विद्यालाही पुढाऱयाच्या बोलण्याचा रोख समजला, तशी आईसाहेबांकडे बघत ती उठली. बरोबर आलेल्या स्त्रियासुद्धा उठल्या. विद्याला काल समारंभात भाषण करणारे अण्णासाहेब आणि घरातले अण्णासाहेब यात खूप फरक वाटला. चेहऱयावरची नाराजी ती लपवू शकली नाही. तिच्या पडलेल्या चेहऱयाकडे बघत मग आईसाहेबच विषय बदलत म्हणाल्या,
‘‘अहो, ती आली कशासाठी आणि तुम्ही तिला हे काय ऐकवताय?’’
‘‘आम्ही तिला कुठं ऐकवतोय. एकूण समाजाबद्दल बोलतोय आम्ही… जाऊ द्या, समाजाचं समाजात बोलू.’’
अण्णासाहेबांनी हातातली कागदाची गुंडाळी उलगडली. त्यात लिहिलेल्या मजकुरावर एक नजर टाकत ते म्हणाले,
‘‘योजना चांगली आहे, पण प्रशिक्षणानंतर या छोटय़ा गावात सर्वानाच रोजगार मिळणं अवघड आहे.’’
‘‘आता एस. टी. ची सोय आहे. पुण्यातल्या छोटय़ा-मोठय़ा कारखान्यात जाऊन येऊन करू शकतील नोकरी.’’
विद्या अण्णासाहेबांची शंका दूर करत म्हणाली. तेव्हा ते विद्याकडे आश्चर्याने बघत म्हणाले,
‘‘सगळं नियोजनबद्ध दिसतंय. स्त्रियांसाठीच्या कोणत्याही कामात आमची आडकाठी नाही. आम्हाला शक्य आहे, तेवढी मदत आम्ही करू.. पण हे साक्षरता मोहिमेतल्या स्त्रियांच्या संदर्भात काय लिहिलंय?’’
तेव्हा विद्या बाजूला उभ्या असलेल्या स्त्रियांकडे आपुलकीने पाहात म्हणाली,
‘‘एकूण आठजणी आहेत त्या. त्यातल्याच या काही. बाकीच्या आल्या नाहीत. माझ्या इतकंच यांनीसुद्धा कष्ट घेतलंय गाव साक्षर करण्यात. पण त्यांचा कुठेच उल्लेख नाही… त्यातल्या एकीला बालवाडी सुरू करण्याची इच्छा आहे. दोघींना आम्ही शिवणयंत्रे घेऊन देण्याच्या विचारात आहे… त्यांचं कौतुक म्हणून त्यांना काही ना काही मदत करायचा विचार आहे. आता पंचायत समितीच्या निवडणुका आल्यात. त्यात यांच्यातल्याच एकीला संधी द्यावी अशी विनंती केली आहे आम्ही.’’
पुढाऱयाचा चेहरा एकदम पडला. अण्णासाहेब मात्र शांत होते. पुढाऱयाकडे बघून त्यांनी विद्याकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणाले,
‘‘हा महत्त्वाचा निर्णय आहे. त्यावर आम्ही जरा विचार करून सांगू.’’
‘‘ठीक आहे.’’
विद्याने आईसाहेबांकडे नजर टाकली. तोंड दाबून धरल्यासारखं त्या शांत होत्या. त्यांच्या नजरेला नजर न देतात ‘येते’ म्हणत ती दाराच्या दिशेने चालायला लागली. तिच्या पाठोपाठ बरोबरच्या स्त्रियासुद्धा चालायला लागल्या. पण विद्या दारातून बाहेर पडायच्या आतच अण्णासाहेबांनी तिला परत बोलावलं. जवळ आलेल्या विद्याला हळू आवाजात कानमंत्र दिल्यासारखा म्हणाले,
‘‘विद्या, तू घरातली म्हणून सांगतो. एक गोष्ट लक्षात ठेव, तुला जर मोठं व्हायचं असेल, तर अगोदर स्वत:चा पाया मजबूत कर. तुझ्या भविष्याचं फाऊंडेशन मजबूत कर. ते मजबूत असेल तरच तू एकेक मजला चढू शकशील. आपल्या भोवतीचं वैभव कायम आपल्याच भोवती ठेवू शकशील. वैभव सांभाळण्यासाठी माणसंही पोसावी लागतात. या वैभवाचं स्वप्न पाहणाऱयांना तर आपण दूरच ठेवायचं असतं, पण आपण होऊनही ते कोणाच्या गळ्यात टाकायचं नसतं. ते असेल तर तुझ्याभोवती चार लोकं येतील. ते गेलं, की पुन्हा उघडी पडशील. तेव्हा पहिल्यांदा जिथून तुला कोणी हलवणार नाही, अशी स्वत:ची जागा निर्माण कर. आणि मग ही खिरापत वाटत सूट.’’
अण्णासाहेबांचं हे बोलणं विद्याच्या आकलनाच्या बाहेरचं होतं. पण त्यांची वाक्य न् वाक्य तिच्या कानातून आरपार गेली होती. त्या वाक्यांचा अर्थ शोधण्याच्या प्रयत्नात ती पुन्हा कानावर आदळत होती.
कानाभोवती घोंगावणारी ती वाक्य घेऊनच ती वाडय़ाबाहेर पडली.

