देशातील सर्वोच्च वैज्ञानिक पुरस्कार म्हणून ओळख असलेल्या शांतीस्वरूप भटनागर पुरस्कारावर नाव कोरणारे डॉ. अमोल दिघे  आणि डॉ. एकनाथ घाटे यांना लोकसत्ता आयडिया एक्स्चेंजमध्ये आमंत्रित करण्यात आले होते. या वेळी विज्ञानातील भारतीय प्रगती, विज्ञानाबद्दलचे समज-गैरसमज, हिग्ज बोसॉनच्या शोधाची कथा अशा विविध गोष्टींचा उलगडा करण्यात आला. तब्बल दीड तास रंगलेल्या या चर्चेचा सारांश..
देव, श्रद्धा आणि विज्ञान
विज्ञान, देव आणि श्रद्धा वेगळे आहेत असे म्हटले जाते. पण याबाबत सांगायचे झाले तर माणसाचे मन खूप कठोर होऊ शकते. आपण आपल्या मनातील विचारांचे विभाग करू शकतो. म्हणजे जेव्हा मी विज्ञान करेन तेव्हा मी विज्ञानावर श्रद्धा करेन. जेव्हा मी देवासमोर हात जोडेन तेव्हा मी सश्रद्ध असेन. या दोन्हीमध्ये श्रद्धा हा समान धागा आहे. यामुळे जरी देव नसला तरी श्रद्धा खरी असू शकते. म्हणून विज्ञान आणि श्रद्धा यात कोणता दुजाभाव आहे असे म्हणता येत नाही. या दोन्ही गोष्टी कुठे तरी जुळतात. विज्ञानाचे वैशिष्टय़ म्हणजे विज्ञानात घाई-गडबडीने आपली मते मांडायची नसतात. त्याचा पूर्ण अभ्यास करून विचारपूर्वक मत मांडायचे असते. याबरोबर विज्ञानात तात्कालिक मतालाही खूप महत्त्व आहे. आता तुमच्या आजूबाजूला काय परिस्थिती आहे हे पाहून तुम्ही मत नोंदवू शकतात. पण नंतर जर निरीक्षणात अधिक प्रभावीपणे काही आढळले तर आपले मत बदलूही शकते. रामानुजन यांनाही देवीने दृष्टान्त दिला आणि त्यात सूत्र सापडल्याची कथा आहे. यामुळे विज्ञान आणि देव यांचा संबंध नसला तरी विज्ञान आणि श्रद्धा यांचा संबंध नक्कीच आहे.
शोध हिग्ज बोसॉनचा
हिग्जचा शोध घेण्यासाठी सर्वात मोठी आवश्यकता होती ती ऊर्जा निर्माण करण्याची. यासाठी एक भलामोठा कोलायडर तयार करणे गरजेचे होते. या कोलायडरमध्येही दोन गोष्टी एकमेकांवर आदळताना त्यात एक मीमीचाही फरक पडला असता तरी प्रयोग यशस्वी होणे कठीण झाले असते.हिग्ज बोसॉनचा शोध नेमका कशासाठी घ्यायचा, त्याचा उपयोग काय, असे प्रश्न अनेकांना पडत असतात. या प्रयोगाला वैज्ञानिकदृष्टय़ा खूप महत्त्व आहे. याचबरोबर भविष्यात याचा उपयोग आपल्याला अनेक गोष्टींसाठी होऊ शकतो. गेले शतकभर जगभरात सर्वात बारीक कण कोणता, याचा शोध घेण्याचा प्रयास सुरू आहे. यातील प्रोटॉन, न्यूट्रॉन असे कण आपल्याला माहिती आहेत. पण असा आणखी एक कण आहे जो खूप महत्त्वाचा आहे असा सिद्धांत १९६४ मध्ये पिटर हिग्ज यांनी मांडला. यानंतर आंग्ले आणि ब्राऊट या दोन वैज्ञानिकांनीही हा सिद्धांत मांडला. सिद्धांताला आता प्रात्यक्षिकाची गरज होती. यासाठी गेल्या ५० वर्षांमध्ये किमान पाच ते सहा प्रयोग झाले. यातीलच सर्न येथील विशाल प्रयोगशाळेत सध्या सुरू असलेला हा एक प्रयोग. या प्रयोगामध्ये