उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेशसिंह यादव यांचाच गट खरा समाजवादी पक्ष असल्याचा निष्कर्ष काढत निवडणूक आयोगाने सोमवारी सायंकाळी सायकल हे निवडणूक चिन्ह त्यांनाच बहाल केले. चिन्ह गोठविण्याची शक्यता वर्तविली जात असताना आयोगाच्या या अनपेक्षित धक्कय़ाने समाजवादी पक्षाचे संस्थापक असलेल्या मुलायमसिंहांसमोर आता ‘मार्गदर्शक’ म्हणून अडगळीत राहण्याचा अथवा नव्या पक्षाचा शोध घेण्याचा पर्याय उरला आहे. दुसरीकडे पक्ष व चिन्ह ताब्यात आल्याने अखिलेश आणि काँग्रेसमधील युतीवर जवळपास शिक्कामोर्तबच झाल्यात जमा आहे.

उत्तर प्रदेश निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी  उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होत असतानाही समाजवादी पक्षातील ‘यादवी’वरून संभ्रम संपत नव्हता. त्या पाष्टद्धभूमीवर बहुमत पाठीशी असल्यानेच अखिलेशांकडे समाजवादी पक्षाची धुरा सोपवित असल्याचे आयोगाने स्पष्टपणे नमूद केले. ‘

मुलायमसिंहांना वारंवार संधी देऊनही ते पाठिंब्यांची प्रतिज्ञापत्रे सादर करू शकले नाहीत. तसेच अखिलेश यांच्या गटाने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांतील एकाही कथित संशयास्पद प्रतिज्ञापत्राकडे ते बोट दाखवू शकले नाहीत. म्हणून  स्पष्ट बहुमत असलेल्या अखिलेश यांच्याकडेच सायकल चिन्ह राहील,’ असे मुख्य निवडणूक आयुक्त डॉ. नसीम झैदी, ए.के. ज्योती आणि ओ.पी. रावत यांनी निकालात नमूद केले आहे.