सगळी कामं उरकून विद्या दुपारच्या वेळेला सासूबरोबर कांडण करीत होती. गावात आता नाचणीचं पीक कोणी काढत नाही. पण सरूआक्काला नाचणीच्या भाकरीशिवाय दुसरी भाकरी गोड लागत नाही. म्हणून भाऊ डोंगराच्या रानात बायकोसाठी नाचणी करतात. दोन दिवसांपूर्वी मळलेली नाचणी आज सासू-सुना उखळात कांडत होत्या. अंगणातल्या आंब्याखाली भाऊ घोंगडी टाकून गारव्याला पडले होते.
उत्साह गिळून टाकणारी कंटाळवाणी दुपार. त्यात भाऊंना डोळा कधी लागला ते कळलेसुद्धा नाही. ओटीवरल्या उखळाभोवती मात्र या सासू-सुना बायकांचा धर्म पाळत होत्या. फेर धरल्यासारखा हातात मुसळ घेऊन उखळाभोवती फिरत होत्या. मुसळांचा लयबद्ध आवाज  ओटीभर घुमत होता. तो दारातून येणाऱया नंदाच्या आवाजाने थांबला. सासू-सुनांच्या घामाघूम अवस्थेकडं बघत नंदा दारातून येतायेताच म्हणाली,
‘‘एवढय़ा घामाघूम होऊन जीवाला त्रास करून घेण्यापेक्षा गिरणीहून भरडून आणायच्या.’’
‘‘अगं किती आहेत त्या अशा! मणभरसुद्धा भरायच्या नाय. तेवढय़ासाठी कुठं जातीस गिरणीव घिऊन. उलट डोक्याला वझ देऊन तरास व्हयाचा.’’
 हातातलं मुसळं कोपऱयात उभं करत सरूआक्का म्हणाली,
विद्यानेही हातातलं मुसळं कोपऱयात टेकवलं. ओटीभर पांगलेले दाणे केरसुनीने उखळाभोवती लोटत ती म्हणाली,
‘‘आज बऱयाच दिवसांनी आलीस. आणि सगळी कामं टाकून बरी सोडली सासूने तुला.’’
‘‘घरात कोणी नव्हतं म्हणून मिळालं यायला.’’
जोत्यावर टेकत नंदा हळू आवाजात बोलली. तेव्हा पदराने तोंडावरचा घाम टिपत सरूआक्का नंदाला चिडवत म्हणाली,
‘‘तू गावची सरपंचीण आहेस, तुला कशाला पायजे कुणाची परवानगी!’’
सरुआक्काच्या बोचऱया वाक्याने नंदाचं तोंड बारीक झालं. सरपंचीण या शब्दाने आधीच दबून गेलेल्या नंदाला अधिकच लाजिरवाणं वाटलं. फार मोठा गुन्हा केलेल्या गुन्हेगाराला दिलेल्या शब्दासारखा हा शब्द अलीकडे तिला वाटायला लागला आहे. केविलवाणा चेहरा करून तिने विद्याकडे पाहिलं. विद्याला तिची अवस्था लक्षात यायला वेळ लागला नाही. आतून पार हिंदळत असलेल्या तिच्या अस्वस्थ देहासमोर विद्या मांडी घालून बसली. हळुवार तिचा हात हातात घेतला. तिच्या चोरटय़ा नजरेकडे आपुलकीने पाहत, अगदी पोटात शिरून बोलल्यासारखी म्हणाली,
‘‘नंदा, अस्वस्थ दिसतीस, कोणी काही बोललं का?’’
विद्याच्या हातातला आपला हात सोडवत नंदाने नुसतीच मान खाली घातली. विद्याने पुन्हा विचारलं,
‘‘तब्येत बरी आहे ना?’’
‘‘हो.’’
‘‘मग चेहरा का पार सुकलाय तुझा?’’
नंदाने मान वर केली. आपल्याकडे उत्सुकतेनं पाहणाऱया सरूआक्काकडे तिचं लक्ष गेलं. तिचं सगळं लक्ष नंदाकडेच लागलं होतं. गावची सरपंचीण म्हणून तिने काय दिवे लावलेत हे ती ऐकतच होती, पण आज तिला प्रत्यक्ष नंदाच्या तोंडूनच ऐकण्याची इच्छा होती.

(क्रमश:)

– बबन मिंडे