आपल्याला हिग्ज बोसॉन आढळून आला. याचा शोध लागल्याने मूलकण वैज्ञानिकांना खूप आनंद झाला. आजवर ते ज्या क्षेत्रात काम करत आहेत त्याचा एक ठोस पुरावा हाती आला. या कणाचा उपयोग भविष्यात आपण वैद्यकशास्त्रापासून ते विविध विज्ञानात करू शकणार आहोत. हा प्रयोग म्हणजे केवळ भौतिक शास्त्रज्ञांसाठीच नव्हे तर तो अभियांत्रिकीमध्ये काम करणाऱ्यांसाठीही खूप महत्त्वाचा होता. कारण हिग्जचा शोध घेण्यासाठी सर्वात मोठी आवश्यकता होती ती ऊर्जा निर्माण करण्याची. यासाठी एक भलामोठा कोलायडर तयार करणे गरजेचे होते. या कोलायडरमध्येही दोन गोष्टी एकमेकांवर आदळताना त्यात एक मीमीचाही फरक पडला असता तरी प्रयोग यशस्वी होणे कठीण झाले असते. ही सर्व प्रमाणे व्यवस्थित होण्यासाठी अभियंत्यांची गरज होती. याचबरोबर या प्रयोगात तयार होणारी मोठी माहिती संकलित करण्यासाठी माहिती आणि तंत्रज्ञानतज्ज्ञांचीही गरज होती. यामुळे हा प्रयोग म्हणजे विज्ञान आणि अभियांत्रिकी याचे अनोखे मीलन ठरला आहे.  या प्रयोगादरम्यान अनेक शोध लागत गेले. सध्याच्या प्रयोगात ग्रीड कम्प्युटिंगचा नवा शोध लावण्यात आला आहे. यामध्ये मोठय़ा प्रमाणावर तयार होणाऱ्या माहितीचे संकलन करणे शक्य होणार आहे. भविष्यात या तंत्रज्ञानाचा वापर आपल्याला सर्वत्र दिसणार आहे.
मूलकणांचा शोध कशासाठी?
मूलकण शोधून नेमके काय साध्य होते याबाबत अनेकदा बोलले जाते. मूलकणांच्या शोधामुळे आपण अधिक समृद्ध आणि प्रगत होत जातो. सध्या जगभरात विविध मूलकणांवर अभ्यास सुरू आहे. यामध्ये न्यूट्रिगो या मूलकणाचाही समावेश आहे. या मूलकणामुळे आपल्याला छुप्या अणुभट्टय़ा आणि तेलाचे साठे शोधण्यास मदत होणार आहे. आजपर्यंत आपण अनेक कणांचा शोध घेतला आहे. हिग्जपेक्षाही अनेक सूक्ष्मकण असू शकतील पण हिग्ज हा कण महत्त्वाचा होता. हिग्जचा कण आपल्याला दिसला नसला तरी आघातानंतर निर्माण झालेल्या ऊर्जेत हिग्जचे गुणधर्म असलेला कण आढळला आहे. हिग्ज हा १०चा वजा २३वा घात इतका सूक्ष्म आहे. आजपर्यंत आपण खूप माहिती मिळवली आहे. अनेक शोध लावले आहेत. पण आजही आपल्याला माहिती असलेल्या गोष्टींपेक्षा पाचपट जास्त गोष्टींचा आपल्याला शोध घ्यायचा आहे. कारण सर्वात शेवटचा कण कोणता हे अद्याप माहिती नाही. यामुळे मूलकणांचा शोध अव्याहत सुरू राहणार आहे. पण हिग्जच्या शोधामुळे आपल्या ज्ञानाचा एक कोपरा नक्कीच पक्का होणार होईल, असे आपण नक्की म्हणू शकतो. आता आपल्या देशात मदुराईजवळ डोंगराच्या खाली प्रयोगशाळा उभारण्यात येत आहे. यामध्ये आपण न्यूट्रिगोचा शोध घेणार आहोत. डोंगराच्या खाली बांधण्यामागचा उद्देश म्हणजे सूर्यकिरणांमधून येणारे न्यूट्रिगो वगळता इतर सर्व मूलकण हे दगडांमध्ये फिल्टर होतील आणि आपल्याला केवळ न्यूट्रिगोचा अभ्यास करता येऊ शकेल.
