचे तिकीट मिळालं, तेव्हा इथंच बसून त्यांनी कार्यकर्त्यांबरोबर योजना आखल्या होत्या. लग्न झाल्यानंतर दुसऱयादिवशी इथंच त्यांचा सुपारी खेळण्याचा कार्यक्रम झाला होता. तेव्हा पहिल्यांदा बायकोच्या हाताशी झालेली झटापट त्यांना अजूनही जशीच्या तशी आठवते.
आज आमदार अण्णासाहेबांचं घराणं, त्यांचं वजण सगळ्यांना दिसत असलं, तरी त्यांचे इवले पाय या अंगणातच पहिल्यांदा थरथरले होते. याच अंगणात ते पडत, धडपडत धाव घ्यायला शिकले होते. अशा या अंगणात बसल्याबसल्या आपल्या साठ वर्षांच्या आयुष्याचा पट त्यांच्या डोळ्यासमोर उभा राहिला.
आज अंगणात त्यांच्या शेजारी समोरासमोर दोन खुर्च्या टाकून पुढारी आणि चेअरमन पेपर वाचत होते. समोरच्या टिपॉयवर तीनचार पेपर पडले होते. चेअरमन हातातला पेपर सारखा बदलत होता. एका पेपरमधल्या बातमीवर नाराज होऊन तो अण्णासाहेबांना म्हणाला,
‘‘‘लोकशाही’ च्या बातमीदाराला काय कमी पडायला लागलं की काय?’’
‘‘का? काय झालं?’’
 अण्णासाहेबांनी उत्सुकतेनं विचारलं.
तसा हातातला पेपर त्यांना दाखवत चेअरमन म्हणाला,
‘‘पहिलं म्हणजे हा फोटो बघा. सगळ्या पेपरमधल्या फोटोत तुम्ही भाषण करताय, पण इथं विद्याताई भाषण करतीये. आणि बातमी? वितभर बातमीत दहा वेळा तिचं नाव आलंय.’’
 ‘‘चेअरमन, हे मला सांगण्यापेक्षा त्यालाच जाऊन सांगा. गणूचंच पोरगं आहे ना बातमीदार! यासाठीच तुला तिथं लावलं नाही म्हणावं.’’
एवढय़ात आईसाहेब बाहेर आल्या. त्यांच्या बांगडय़ांच्या आवाजाने अण्णासाहेबांची नजर त्यांच्याकडे वळली, तसे थोडे गंभीर होत ते म्हणाले,
‘‘यांच्या सांगण्यावरून त्याला तिथं चिकटवला. बायकांच्या सांगण्याने पुरुष वागायला लागला, की तो खड्डय़ात गेलाच म्हणून समजायचं… हा आतला धोरणीपणा या बायकांना नाही कळायचा.’’
अण्णासाहेबांकडे प्रश्नार्थक नजरेनं बघून काहीच न कळल्यासारखं आईसाहेबांनी विचारलं,
‘‘का, काय झालं? काल तर स्त्री किती शक्तिशाली वाटत होती! झाशीची राणी अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई  फुले, इंदिरा गांधी, अजिबात धोरणी नव्हत्या या! पार खड्डय़ात घालवलं देशाला त्यांनी!’’
‘‘ते भाषण होतं. लोकांसमोर काय बोलायचं आणि घरात काय बोलायचं हे तुम्हाला नाही कळायचं. घरात चड्डी-बनियानवर असतो आम्ही. स्टेजवर हजारो लोकांसमोर तसंच जाणं नाही जमायचं आम्हाला. हार घालण्याऐवजी वेडा म्हणून दगडी मारतील लोकं… जाऊ द्या, तुम्हाला नाही कळायचं त्यातलं, तुम्ही आपलं नाष्टय़ाचं झालंय का बघा!’’
आईसाहेब रागारागाने आत गेल्या. त्यांना हे असलं नवीनच होतं असं नाही. तरी पण आता अंगवळणी पडायला लागलंय. पहिल्यांदा अगदी निमूटपणे सहन करत होत्या. अगदी परवा घरात सून म्हणून आलेल्या निर्मलासारखं. आपल्याला सुद्धा विचार व्यक्त करता येतात. आणि त्याचा आपल्याला अधिकार आहे याची त्यांना माहितीच नव्हती. माहिती नव्हती म्हणण्यापेक्षा हे त्यांना कधी जमलंच नव्हतं. नवऱयाच्या कर्तृत्वातच आपलं कर्तृत्व मानणाऱया होत्या त्या. त्यातून स्वत:च विश्व मात्र त्यांनी चार भिंतीतच बंदिस्त केलं. त्यामुळे चुलीजवळच त्यांचं कर्तृत्व करपून गेलं.. पण अलीकडे असं का होतंय हे त्यांचं त्यांनाच कळत नाही. विशेषत निर्मलेकडे पाहिलं की आपण किती खुजा आणि लाचार आहोत याची त्यांना खंत वाटत असावी. म्हणूनच कदाचित सुप्तावस्थेला त्यांच्यातला स्वाभिमान कुठेतरी जागा होत असावा.
अशा प्रसंगी चेअरमन आणि पुढाऱयाची अवस्था मात्र बघण्यासारखी असते. त्यांना धड ना आईसाहेबांच्या बाजूने बोलता येत, ना धड अण्णासाहेबांच्या. मग अपराध्यासारखे एकमेकांकडे बघत बसतात नुसते.
आईसाहेबांच्या रागारागाने जाण्याने वातावरण थोडं गंभीर झालं.
पण थोडय़ा वेळाने विद्याच्या येण्याने ते आपोआपच निवळलं.

(क्रमश:)

– बबन मिंडे