उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आज (शुक्रवारी) समाजवादी पक्षाची पहिली उमेदवारी यादी जाहीर केली. या यादीत १९१ उमेदवारांची नावे आहेत. या यादीत अखिलेश यांचे काका शिवपालयादव यांच्या नावाचाही समावेश आहे. ते जसवंतनगर येथून निवडणूक लढवणार आहेत. त्याचबरोबर अखिलेश यांनी बेनीप्रसाद वर्मा यांचा मुलाऐवजी अरविंद सिंह गोप यांना तिकिट दिले आहे. त्याचबरोबर हरदोई येथून खासदार नरेश अग्रवाल यांचा मुलगा नितीन अग्रवाल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर आझम खान यांच्या मुलाचेही तिकिट निश्चित झाले आहे. ते रामपूरमधून निवडणूक लढवणार आहेत. त्याचबरोबर कानपूर कँट येथून अतिक अहमद यांच्या ऐवजी हसन रूमी यांना तिकिट देण्यात आले आहे.

इतर जागांवरील उमेदवार लवकरच जाहीर होती. काँग्रेसबरोबर आघाडी करण्यात येणार असल्यामुळे अजून उमेदवारांची घोषणा करण्यात आली नसल्याचे बोलले जाते. काही दिवसांपूर्वी समाजवादी पक्षाबरोबर आघाडी होणार असल्याचे काँग्रेसने जाहीर केले होते. यापूर्वी काँग्रेसने शीला दीक्षित यांना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार जाहीर केले होते. परंतु आघाडीची घोषणा केल्यानंतर त्यांनी आपले नाव मागे घेत अखिलेश यांना समर्थन दिले होते. परंतु जागा वाटपावरून दोन्ही पक्षात चर्चा पुढे जाऊ शकलेली नाही. काँग्रेस आणि समाजवादी पक्षाशिवाय अजित सिंह यांच्या राष्ट्रीय लोकदलही या आघाडीत सहभागी होणार होते. परंतु जागा वाटपावरूनच ते येऊ शकले नसल्याचे बोलले जाते.