सर्नचे वैशिष्टय़
सर्व मोठय़ा शोधांचे मूळ हे सर्नच का, हा एक प्रश्न अनेकदा सर्वाना पडत असतो. चांगले विचार करणारे अनेक जण एकत्र आले तर त्यातून चांगल्याची निर्मिती होऊ शकते. असे आपण म्हणतो. अशाच विचाराने सर्नचा जन्म झाला. अनेक शोध असे आहेत की ते पूर्ण करण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर साधनसामग्री लागते. याचबरोबर पैसाही लागतो. या सर्व पाश्र्वभूमीवर युरोपीय देशांनी एकत्रित येऊन सर्न या प्रयोगशाळेची स्थापना केली. ही प्रयोगशाळा मोठय़ा परिसरात विखुरलेली आहे. येथे हजारो वैज्ञानिक काम करत असतात. यात अभियांत्रिकीशी संबंधित विविध विभाग आहेत. खालच्या बाजूस प्रयोग सुरू असतात, तर वर एक सुंदर असा कॅफेटेरिया आहे. हा कॅफेटेरिया म्हणजेच वैज्ञानिकांचे कार्यालय. या ठिकाणीच सर्व वैज्ञानिकांची भेट होते आणि येथेच विचारांची देवाणघेवाण होते. यातूनच अनेक विषय उलगडत जात असतात. युरोपातील सदस्य देशांचे एक व्यवस्थापकीय मंडळ सर्नचे कामकाज चालवत असते, तर काही देश सहयोगी सभासद असतात.
भारत हा सध्या निरीक्षक सभासद आहे. पण भारताने आजपर्यंत सर्नच्या विविध प्रयोगांमध्ये घेतलेल्या सहभागामुळे सर्न भारताने सहयोगी सभासद व्हावे अशी विनंती करू लागला आहे. सध्याच्या प्रयोगात १०० भारतीय वैज्ञानिक काम करत आहेत. त्यांचा यामध्ये थेट सहभाग आहे.
भारताची वैज्ञानिक प्रगती आणि मानसिकता
देशाच्या वैज्ञानिक प्रगतीबद्दल अनेकदा ओरड होत असते. देशाची लोकसंख्या वैगरे पाहता भारताने विज्ञान क्षेत्रात चांगली कामगिरी केली आहे असे आपण म्हणू शकत नाही. पण ही कामगिरी गेली तीन दशके मागे वळून पाहिले तर खरोखच चांगली आहे. भारताने अनेक जागतिक प्रयोगांमध्ये विविध स्तरावर सहभाग घेतला आहे. भारतीय विज्ञानाची प्रगती ही वैयक्तिक होत आहेच याचबरोबर संस्था स्तरावरही होत आहे. पण अजूनही आपण बाल्यावस्थेत आहोत. आपल्याकडे विज्ञानासाठी पोषक असे वातावरण तयार होणे ही मोठी गरज आहे. यासाठी शिक्षण व्यवस्थेला दोष देण्यापेक्षा शिक्षक, पालक यांनी पुढे येऊन यासाठी प्रोत्साहन दिले तरच हे बदल होऊ शकतील. विज्ञान क्षेत्रात अनेक चांगल्या संधी असून त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन पालकांनी बदलला पाहिजे.  विज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना सरकारने, विविध संस्थांनी आणल्या आहेत. याची माहिती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. यासाठी वैज्ञानिक मागे पडतात असेही म्हणण्यास हरकत नाही. सध्याचे तरुण वैज्ञानिक पुढे येऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करीत आहेत. पण या आधीची पिढी मात्र आपल्या कामातच गुंतली होती. पण पालकांनीही याबाबत जाणून घ्यावे आणि विज्ञानातील संधींविषयी माहिती करून घ्यावी. विज्ञानाची आवड मुलांमध्ये निर्माण होत नाही यासाठी शिक्षण व्यवस्थेला दोष देण्यात काही अर्थ नाही. यासाठी शिक्षकांनी पुढाकार घेऊन उपक्रम हाती घेतले पाहिजेत. मग लहान लहान बीजं तयार होतील आणि मग त्यातून वैज्ञानिक होऊ शकतील. मुलांच्या मनात हे रुजवलं गेलं पाहिजे की, वैज्ञानिकांचे जीवन हे खूप सुंदर आहे. येत्या काळात भारतात अनेक आयआयटीसारख्या संस्था उभ्या राहणार आहेत, यामुळे विद्यार्थ्यांना अनेक चांगल्या संधी या शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून उपलब्ध आहेत. आपल्याकडे जे काही ज्ञान शिकविले जाते त्याचा दर्जा चांगला आहे. पण आपल्याला प्रश्न विचारायला शिकविलं जात नाही किंवा प्रष्टद्धr(२२४)्ना विचारायला प्रोत्साहन दिलेलं दिसत नाही. अनेकदा विज्ञानाचे शिक्षण घेतल्यावर पगार काय मिळणार असा प्रष्टद्धr(२२४)्ना पालकांकडून येतो. पण आत ती परिस्थिती नाही. तुम्हाला व्यावसायिक वैज्ञानिक होण्यास काळ जातो. पण या काळात विद्यार्थ्यांना विद्यावेतन दिले जाते आणि ते पुरेसे असते. याला आणखी एक कारण आहे ते म्हणजे जग बदलण्याचा वेग बदलला आहे. आता टीआयएफआरमध्ये बीएस्सीच्या पहिल्या वर्षांपासून दिवाळी सुटीत किंवा उन्हाळी सुटीत विद्यार्थ्यांना संशोधनात सहभागी होता येऊ शकते. विद्यार्थी अभियांत्रिकी आणि वैद्यकीय क्षेत्राकडे वळताना दिसतात, पण आज अभियांत्रिकी करूनही अनेकांना चांगल्या नोकऱ्या मिळत नाहीत. यामुळे समाजात वैज्ञानिक वातावरण आणायचे असेल, तर आपल्या पिढीनेच त्याची सुरुवात केली पाहिजे.
