पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाचे नाव घेऊन अखिलेश यादव यांच्या पत्नी खासदार डिंपल यादव यांनी मोदींवर टीका केली. जे लोक गेल्या तीन वर्षांपासून मन की बात करत आहेत त्यांच्या मनात काय आहे याचा विचार आपण केला का असे त्या म्हणाल्या. त्यांच्या मनात आहे भेदभाव, त्यांच्या मनात आहे स्मशान आणि दफनभूमी त्यांच्या मनात आहे दिवाळी आणि रमजान असे म्हणत डिंपल यादव यांनी मोदींवर निशाणा साधला. उत्तर प्रदेशात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्ष आणि भारतीय जनता पक्ष एकमेकांवर टीकास्त्र सोडत आहेत. डिंपल यादव यांनी अनेक गोष्टींवरुन केंद्र सरकारवर टीकेचा भडिमार झाला. मोदी मन की बात मध्ये बोलतात परंतु त्यांना माता-भगिनींच्या मनातील बात कधी कळली नाही का असे त्या म्हणाल्या. सिलेंडरची किंमत ४०० वरुन ७०० झाली आहे. तेव्हा ते काय करत आहे याचे भान त्यांना आहे का असे त्यांनी विचारले.

आज पंतप्रधान मोदींचा मन की बात हा कार्यक्रम झाला. ‘मन की बात’च्या सुरुवातीलाच मोदींनी वसंत पंचमी, महाशिवरात्री आणि होळीचा सण आपल्या सर्वांच्या आयुष्यात आनंदाचे रंग भरतो, असे सांगून देशवासियांना शुभेच्छा दिल्या. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) एकाचवेळी १०४ उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करत नवा इतिहास रचला. इस्रोच्या पीएसएलव्ही सी-३७ या महत्त्वकांक्षी मोहिमेकडे जगातील अनेक देशांचे लक्ष लागले होते. अखेर आपल्या लौकिकाला जागत इस्रोने न भूतो न भविष्यती अशी कामगिरी करून दाखविली. या कामगिरीचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कौतुक केले.

त्या पार्श्वभूमीवरच आज डिंपल यादव यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली. एका सभेदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी म्हटले होते की अखिलेश यादव यांच्या सरकारमध्ये हिंदू-मुस्लीम असा भेदभाव होते आहे. ज्या गावात दफनभूमी आहे त्या गावात स्मशानही असणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. तर रमजानला वीज येते परंतु दिवाळीला येत नाही असे ते म्हणाले. त्यांच्या या आरोपांना उत्तर देताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी म्हटले की माझ्याजवळ अहवाल आहे. दिवाळीला देखील आम्ही तितकीच वीज दिली जितकी रमजानला देण्यात आली. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान हे मुद्दे कुठून उकरुन काढतात असा प्रश्न त्यांनी विचारला.