उत्तर प्रदेशमध्ये आणखी एका राजकीय पक्षातील कौटुंबिक वाद निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला आहे. अपना दलच्या अध्यक्ष कृष्णा पटेल यांनी आपणच पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा असल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे त्यांची मुलगी व केंद्र सरकारमध्ये आरोग्य राज्यमंत्री असलेल्या अनुप्रिया पटेल यांनीही आपणच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचे म्हटले आहे. मधल्या काळात आई आणि मुलीत सलोख्याचे प्रयत्न सुरू असल्याचे वृत्त येत होते. परंतु आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या दोन्ही गटांनी पक्षाचे चिन्ह कप आणि प्लेटवर आपापला दावा ठोकला आहे. कृष्णा पटेल यांची दुसरी मुलगी त्यांच्याचबरोबर आहे.
यापूर्वी कृष्णा पटेल गटाच्या वतीने पक्षातील अधिकारावरून अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली आहे. न्यायालयाने आता हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे पाठवले आहे. लखनौ खंडपीठाने अपना दल पक्षाच्या अधिकाराबाबत दोन्ही गटांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे पाठवले असल्याची माहिती पक्षाचे संस्थापक सदस्य मानसिंह पटेल यांनी सांगितले.

यानंतर कृष्णा पटेल गटाने वकिलांच्या माध्यमातून निवडणूक आयोगाकडे आपले म्हणणे सादर केले आहे. अपना दलाच्या (सोनेलाल) नव्या राजकीय गटाच्या प्रमूख अनुप्रिया पटेल या कृष्णा पटेल गटाचे निवडणूक चिन्ह कप-प्लेट चा प्रचारासाठी उपयोग करत आहेत. कृष्णा पटेल याच अपना दलच्या राष्ट्रीय अध्यक्षा असून त्यांनाच आगामी विधानसभा निवडणुकीत फॉर्म ए आणि बी जारी करण्याचा अधिकार प्रदान करावा अशी मागणी मानसिंह पटेल यांनी केली आहे.
अपना दलाचे दोन खासदार व उत्तर प्रदेश विधानसभेत एक आमदार आहे. दोन खासदारांपैकी एक स्वत: अनुप्रिया पटेल तर दुसरे खासदार हे कुंवर हरिवंशसिंह कृष्णा पटेल आहेत. मे २०१६ मध्ये अपना दलमधील कौटुंबिक वादानंतर अनुप्रिया पटेल यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. कृष्णा पटेल यांनी पक्षाच्या बैठकीत अनुप्रिया यांना पक्षातून काढण्यात आल्याचे जाहीर केले होते. यापूर्वीपासूनच पक्षात दोन गट पडले होते.
अनुप्रिया पटेल यांना केंद्रात मंत्रीपद दिल्यानंतर कृष्णा पटेल यांनी तिखट प्रतिक्रिया दिली होती. अनुप्रिया यांना नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात राज्यमंत्रीपदी संधी देण्यात आली होती. जी आपल्या आईची होऊ शकली नाही, ती मोदींची कसं होईल? अशी प्रतिक्रिया कृष्णा यांनी अनुप्रिया मंत्री झाल्यानंतर दिली होती.