समाजवादी पक्षाचे ‘सायकल’ चिन्ह कोणाला मिळेल यावर निवडणूक आयोगाचा निकाल काही तासातच समोर येईल. तत्पूर्वी मुलायमसिंह यादव यांनी मात्र अखिलेश यादव यांच्यावर हल्लाबोल केला आहे. अखिलेश यांच्यावर टीका करताना ते मुस्लिमविरोधक असल्याचा आरोप ही त्यांनी केला. पत्नी व मुलांची शपथ दिल्यानंतर ते माझ्याशी बोलण्यास आले. पण एक मिनिटांतच काहीही न ऐकता ते उठून गेल्याचा नवा खुलासा पक्ष कार्यकर्त्यांसमोर बोलताना केला. ते म्हणाले, मी अनेकवेळा अखिलेशला चर्चेसाठी बोलावले. परंतु ते आले नाहीत. अखिलेश माझा मुलगा आहे. पण मला माहित नव्हतं की ते विरोधकांना जाऊन मिळतील.

मुलायमसिंह यांनी पुन्हा एकदा रामगोपाल यादव यांच्यावर निशाणा साधला. माझा मुलगा दुसऱ्याच्या हातातील खेळणं झाला आहे. रामगोपाल यांनी पक्षाला बरबाद करण्यासाठी कोणतीही कसर सोडलेली नाही, असा आरोप केला. सायकल चिन्ह मिळण्याचा आज निर्णय होईल. चिन्ह मिळो अथवा न मिळो, तुम्ही मला साथ द्या, असे भावनिक आवाहन केले. याचदरम्यान कार्यकर्त्यांनी पक्ष वाचवण्याची घोषणा करण्यास सुरूवात केली. या वेळी मुलायम यांनी सर्वांना रागावून गप्प बसवले.
पक्षाची व्होट बँक समजल्या जाणाऱ्या मुस्लिम समुदायाचा उल्लेख करताना त्यांनी अखिलेश हे मुस्लिम विरोधक असल्याचा आरोप केला. अखिलेश यांच्या उमेदवार यादीत मुस्लिमांचा समोवश कमी आहे. लोकांमध्ये अखिलेश हे मुस्लिम विरोधक असल्याचा संदेश गेला आहे. अखिलेश यांनी अनेक मंत्र्यांना विनाकारण पक्षातून बाहेर काढले आहे.
निवडणूक आयोग जो काही निर्णय घेईल. तो मी स्वीकारेल. मी पक्ष आणि सायकल वाचवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत आहे. जर (अखिलेश) त्यांनी काही ऐकलं नाही. तर मी त्यांच्याविरोधात लढाई लढेल, असा निर्वाणीचा इशारा दिला.