गणिताला नोबेल नाही
गणिताला नोबेल पारितोषिक दिले जात नाही. पण त्याला पर्याय असलेली अनेक पारितोषिके देण्यात येतात. यामध्ये भटनागर पुरस्कार असेल, आबेल पुरस्कार असेल, असे अनेक पुरस्कार आहेत. नोबेल यांच्या मते आपल्या पैशातून अशा व्यक्तींना पुरस्कार दिले पाहिजेत की ज्यांच्या शोधाची उपयुक्तता चांगली आहे. गणिताची उपयुक्तता आहे, पण ती सिद्ध होऊन पुढे येण्यासाठी खूप काळ जातो. कधी काही वष्रे, कधी काही दशके, तर कधी शतकेही लागतात. यामुळे गणिताकडे अनेकदा दुर्लक्ष होताना दिसते. पण गणित ही एक कला असून त्याचे एक वेगळे विश्व आहे. याची उपयुक्तता सिद्ध करण्यासाठी सर्नची गरज नसते. याला संगणकावरील गेम्स असतील किंवा टीव्हीचे रिमोट असेल यात गणित आहे. संगणकशास्त्र हे गणितावर आधारित असून यामध्ये होणाऱ्या संशोधनाचा वापर संगणकामध्ये होतो आणि पर्यायाने त्यातील शास्त्र विकसित होत जाते.
क्रमांक सिद्धांताची गंमत
गणित हा एक किचकट विषय आहे अशी बहुतेकांची समजूत असते. शाळा-कॉलेजांमध्ये शिकवले जाणारे, अभियांत्रिकी वा वाणिज्य शाखेत वापरले जाणारे गणित हे बहुधा एक प्रश्न सोडवण्याची पद्धत म्हणून वापरले जाते. पण संगीत वा अन्य कलांप्रमाणेच गणितालाही त्याचे स्वत:चे अंतर्गत सौंदर्य असते, त्याची स्वत:ची सिमेट्री असते. बहुतेक गणितज्ञ हे यामुळेच गणिताकडे आकर्षति होतात. रामानुजन यांनी मांडलेल्या मॉडय़ुलर फॉर्मला पुढे नेत भारतीय गणितज्ञ संशोधन करत आहेत. क्रमांक सिद्धांतात बऱ्याच ठिकाणी आढळून येणारे हे फॉम्र्स बरीच अंकगणितीय माहिती थोडक्यात सूत्रबद्ध करण्यात महत्त्वाची कामगिरी बजावतात. या क्रमांक सिद्धांताच्या माध्यमातूनच आज क्रेडिट कार्डाच्या माहितीची देवाणघेवाण करताना वापरात येणाऱ्या एन्क्रिप्शनचा शोध लागला आहे. यामुळे आज अनेक ई-व्यवहार हे अगदी सुरक्षितपणे होऊ शकणार आहेत.
