दादरी प्रकरणातील मृत संशयिताच्या आई व पत्नीचा आर्त सवाल; नेत्यांनी केवळ मदतीची आश्वासनेच दिल्याचा आरोप

राजनाथ सिंह आता आलेत. इतक्या दिवस त्यांना सवड मिळाली नाही. मतांमुळे आता आठवण झालीय आमची. राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, आझम खान सगळे ‘शेजारच्या घरा’त आले. पण माझ्या नातवाच्या डोक्यावर मायेने साधा हात फिरवायलासुद्धा कोणी फिरकले नाही. (महंमद) अखलाखचा जीव मोलाचा आणि माझ्या मुलाचा नाही?

एकीकडे राजनाथांच्या सभेसाठी जवळपास सगळा गाव आणि पंचक्रोशी लोटली असताना बिसहाडा गावाच्या मध्यवस्तीतील एक जुनाट घर आक्रोशाने हादरून गेले होते. एका आईचे हृदय मुलाच्या आठवणीने पिळवटत होते आणि दीड वर्षांतच नवऱ्याला गमाविलेल्या एका कोवळ्या विधवेच्या हंबरडय़ाने वातावरण आणखीनच गंभीर बनले होते. सासू-सुनेचा विलाप अंगावर शहारे आणणारा होता.

आपल्या सर्वाना ‘दादरी’ आठवत असेल. हो, तीच दादरी, जिथे गोमांस बाळगल्याच्या संशयावरून महंमद अखलाख सैफी या ५२ वर्षीय मुस्लीम व्यक्तीचा जमावाच्या बेदम मारहाणीत जीव गेला होता. राजधानी दिल्लीपासून फक्त पन्नास किलोमीटरच्या अंतरावर २८ सप्टेंबर २०१५च्या रात्री घडलेल्या त्या घटनेने सारा देश हादरला होता. वाढत्या असहिष्णुतेचे प्रतीक बनलेले हे प्रकरण ‘दादरी हत्याकांड’ म्हणून कुप्रसिद्ध असले तरी प्रत्यक्ष घटना घडली ती बिसहाडा गावामध्ये. तिथून पाच-सहा किलोमीटरवरील दादरी हे तालुक्याचे ठिकाण. जिल्हा गौतम बुद्ध नगर. म्हणजे नोएडा. अंगावर काटा आणणारे ते रात्रीचे हिंसक कृत्य जमावाचे असले तरी पोलिसांनी अठरा जणांना आरोपी केलंय. त्यापैकी दोघे अल्पवयीन असल्याने सुटले. बाकीचे सगळे तुरुंगात. त्यामध्ये एक होता रवी सिसोदिया. मागील ऑक्टोबरमध्ये रवीचा तुरुंगात एकाएकी संशयास्पद मृत्यू झाला. तेव्हापासून रवीची आई निर्मला आणि पत्नी पूजा यांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा थांबलेल्या नाहीत. पण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केल्यानंतर अक्षरश: अंगार बाहेर पडला.

‘अखलाख कुटुंबीयांशी आमचे चांगले संबंध होते. त्या रात्री वाईटच घडले. पण त्या दिवशी माझा मुलगा गावात नव्हताच. तो दिल्लीत नोकरी करायचा. पण त्याला अडकवले. मारहाण न करण्यासाठी तुरुंग अधिकारी आमच्याकडून पैसे घ्यायचे. त्यासाठी मी शेतीचा तुकडा विकला. पण न्याय होण्यापूर्वीच त्यांनी माझ्या मुलाचा बळी घेतला..’ आक्रोशाने थरथरणाऱ्या निर्मला सांगत होत्या. ‘मुस्लिमांना काही झाले की सगळे नेते पळत येतात, मीडिया येतो. मग हिंदूंना का वेगळा न्याय? आम्हीही देशाचे नागरिक आहोत ना? ‘अखलाखकांड’ म्हणता तुम्ही, पण हे ‘रविकांड’ आहे.. तरुणाचा जीव घेतला त्यांनी. अखलाखच्या कुटुंबीयांना अखिलेश यादव हेलिकॉप्टरमधून घेऊन गेला. एक कोटी रुपये दिले. नोएडात दोन घरे दिली. पण माझ्या सुनेला, नातवाला काय दिले? बिच्चारी ती पोरकी झालीत. (स्थानिक खासदार व केंद्रीय मंत्री) डॉ. महेश शर्मा आणि (भाजपचे कट्टर हिंदुत्ववादी आमदार) संगीत सोम येऊन गेले. पण त्यांनी तरी कुठे काय केले. सगळे नुसते बोलतात..’ निर्मला या बोलत असताना शेजारी तोपर्यंत शांत उभारलेल्या रवीच्या पत्नीचा, पूजाचा बांध फुटला आणि तिने एकदमच हंबरडा फोडला. माझ्या नवऱ्याच्या सुटकेसाठी अखलाखच्या कुटुंबीयांच्या हातापाया पडले, पण त्यांना दया आली नाही. मला आता काही नको, न्याय हवा आहे. नवऱ्याच्या मारेकऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे.

