घटस्थापनेच्याच दिवशी युती व आघाडीचे घटस्फोट झाले. विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्ष स्वतंत्रपणे लढत असल्याने राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मनसेला बळ मिळाले आहे. याचा फायदा घेत राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर थेट शरसंधान सुरू केले. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत की गुजरातचे, असा सवाल करत ते एकीकडे भाजपवर तर दुसरीकडे आघाडीवर तुटून पडले आहेत. महाराष्ट्र तोडण्याचा आणि मुंबईचे अस्तित्व वेगळ्या मार्गाने संपविण्याचे उद्योग भाजपने सुरू केले असल्याची टीका त्यांनी ie06केली. आघाडी व युती ही राज्याच्या हिताची नाही, अशी स्पष्ट भूमिका मांडत मनसे महाराष्ट्रात स्वबळावर सत्तेत येऊ इच्छित असल्याचे राज यांनी ‘लोकसत्ता-आयडिया एक्स्चेंज’ उपक्रमात सांगितले.
राष्ट्रीय पक्षांनी देशाची जबाबदारी सांभाळावी आणि प्रादेशिक पक्षांनी राज्याची जबाबदारी, असे माझे मत आहे. त्याचप्रमाणे आघाडी अथवा युतीमुळे राज्याचा काहीही फायदा होत नाही, किंबहुना नुकसानच जास्त होते. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना-भाजप युती तुटली आणि काँग्रेस-राष्ट्रवादी यांची आघाडी फुटली, त्यानंतर हे दोन्ही पक्ष एकमेकांवर ज्या प्रकारे आरोप-प्रत्यारोप करत आहेत ते पाहता एकाच पक्षाची सत्ता राज्यात येणे हे गरजेचे बनले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पहिल्यापासून स्बबळावर लढण्याची भूमिका घेतली असून मनसे महाराष्ट्रात स्वबळावरच सत्ता आणेल. यासाठी किती काळ लागेल हे सांगता येणार नाही, परंतु लोकांनी या चारही पक्षांवर यापूर्वी विश्वास ठेवून पाहिला आहे. त्यानंतरही महाराष्ट्राच्या हाती फारसे काही लागले नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीची पंधरा वर्षांची आघाडी संपुष्टात आल्यानंतर दोन्ही पक्षांचे नेते आज केवळ एकमेकांवर चिखलफेक करताना दिसतात. मनसेच्या स्थापनेनंतरच्या पहिल्या सभेतही मी महाराष्ट्राच्या विकासाचे चित्र मांडले होते. त्यानंतर सखोल अभ्यास करून अनेक तज्ज्ञ तसेच आर्थिक क्षेत्रातील जाणकारांशी बोलून महाराष्ट्राच्या विकासाचा आराखडा (ब्लू प्रिंट) घेऊन मी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उभा आहे. महाराष्ट्राचा खऱ्या अर्थाने विकास करणे हेच माझे ध्येय असून त्यासाठी कोणत्याही प्रकारची तडजोड मी करणार नाही. या विकासाचा फायदा हा मराठी माणसाला, येथील भूमिपुत्रांना मिळाला पाहिजे, अशी माझी स्पष्ट भूमिका आहे.
यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील तसेच काही प्रमाणात शरद पवार यांच्या सुरुवातीच्या काळात महाराष्ट्रात उद्योगधंदे आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न झाले. यातून महाराष्ट्राचा विकास झाला. मराठी माणसानेच महाराष्ट्रात चांगले वातावरण निर्माण केले, म्हणूनच टाटा-बिर्ला यांनी महाराष्ट्रात उद्योगधंदे करण्याला प्राधान्य दिले. मात्र गेल्या पंधरा वर्षांत उद्योगधंद्यांच्या बाबतीत राज्यातील वातावरण बदलू लागले. अनेक उद्योग, व्यवसाय अन्य राज्यांत जाऊ लागले. यामागे येथील राज्यकर्त्यांची उदासीनता तसेच टक्केवारी व पार्टनरशिपचे राजकारण कारणीभूत आहे. एकीकडे अन्य राज्यांमध्ये उद्योगधंदे यावेत यासाठी सवलती दिल्या जातात, त्याच वेळी आपल्या राज्यात येऊ पाहणाऱ्या उद्योगपतींची पिळवणूक केली जाते. दुर्दैवाने राज्यकर्तेच लूटमारीला प्रोत्साहन देणारे असल्याने अन्य राज्यांत राहणारे, परंतु राज्याच्या सेवेत असलेले सनदी अधिकारीही महाराष्ट्राचे हित जपण्यापेक्षा आपापल्या राज्यांचे हित जपताना दिसतात. ही परिस्थिती बदलण्याची गरज आहे. यासाठी राज्यात एकाच पक्षाचे सरकार, त्यातही प्रादेशिक पक्षाचेच सरकार सत्तेवर येणे आवश्यक आहे. लोकांचा प्रादेशिक पक्षांवर विश्वास नाही, अशी परिस्थिती नाही. शिवसेना हा सुरुवातीला प्रादेशिक पक्ष म्हणून पुढे आला, परंतु वरती येत असतानाच भाजपशी युती केल्यामुळे लोकांना स्वतंत्र प्रादेशिक पक्ष मिळालाच नाही. या पाश्र्वभूमीवर मनसे हाच एकमेव खरा प्रादेशिक पक्ष असून पक्षस्थापनेनंतर २००९च्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत मनसेने १३ जागी विजय मिळवला होता. पक्षस्थापनेपासूनच मी स्वबळावर महाराष्ट्रात निवडणूक लढविणार हे सांगत आलो आहे. आताही माझी तीच भूमिका असून युती व आघाडी यावर माझा विश्वास नाही. अशा आघाडी व युतीतून महाराष्ट्राचे काहीही भले होऊ शकत नाही. गेल्या पंधरा वर्षांत युती हा धर्म राहिला नसून ते केवळ एक ‘डील’ बनले होते. युती व आघाडीच्या फुटीतून हे ‘डील’च असल्याचे स्पष्ट झाले आहे. मनसे सत्तेवर आल्यानंतर राज्याच्या नेतृत्वाची म्हणजे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी मी सांभाळेन. महाराष्ट्राच्या विकासाचा आराखडा माझ्याकडे तयार असून पहिल्या फळीतील चांगले लोकही माझ्यासमवेत आहेत. आज अनेक जण समोर दिसत नसले तरी सत्ता आल्यानंतर अनेक चांगले लोक असल्याचे दिसून येईल. मनोहर जोशी यांना बाळासाहेबांनी ज्या वेळी मुख्यमंत्री केले तेव्हा ते राज्य सांभाळू शकतील, असे कोणाला वाटले होते का? परंतु त्यांनी चांगला कारभार केला. प्रश्न इच्छाशक्तीचा आहे. लोकांनी एकहाती सत्ता दिल्यास महाराष्ट्राचे चित्र बदलून दाखवीन. सर्वार्थाने महाराष्ट्राचा विकास होऊ शकतो व तो करण्याची प्रामाणिक इच्छा माझ्याकडे आहे.
हे कसले अच्छे दिन?
देशाच्या सीमेवर पाकिस्तानकडून सातत्याने गोळीबार सुरू आहे. आपले जवान शहीद होत आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हरियाणा व महाराष्ट्रात दिवसाकाठी पाच-पाच सभा घेत आहेत. तुम्ही त्यांना मिठाई पाठवता आणि ते गोळी देणार, हा काय प्रकार आहे? काँग्रेस सरकारच्या काळातही पाकच्या गोळीबारात जवान शहीद होत होते. शवपेटय़ांमधून त्यांचे शव आणण्यात येत होते. आज मोदी पंतप्रधान झाल्यानंतरही ie08यात काही बदल झालेला नाही. आपल्या जवानांचे मृतदेह शवपेटय़ांमधूनच येत आहेत. हे कसले अच्छे दिन? अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात भारत-पाकिस्तान अशा ट्रेन व बसेस सुरू करण्यात आल्या होत्या. त्यानंतर कारगिलचे युद्ध झाले. पाकिस्तान कोणत्याही परिस्थितीत बदलणार नाही हे स्पष्ट दिसत आहे. आजही पाककडून सीमाभागात गोळीबार सुरू आहे. परंतु पंतप्रधान म्हणून मोदींना याचे गांभीर्य दिसत नाही.