वैज्ञानिक आणि कला
वैज्ञानिक आणि कला यांचा फारसा संबंध नसतो असे अनेकदा बोलले जाते. पण ते चुकीचे आहे. गणिताचा अभ्यास करणे हीदेखील एक कला आहे. ही आकडय़ांची कला आहे. यामध्ये रममाण होण्यास गणितज्ञांना आवडत असते. गणित आणि संगीत याचे एक अतूट नाते असून हे नाते खूप मोलाचे आहे. कला हा माणसाचा स्थायीभाव आहे. अनेक वैज्ञानिकांमध्ये विविध कला असतात. त्यातील अनेक जण आपल्या कलांचे प्रदर्शन विविध स्तरांवर करत असतात. कॉलेजमध्ये बहुतांश लोकांनी नाटके, गायन, वादन केलेले असते. पण एका स्तरावर विज्ञानाचा अभ्यास करणे याला ते प्राधान्य देतात आणि कलेपासून दुरावतात. काही वैज्ञानिक कला आणि अभ्यास या दोन्ही गोष्टी यशस्वीपणे सांभाळतात, पण प्रत्येकालाच ते शक्य होते असे नाही. पण याचा अर्थ असे नाही की वैज्ञानिकांना कलेची आवडच नाही. आइन्स्टाइनपासून अनेक वैज्ञानिक असे आहेत की, ज्यांनी अनेक कला जोपासल्या. लोकांच्या मनात अनेक कप्पे आहेत. ते बदलण्यासाठी सध्याच्या पिढीतील मुलांनी अधिक आक्रमक होण्याची गरज आहे. आक्रमक होत असताना त्यांनी आपले मुद्दे पटवून दिले पाहिजेत.
डॉ. अमोल दिघेजिनिव्हा येथील सर्न प्रयोगशाळेत सुरू असलेल्या विश्वाच्या निर्मितीचे गूढ उकलण्याच्या प्रयोगाचे साक्षीदार असलेल्या डॉ. अमोल दिघे यांनी मूलकणांवर प्रेम केले. त्यांचा वेध घेत ते आज भटनागर पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. शाळेत असताना  प्रज्ञा परीक्षेच्या दरम्यान त्यांना गणिताची आवड निर्माण झाली. शिक्षण पूर्ण होताच नोकरी कशी मिळेल यासाठी आयआयटीमध्ये प्रवेश घेताना त्यांनी इंजिनीअरिंग भौतिकशास्त्र या विषयात प्रवेश घेतला. सुटीत त्यांना टीआयएफआरमध्ये प्रोजेक्ट करण्याची संधी मिळाली. तेव्हा तिथे अ‍ॅस्ट्रोसॅट उपग्रहावर काम सुरू होते. अंतराळातून येणारे क्ष-किरण शोधणाऱ्या डिटेक्टरवर त्यांनी काम केले. सध्या ते टीआयएफआरमध्येच न्यूट्रिनो नावाच्या मूलकणावर अभ्यास करत असून विज्ञानाच्या प्रसारासाठी काम करीत आहेत.
डॉ. एकनाथ घाटेवडील आशियाई विकास बँकेत कामाला असल्यामुळे  घाटे यांनी लखनौ, दिल्ली इतकेच नव्हे तर फिलिपिन्समध्ये शिक्षण घेतले. या सर्व ठिकाणी शिक्षण घेत असताना एक गोष्ट मात्र समान होती ती म्हणजे त्यांची गणितातील आवड. घाटे यांनी बारावीत त्यांच्या गणिताच्या
अभ्यासक्रमाव्यतिरिक्तचा अभ्यासक्रम स्वत:हून मागून घेतला आणि तो यशस्वीपणे पूर्णही केला. त्यांनी पदवी पेनसिलव्हेनिया विद्यापीठातून पूर्ण केली व आजूबाजूचे भारतीय विद्यार्थी जेव्हा बिझनेस स्कूलमध्ये जात होते तेव्हा त्यांनी गणिताची कास धरली. आपली आवड त्यांनी संधीत बदलली आणि आज या क्षेत्रात यशस्वी होऊन त्यांनी अनेक सन्मान स्वत:च्या नावावर केले आहेत. तरुण विद्यार्थ्यांची मूलभूत गणिताशी ओळख करून देऊन त्यांना यातील संशोधनासाठी प्रेरणा देण्याचे काम ते आजही करत असतात.

या कार्यक्रमाचे व्हिडीओ पाहण्यासाठी http://www.youtube.com/LoksattaLive येथे भेट द्या.

Senior colorist Ashok Mulye majha puraskar award ceremony
परोपकारात रमलेला रंगकर्मी
singer kartiki gaikwad father pandit kalyanji gaikwad awarded shri sant eknath maharaj swar martand from govind giri maharaj
कार्तिकी गायकवाडच्या वडिलांचा मानाच्या पुरस्काराने गौरव, पोस्ट करत म्हणाली, “हा पुरस्कार म्हणजे साक्षात…”
president droupadi murmu presents bharat ratna awards at rashtrapati bhavan
राष्ट्रपतींच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार प्रदान
piyush goyal
लखलखत्या तरुण तेजांकितांचा आज गौरव; केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल प्रमुख अतिथी