देशाचा गृहमंत्री गावात येणार असल्याचे तोपर्यंत त्यांना कळालेच होते. त्या दोघींनी सभास्थानी धडक मारली आणि हजारोंच्या समोर व्यासपीठावर जाऊन थेट राजनाथांपुढील माइक हिसकावला. पण व्यासपीठावरील नेते धावले आणि त्यांनी निर्मलांना बाजूला केले. सर्व काही ठाकठीक झाल्यानंतर राजनाथ उभे राहिले. त्यांच्या भाषणात नोटाबंदी, सर्जिकल स्ट्राइक, ५६ इंची छाती.. असे दादरी हत्याकांड सोडून सर्व काही होते.

राजनाथांनीसुद्धा पाने पुसल्याने निर्मला आणि पूजा यांच्याबरोबरच अनेकांचा भ्रमनिरास झाला. कारण गावातले पंधरा जण दीड वर्षांपासून तुरुंगात आहेत. मोठय़ा अपेक्षेने आरोपींची कुटुंबे तिथे आलेली होती. पण बिसहाडामध्ये येऊन राजनाथांनी चकार शब्द न काढल्याने त्यांच्यात एकदम अस्वस्थता दाटली. त्यातून मतदानावर बहिष्कार टाकण्याचा विचार आरोपींची कुटुंबे करीत आहेत. पण एकंदरीत गावाचा कल भाजपकडे आहे. एक जण कानात म्हणाला, ‘हे ठाकूरांचे गाव. भाजपचे वर्चस्व असणारच.’

पण दादरी मतदारसंघ हा बसपाचा गड. सलग तिसऱ्यांदा विधानसभेत जाण्यासाठी सतबीर गुर्जर सज्ज झालेत. त्यासाठी त्यांना भाजपच्या तेजपाल नागर यांचा अडथळा पार करावा लागेल. नागर हे मास्टरजी म्हणजे निवृत्त मुख्याध्यापक. त्यांची प्रतिमा चांगली. गुज्जरांचे प्राबल्य असल्याने प्रमुख उमेदवार गुज्जरच आहेत. ४७ जागांवरून हनुमान उडी मारण्याच्या प्रयत्नात असलेल्या भाजपला हा मतदारसंघ एकंदरीतच खुणावणारा आहे.

‘अखलाखकांड’ म्हणा किंवा ‘रविकांड’.. पण बिसहाडावगळता मतदारसंघातील इतर गावे ती रात्र, ती घटना विसरू लागलेत. ‘हा सगळा खेळ राजकारण्यांचा. ते तेल ओततात आणि तुम्ही (माध्यमे) काडी लावता..’  दादरीत टेलरिंग काम करणारे महंमद यासीन सांगत होते. ‘भाजपला अजिबात मत देणार नाही. त्यांना तरी कुठे हवीत आमची मते?’ असा प्रश्न विचारणारे यासीनमियाँ निघता निघता हळूच म्हणाले, ‘लेकिन क्या करे.. मास्टरजी (नागर) हमारे अच्छे दोस्त है. दोस्त के खातीर कमल पे व्होट देना पडेगा. ये मजबुरी है. ये दोस्ती का धर्मसंकट है..’

‘क्यूं पीछे पडे हों..?’

दिवंगत अखलाख आणि रवी सिसोदियांचे कुटुंब वर्षांनुवर्षे शेजारी राहणारे. अन्य आरोपीही जवळपासच राहणारे. गोमांसाच्या केवळ संशयाने शतकांचे सौहार्द आणि दशकांची साथसोबत क्षणार्धात बेचिराख झाली. त्या घटनेनंतर घाबरलेल्या अखलाख कुटुंबीयांनी गाव सोडले; पण घटनेच्या सावटाने गावाची पाठ सोडलेली नाही. माध्यमांनी बदनामी केल्याने आमची मुले तुरुंगात सडत असल्याची तीव्र भावना गावकऱ्यांमध्ये आहे. म्हणूनच पत्रकार असल्याची ओळख करून दिली की, त्यांच्या रोषयुक्त नजरा पाठलाग करीत असल्याचे जाणवते. अनोळखी चेहरा पाहून अखलाखच्या घराबाहेरच्या गल्लीत उन्हं खात बसलेली जख्खड म्हातारी म्हणाली, ‘कुणी पाठविलंय? मोदीने की अखिलेशने?’ मी म्हटलं, नाही. कुणीच नाही. ती एकदम खासकन् म्हणाली, ‘फिर बेमतलब क्यूं आये हों.. क्यूं हमारे बच्चों के पीछे पडे हों? सारी जिंदगी हैराण कर दी..’