तुकोबांचा संग, भक्तीचा रंग, होवोनिया दंग, निघालो पंढरीशी.. कर कटेवर घेऊन उभ्या असलेल्या त्या सावळ्या परब्रह्माच्या भेटीची आतुरता घेऊन तुकोबांच्या देहू नगरीत एकवटलेल्या वैष्णवांनी हरिभक्तीचा कल्लोळ केला.. कोण कुठला, कुण्या गावाचा, कोणत्या नावाचा हे माहीत नव्हते. पण, तुकोबांची संगत व विठ्ठलाची भक्ती हे एकच सूत्र सर्वाना जोडून ठेवणारे होते.. कित्येक मैल चालण्याचे बळ या भक्तीतून एकवटले जात होते.. पंढरीला निघण्याचा क्षण जवळ आला अन् देहूनगरीने परमोच्च भक्तीची अनुभूती घेतली.. तो क्षण होता जगद्गुरू संत तुकाराममहाराजांच्या पालखी प्रस्थानाचा. चैतन्याने भारलेल्या वातावरणात गुरुवारी दुपारी तुकोबांच्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले.
पालखी प्रस्थान सोहळ्याची अनुभूती घेण्यासाठी आलेले भाविक व प्रत्यक्षात या सोहळ्यात सहभागी होऊन तुकोबांच्या संगतीने पायी विठ्ठलाच्या भेटीसाठी जाणाऱ्या वैष्णवांनी देहूनगरी पहाटेपासूनच फुलून गेली होती. मंदिर, नगरीतील प्रत्येक रस्ता व इंद्रायणीचा काठ.. पाहावे तिथे केवळ भक्तीच्या एका अनोख्या चैतन्याची साक्ष मिळत होती. कुठे अभंगाचे सूर, तर कुठे टाळ-मृदंगांचा घोष कानी पडत होता. प्रत्येकाचा चेहरा उत्साहाने भरला होता. शेतीत काम करून रापलेल्या चेहऱ्यावरही आज आनंदाची एक लकेर उमटली होती. पहाटेपासूनच विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात दर्शनासाठी रांगा लागलेला होत्या.
पहाटे मुख्य मंदिरातील शिळा मंदिरात त्याचप्रमाणे विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात संत तुकाराममहाराज देवस्थानचे अध्यक्ष रामदास मोरे, पालखी सोहळा प्रमुख अशोक निवृत्ती मोरे, सुनील दामोदर मोरे, अभिजित मोरे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. संभाजीमहाराज मोरे यांनी पालखी सोहळ्याच्या काल्याचे कीर्तन केले. आता सोहळ्याचा उत्साह वाढत चालला होता. तुकोबांचे आजोळघर असलेल्या इनामदारवाडय़ात तुकोबांच्या पादुकांची पूजा झाली. दुपारी दीडच्या सुमारास मुख्य मंदिरात पादुका आणण्यात आल्या. मानाचे अश्वही मंदिरात दाखल झाले. त्यानंतर वीणा मंडपात प्रस्थानाचा सोहळा सुरू झाला. प्रथम तुकोबांच्या पादुकांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर सोहळ्यातील मानकरी व सेवेकऱ्यांचा देवस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आला. मंदिरात हा सोहळा सुरू असतानाच बाहेर वारकऱ्यांनी टाळ मृदंगाच्या गजरात ठेका धरला होता. आकाशात ढग जमा झाले होते. अधून-मधून पावसाचा हलकासा शिडकावा होत होता.
‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल’ असा घोष करीत देहूतील तरुणांनी पालखी खांद्यावर घेतली. त्या वेळी वारकऱ्यांचा भक्तिकल्लोळ टिपेला पोहोचला. पालखी मंदिराबाहेर आल्यानंतर दर्शनासाठी झुंबड उडाली. मंदिर प्रदक्षिणा पूर्ण करून पालखी मोठय़ा थाटात मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर पडली. पालखी गुरुवारी देहूतील इमानदारवाडय़ात मुक्कामी राहिली. शुक्रवारी सकाळी आकुर्डी मुक्कामासाठी पालखी मार्गस्थ होणार आहे.
 

पावसाने ओढ दिल्याने परिणाम
वारीला निघण्यापूर्वी शेतकरी शेतीतील सर्व कामे पूर्ण करीत असतो. एखादा चांगला पाऊस झाल्यानंतर पेरणी उरकून तो पंढरीच्या वाटेवर निघतो. पण, यंदाही पावसाने चांगलीच ओढ दिली आहे. मान्सून अनेक ठिकाणी बरसलाच नाही. त्यातून शेतीची कामे खोळंबली आहेत. याचा परिणाम म्हणून यंदा पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांच्या संख्येवर परिणाम झाल्याचे दिसून आले.
 
दिंडय़ांची संख्या अन् वर्षही ३२९
पालखी सोहळ्यासोबत चालणाऱ्या दिंडय़ांच्या संख्येमध्ये दरवर्षी वाढ होत असते. त्यामुळे दिंडय़ांचा आकडा सातत्याने बदलतो. संत तुकाराममहाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या दिंडय़ांच्या संख्येमध्येही यंदा वाढ झाली आहे. यंदा सोहळ्यासोबत ३२९ दिंडय़ा सहभागी झाल्या आहे. योगायोग म्हणजे तुकोबांच्या पालखी सोहळ्याचे वर्षही यंदा ३२९ वे आहे.