उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात रंगत येताना दिसत आहे. दररोज होणाऱ्या जाहीर प्रचारसभांमधून एकमेकांवर चिखलफेक करण्यात सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आघाडी घेतली आहे. या राजकीय दंगलीत समाजवादी पक्षाचे नेते राजेंद्र चौधरी यांनीही उडी घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना दहशतवाद्यांची उपमा दिली आहे. चौधरी यांच्या या टीकेमुळे उत्तर प्रदेशमधील राजकारण ढवळले गेले आहे. मोदी व शहा यांना दहशतवादी म्हणत चौधरी म्हणाले, गुजरातचे दोन जादुगार उत्तर प्रदेशमध्ये खूप फिरत आहेत. त्यांना उत्तर प्रदेशच्या सामान्य नागरिकांना राजकारण कळत नाही त्याचा आपल्याला फायदा उठवता येईल असं वाटतं. परंतु, ते विसरलेत की येथील मतदार खूप जागरूक आहेत. येथील नागरिकांची ते दिशाभूल करू शकत नाहीत, असा टोलाही लगावला.

उत्तर प्रदेशमधील सामान्य जनता कोणत्याही पक्षाला राजकीय मर्यादेविरोधात काम करू देणार नाही. जनतेची दिशाभूल करणे हा मोठा गुन्हा असल्याचे सांगत त्यांनी मोदी आणि शहा यांना लक्ष्य केले. या दोन्ही जादुगारांनी राजकारण सोडून आता दुसरं काम शोधलं पाहिजे. केंद्र सरकारवर टीका करताना ते म्हणाले, दिल्लीत जे मोठ्या पदांवर बसले आहेत, त्यांना आपली प्रत्येक गोष्ट बरोबरच आहे, असे वाटते. परंतु, यामुळे काहीच फरक पडणार नाही हे त्यांना माहीत नाही. मोदी म्हणतात की, उत्तर प्रदेशचा विकास झालेला नाही. ते कशाच्या आधारे हे विचारत आहेत, असा सवाल त्यांनी केला. अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखाली राज्याचा मोठा विकास झाला आहे. पण मोदी हे सर्व खोटे ठरवतात. सर्वांना उत्तर प्रदेशचा विकास दिसत आहे. मला तर हेच कळत नाही की, एखादे पंतप्रधान इतकं खोटे कसं बोलतात, असा टोला लगावला.
हिंदू आणि मुसलमानांचे राजकारण करून पुढे जाता येईल असे भाजपला वाटत आहे. परंतु येथील लोक त्यांना असं करू देणार नाहीत, असे म्हणत भाजपला एक- दोन जागा जरी मिळाल्या तरी खूप झाले, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. खोटे बोलण्याचा भाजपला ११ मार्चला धडा मिळणार असल्याचेही ते म्हणाले.