मनसेचे सरकार हेच लक्ष्य
राज्यात सेनेने भाजपशी युती केल्यानंतर खऱ्या अर्थाने प्रादेशिक पक्ष असा राहिलाच नाही. प्रादेशिक पक्षाची पोकळी भरून काढण्याचे काम मनसेने केले आहे. देशातील बहुतेक राज्यांत एकाच पक्षाचे सरकार असून राज्यातही मनसेचेच सरकार सत्तेवर यावे यासाठी माझा प्रयत्न आहे. या विधानसभा निवडणुकीत मी सर्वशक्तिनिशी उतरलो आहे. माझा युती-आघाडीवर विश्वास नाही. आघाडी-युतीमध्ये वेगवेगळ्या घटकांचे वेगवेगळे इंटरेस्ट असतात. यातून राज्याचा विकास खऱ्या अर्थाने होऊ शकत नाही. हा विकास करण्याची क्षमता केवळ मनसेमध्ये असून त्यासाठी आवश्यक असलेली इच्छाशक्तीही मनसेकडे आहे. मी सादर केलेल्या ‘ब्लू प्रिंट’वर वेगवेगळ्या क्षेत्रांतील लोकांनी चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. जे मी करू शकतो तेच या विकास आराखडय़ात मांडले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत लोक मनसेवर विश्वास ठेवून मतदान करतील.
स्वतंत्र विदर्भ ही नेत्यांची इच्छा
विदर्भ स्वतंत्र व्हावा असे विदर्भातील सर्वसामान्य लोकांना अजिबात वाटत नाही. मी अनेकदा विदर्भाचे दौरे केले आहेत. तेथील लोकांना महाराष्ट्रापासून वेगळे होण्याची कोणतीही इच्छा दिसत नाही. परंतु काही नेत्यांनी स्वार्थ व अस्तित्व टिकविण्यासाठी स्वतंत्र विदर्भाची मागणी लावून धरली आहे. विदर्भातील नेत्यांनी विदर्भाच्या विकासासाठी काही केले नाही, आता त्यांच्या स्वार्थासाठी महाराष्ट्राने शिक्षा का भोगायची? कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्राचा तुकडा मनसे पडू देणार नाही.
नाशिकच्या विकासासाठी पाठिंबा घेतला
भाजपने नाशिकमध्ये मनसेचा पाठिंबा काढला तो स्वार्थापोटी. नाशिकच्या विकासाशी त्यांना काहीही देणेघेणे नव्हते. आधी शिवसेनेला सोडून त्यांनी नाशिकमध्ये मनसेला पाठिंबा दिला. त्यानंतर राज्यातील सत्तेवर डोळा ठेवत मनसेचा पाठिंबा काढला. आम्हाला नाशिकचा विकास करायचा आहे. ते आमचे स्वप्न आहे व पाच वर्षांनी नाशिकचा विकास झालेला पाहायला मिळेल. केवळ नाशिकच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेला पाठिंबा स्वीकारला आहे.
लोकसभा निवडणूक लढवणार नव्हतो
लोकसभा निवडणुकीत मनसेचे गणित चुकलेच. खरे म्हणजे मला लोकसभा निवडणूक लढवायचीच नव्हती. आतूनही निवडणूक लढवावी असे मला वाटतच नव्हते. त्यामुळेच भाषणात तुम्हाला राज ठाकरे दिसला नाही. पक्षातील पदाधिकाऱ्यांचे मत लक्षात घेऊन इच्छा नसतानाही निवडणूक लढवावी लागली. त्यामुळे परिणामांचा अंदाज प्रथमपासून होता. निकाल काय लागणार याची पूर्ण कल्पना होती. लोकसभा निवडणुकीमुळे खूप काही शिकायला मिळाले. चांगले पोहायचे असेल तर एकदा तरी तळ पाहावा लागतो. भरती-ओहोटी ही कधी तरी सर्वच राजकीय पक्षांच्या वाटय़ाला येत असते. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर भाजपचे केवळ दोनच खासदार निवडून येऊ शकले. त्या वेळी अटल बिहारी वाजपेयी यांनी काढलेले उद्गार आठवतात. ते म्हणाले होते, ‘इससे नीचे हम जा नहीं सकते, और इसके ऊपर कांग्रेस आ नहीं सकती.’ लोकसभेच्या वेळी भाजपवर जास्त विश्वास ठेवला. नितीन गडकरी यांच्याशी २५ वर्षांची मैत्री आहे. त्यांच्याशी निवडणुकीविषयी चर्चा झाली, परंतु ते बाहेर बोलून गेले आणि लोकसभेचा अंदाज चुकला.
