उत्तर प्रदेशात भाजपला रोखण्यासाठी समाजवादी पक्ष आणि काँग्रेस एकत्र आले आहेत. जागावाटपावरुन समाजवादी पक्ष आणि काँग्रेसमध्ये असलेला संघर्ष संपुष्टात आला आहे. जागावाटपावरुन समाजवादी पक्ष आणि काँग्रेसची युती संकटात सापडली होती. मात्र अखेर समाजवादी पक्षाने काँग्रेससाठी १०५ जागा सोडण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे उरलेल्या २९८ जागांवर समाजवादी पक्ष लढणार आहे. दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी युतीचा निर्णय जाहीर केला आहे.

जागावाटपावरुन असलेले मतभेद संपवून समाजवादी पक्ष आणि काँग्रेसकडून युतीची घोषणा करण्यात आले. काँग्रेसचे राज बब्बर आणि समाजवादी पक्षाचे नेते उत्तम नरेश यांनी संसुक्तपणे पत्रकार परिषद घेत युतीच्या निर्णयाची घोषणा केली. सध्या काँग्रेसचे आमदार असलेल्या मतदारसंघातही समाजवादी पक्षाने उमेदवारांची घोषणा केल्याने आणि अपेक्षित जागा न सोडल्याने काँग्रेसमध्ये नाराजी होती. अखेर समाजवादी पक्षाने काँग्रेससाठी १०५ जागा सोडण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या आघाडीवर शिक्कामोर्तब झाले.

‘भारताच्या एकतेसाठी आणि एकात्मतेसाठी आम्ही धर्मनिरपेक्ष पक्ष म्हणून समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या नेतृत्त्वाखाली लढा सुरुच ठेवणार आहोत,’ असे समाजवादी पक्षाच्या नरेश उत्तम यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे. अखिलेश यादव पुन्हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री देशाची धर्मनिरपेक्षता आणखी बळकट होईल, असेही उत्तम यांनी म्हटले. ‘आम्ही सर्व ४०३ जागांवर लढणार आहोत. यातील २९८ जागांवर समाजवादी पक्षाचे उमेदवार असतील, तर १०५ जागांवर काँग्रेसचे उमेदवार असतील. जातीयवादी भाजपला आणि मायवतींच्या बहुजन समाज पक्षाला रोखण्यासाठी काँग्रेससोबत निवडणूक लढवत आहोत,’ असे नरेश उत्तम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.