अखिल भारतीय आखाडा परिषद पाच राज्यांमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला धक्का देण्याच्या तयारीत आहे. अयोध्या येथे राम मंदिर उभारण्याच्या आपल्या वचनापासून भाजपने माघार घेतल्याचा आरोप आखाडा परिषदेने केला आहे. त्यामुळे ही परिषद विधानसभा निवडणुकीत भाजपचा विरोध करायचा व त्यांना मतदान न करण्याचा निर्णय घेऊ शकते.
केंद्रात संपूर्ण बहुमत असतानाही भाजपने राम मंदिर मुद्यावर मौन बाळगले आहे. इतकेच नव्हे तर धर्मांतरण, गो हत्या, गंगा प्रदूषण आणि कलम ३७० सहित इतर अनेक मुद्यांवर कोणताही ठोस निर्णय घेताना दिसलेले नाहीत. याचाच अर्थ भाजपला मंदिराची निर्मिती करायचीच नाही. फक्त निवडणुकीपुरते हा मुद्दा तापवयाचा आणि लोकांच्या भावना भडकावून मत मिळवायची, असे भाजपचे धोरण असल्याची टीका या आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांनी म्हटले. देशातील साधू-संतांची ही सर्वांत मोठी संस्था आहे.

भाजपच्या या भूमिकेमुळे साधू-संत नाराज झाले आहेत. त्यामुळेच त्यांनी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मतदान करायचे नाही व त्यांचा विरोध करण्याचा निर्णय घेतला असल्याचे ते म्हणाले. सामान्य लोकांनाही याबाबत जागरूक करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासंबंधी जानेवारी महिन्याच्या अखेरीस अलाहाबाद येथे आखाड्यांच्या पदाधिकाऱ्यांची, साधू-संतांची बैठक होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
साधू-संतांचा भाजपवर आता काहीच विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे राम मंदिर निर्मितीच्या आश्वासनाला ते बळी पडणार नाही. तसेच जाती-धर्माच्या आधारावर मत मागणाऱ्या कोणत्याही मोहिमेचे समर्थन करणार नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. या वेळी साधू-संत हे विकासाच्या मुद्यावर मतदान करणार असून लोकांनाही हेच अपील करणार असल्याचे ते म्हणाले. मंदिर आणि हिंदुत्वासह इतर मुद्यांवर भाजपच्या आमिषाला बळी पडू नका असे त्यांनी आवाहन केले आहे.
केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून देशात गो मांसाची निर्यात वाढल्याचे ते म्हणाले. निवडणूक प्रचारात भावूक होणार मोदी हे गो हत्या रोखण्यासाठी कोणतेही पाऊल उचलताना दिसत नसल्याचा आरोप केला.
वर्ष २१०४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत साधू-संत व हिंदुत्ववादी मतदारांनी मोदींना त्यांच्या विकासाच्या मुद्यावर नव्हे तर त्यांची हिंदुत्वाची छबी पाहून मतदान केल्याचे म्हटले. कारण निवडणुकीनंतर ते राम मंदिर व इतर मुद्यांवर लोकांच्या भावनेप्रमाणे काम करतील. परंतु असे होताना दिसत नसल्याचे ते म्हणाले.