सत्ता आल्यास मीच मुख्यमंत्री
राज्यात मनसेची सत्ता आल्यास मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी मीच घेणार. लोकसभा निवडणुकीनंतर एका भावनेच्या भरात विधानसभा निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती. परंतु नंतर विचार केला, संपूर्ण महाराष्ट्रात प्रचार करायचा आहे. एकखांबी तंबू असल्याने एकाच मतदारसंघाचा विचार करण्याऐवजी महाराष्ट्र हाच मतदारसंघ मानून प्रचार करण्याचा निर्णय घेतला. मनसेला सत्ता मिळाल्यास मी निश्चितपणे निवडणूक लढवेन. यापूर्वी नरेंद्र मोदी यांना गुजरातचे मुख्यमंत्री आधी केले, मग ते निवडणूक लढले. चंद्राबाबूंच्या मागे एनटीआर यांची पुण्याई होती. जयललिता यांच्यामागे एमजीआर होते. या सर्वाचे पक्ष पूर्वीपासून होते. मीच मनसेची स्थापना केली असल्यामुळे आव्हान मोठे आहे. जास्तीतजास्त मतदारसंघांत प्रचारासाठी जावे लागत आहे. पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढवत आहे. जिंकण्यासाठीच लढायचे हे ठरवून लढत आहे.
सेना-मनसे युती उद्धवलाच नको
पक्षस्थापनेपासूनच मी स्वबळावर महाराष्ट्रात लढण्याची भूमिका वेळोवेळी मांडली आहे. तरीही सेना-भाजप युती तुटल्यापासून सातत्याने सेना-मनसे एकत्र येणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मध्यंतरी मी आजारी असताना उद्धवने घरी फोन केला होता. तेव्हा बोलण्याचीही ताकद नव्हती. बोलताना खोकला येत होता. केवळ एकदोन वाक्यांत तब्येतीची विचारणा झाली एवढेच. त्यानंतरही सेना-मनसे युतीची चर्चा सुरू झाली तेव्हा मी फक्त जाणून घेतले. मला माहिती होते काय होणार ते. मी जर ऐकून घेतले नसते तर माझ्यावरच आडमुठेपणाचा ठपका ठेवला गेला असता. यासाठीच युती करणार म्हणजे काय करणार, हे समजून घेतले. घटस्थापनेच्या दिवशीच सेना-भाजपची युती तुटली. त्या वेळी सेनेचे आमदार दांगट माझ्या घरी आले.तुम्ही दोघांनी एकत्र यायला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. मी त्यासाठी प्रयत्न करतो, असेही ते म्हणाले. मातोश्रीवर उद्धवला फोन करतो व तुमचे बोलणे करून देतो, असे ते म्हणाले. लक्षात घ्या, युती २५ सप्टेंबरला तुटली आणि उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख २७ सप्टेंबर होती. दांगटांनी फोन लावला. उद्धव फोनवर आला. म्हटलं, बोल. काय करायचे? उद्धव म्हणाला, चर्चा करू.. एकमेकांवर टीका करू या नको.. निवडणुकीनंतर काय करायचे तेही पाहू.. मी विचारले, चर्चा कोणी करायची? तेव्हा दोन्ही पक्षांच्या दोन दोन लोकांनी एकत्र येऊन चर्चा करण्याचे निश्चित झाले. मनसेकडून बाळा नांदगावकर व नितीन सरदेसाई हे चर्चा करतील, तर सेनेकडून अनिल सरदेसाई व सुभाष देसाई चर्चेत सहभागी होणार होते. प्रथम कोणी फोन करायचा यात न पडता मी बाळा नांदगावकर यांना अनिल देसाईंना फोन करायला सांगितले.
नांदगावकरांनी सकाळी सव्वासात वाजता अनिल देसाईंना फोन लावला तर त्यांचा फोन बंद. त्यानंतर पुन्हा नऊ वाजता फोन लावला तेव्हा देसाई यांनी आपण सेनेच्या उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी जात असल्यामुळे दुपारी बोलू, असे सांगितले.  आमचे सारेच उमेदवार अस्वस्थ होते. त्यांना कारणही माहीत नव्हते. सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोणाहीकडून फोन आला नाही. त्यानंतर माझ्या उमेदवारांना अर्ज भरायला सांगितले. उद्धवकडे ठोस भूमिका नाही. केवळ फिरवाफिरवीचे उद्योग केले गेले. मी आडमुठा नाही, एवढेच मला दाखवून द्यायचे होते. त्यामुळेच त्यांची खरी भूमिका समजून  यांचे खायचे दात व दाखवायचे दात उघड व्हावे यासाठीच चर्चेचा प्रपंच केला.
मुंबई-महाराष्ट्र तोडण्याचा डाव
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकीकडे महाराष्ट्राचे तुकडे पडू देणार नाही, असे सांगतात; तर त्यांच्याच पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष कोणत्याही परिस्थितीत विदर्भ स्वतंत्र करणार, अशी भूमिका मांडतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि देवेंद्र फडणवीस हे मोदींच्या विरोधात भूमिका कशी मांडू शकतात? यांचा छुपा अजेंडा आहे. पंतप्रधान मोदी हे जर निवडणुकीच्या तोंडावर वेळ मारून नेण्यासाठी महाराष्ट्राचे तुकडे पडू देणार नाही, असे सांगत असतील तर ते चुकीचे आहे. गुजरातच्या मुख्यमंत्री मुंबईत येऊन गुजराती व्यापाऱ्यांना गुजरातमध्ये येण्याचे आवाहन करतात, तर नरेंद्र मोदी बुलेट ट्रेन अहमदाबादला मुंबईहून नेणार, हा सारा वेगळ्या प्रकारे मुंबई तोडण्याचाच डाव आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या वेळी जी परिस्थिती आहे तशीच परिस्थिती निर्माण होत असल्याचा संशय येऊ लागल्यास त्यात चूक काय? मुंबईतील घाटकोपर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार प्रकाश मेहता यांच्या प्रचारात केवळ गुजराती साहित्य वापरण्यात येत आहे. हे सारे आताच का बदलू लागले? यातून उद्या मराठी माणूस खवळला तर त्याला जबाबदार कोण? गुजराती व उत्तर भारतीयांसह अनेकांच्या तीन तीन पिढय़ा महाराष्ट्रात राहतात. ते महाराष्ट्राला आपले मानतात. त्यांच्याबद्दल कोणता प्रश्न नाही. परंतु महाराष्ट्रावर कोसळणाऱ्या लोंढय़ांमुळे आज अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. परप्रांतीयांचे मतदारसंघ बनू लागले आहेत. यातून अबू आझमीसारखी व्यक्ती एकाच वेळी दोन मतदारसंघांतून विजयी होऊ शकते. त्यामुळे महाराष्ट्राचा व मराठी माणसाचा विचार करतो तर त्यात काय चुकले? महाराष्ट्रात सर्वप्रथम मराठी तरुणालाच काम मिळाले पाहिजे, ही माझी स्पष्ट भूमिका आहे. आज येणाऱ्या लोंढय़ांमुळे येथील मराठी माणसाला चटके जाणवू लागले आहेत. एके काळी मध्यरात्रीही गाडय़ा लाल दिवा दिसताच सिग्नलवर थांबत असत. आज दिवसाही सिग्नल तोडले जातात. हे ‘बाहेरचे’ कल्चर आहे.
हुशार अमेरिका
अमेरिकेचे नेते हुशार आहेत. कोणाला कसे खूश करायचे हे त्यांना बरोबर माहीत आहे. त्यामुळेच नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यात राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी मोदी यांचे स्वागत ‘केम छो’ म्हणून केले. व्हाइट हाऊसमधील पार्टीच्या वेळी ‘गरबा’ सादर केला. अटलबिहारी वाजपेयी यांनी तसेच मनमोहन सिंग यांचे स्वागत हिंदीत अथवा पंजाबीत बोलून केले काय? पंतप्रधान हे देशाचे असतात, कोणत्या राज्याचे नसतात हे लक्षात घ्या. मोदींची प्रतिमा यातून काय दिसते?
पंतप्रधानांना आचारसंहिता नाही?
राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांना आचारसंहितेचा बडगा दाखवला
जातो. खर्चाचा तपशील सादर करावा लागतो. महाराष्ट्रात मोदी जोरदार सभा घेत आहेत. त्यांनी कितीही सभा घ्याव्या. त्याचा मला काहीही फरक पडत नाही. परंतु मोदी हे आचारसंहितेच्या काळात प्रचारात सरकारी यंत्रणा वापरत आहेत. तो खर्च कोण मोजणार? आम्हाला आचारसंहिता आहे, मग पंतप्रधानांना का नाही?
भाजपमध्ये लायक नेते नाहीत
भाजप नेते गोपीनाथ मुंडे आज असते तर मला महाराष्ट्रात प्रचारासाठी यावेच लागले नसते, असे सांगून पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्रात भाजपमध्ये आता लायक नेते उरले नसल्याचेच दाखवून दिले. प्रचारातील पोस्टर्स व होर्डिग्जवरही केवळ मोदी यांचेच छायाचित्र दिसत आहे. मोदी यांना महाराष्ट्रात एवढय़ा मोठय़ा प्रमाणात सभा घ्याव्या लागत आहेत, यातच राज्यातील नेते काय क्षमतेचे आहेत ते स्पष्ट होते. हे कमी म्हणून स्वबळाची भाषा करणाऱ्या भाजपला काँग्रेस-राष्ट्रवादीमधून मोठय़ा संख्येने उमेदवार आयात करावे लागले.
मुख्य शत्रू भाजप नाही
मनसेचा मुख्य शत्रू हा भाजप नसून काँग्रेस-राष्ट्रवादी आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जेवढे वाभाडे मी काढले तेवढे अन्य कोणत्याही पक्षाने काढलेले नाहीत. गेल्या पंधरा वर्षांत आघाडी सरकारने महाराष्ट्राला बुडवल्यामुळे त्यांनाही आता संपविण्याची वेळ आली आहे. पंतप्रधान बनल्यानंतरही मोदी यांचे केवळ गुजरात एके गुजरात सुरू असल्यामुळेच त्यांच्यावर टीका करत असलो तरी खरा शत्रू हा राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षच आहे.
नरेंद्र  मोदींबाबत  अपेक्षाभंग
लोकसभा निवडणुकीच्या वेळी पंतप्रधानपदासाठी मी नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला होता. माझा पाठिंबा हा मोदींना होता, भाजपला नव्हता. गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी केलेला विकास त्या वेळी माझ्यासमोर होता. या माणसामध्ये काही चांगले करण्याची क्षमता आहे, त्यांची कामाची पद्धत तसेच व्यक्ती म्हणून ie07स्वच्छ चारित्र्य लक्षात घेऊन सर्वप्रथम मोदी पंतप्रधान बनावे, अशी भूमिका मीच मांडली होती. आता पंतप्रधान बनल्यानंतर त्यांनी आपली भूमिका बदलली पाहिजे. ते देशाचे पंतप्रधान आहेत व त्यांची वागणूकही तशीच अपेक्षित आहे. दुर्दैवाने आजही ते केवळ गुजरातचाच विचार करताना दिसतात. महाराष्ट्रात प्रचार करताना गुजरातपेक्षा महाराष्ट्राला पुढे नेईन हे त्यांचे विधान खटकते. सर्वच राज्यांचा विकास करण्याचे त्यांचे धोरण असले पाहिजे. देशातील सर्व राज्ये ही त्यांना मुलासारखी असली पाहिजेत. गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी केवळ गुजरातचा विचार केला तर त्यात काही चुकीचे नव्हते. परंतु पंतप्रधान बनल्यानंतरही त्यांच्या भूमिकेत बदल झालेला नाही, त्यामुळेच त्यांच्यावर प्रचारात टीका केली. त्यांच्याकडून बाळगलेल्या अपेक्षांचा भंग झाल्याचे मला जास्त दु:ख आहे. जपानला जाऊन आल्यानंतर मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन काढण्याची घोषणा कुणासाठी आहे? त्यांनी मुंबई-दिल्ली अथवा मुंबई-कोलकाता अशी बुलेट ट्रेन का सुरू केली नाही? त्यांनीच मुख्यमंत्रिपदी बसविलेल्या आनंदीबेन मुंबईमध्ये येतात आणि येथील व्यापाऱ्यांना गुजरातमध्ये घेऊन जाण्याचा आग्रह धरतात, हा काय प्रकार आहे? मुंबईतील नौदलाच्या जागेवरील केंद्राचा प्रकल्प नरेंद्र मोदी पंतप्रधान होताच गुजरातकडे कशासाठी वळवला जातो?
*शब्दांकन : संदीप आचार्य  *छाया : वसंत प्रभू  *जावडेकर आणि राज यांच्या कार्यक्रमांचे व्हिडीओ पाहण्यासाठी http://www.youtube.com/LoksattaLive येथे भेट द्या.