उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेसबरोबर झालेल्या आघाडीबाबत मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ‘द हिंदू’ या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत समाजवादी पक्ष व काँग्रेस आघाडी होण्यामागचे कारण सांगून खळबळ उडवून दिली आहे. जर आमच्या कुटुंबीयांत वाद झाला नसता तर सप आणि काँग्रेसमध्ये आघाडीच झाली नसती, असे त्यांनी म्हटले आहे.
मुलाखतीत अखिलेश म्हणाले, परिस्थितीमुळे काँग्रेसबरोबर आघाडी करावी लागली आहे. जर कुटुंबात वाद झाले नसते तर काँग्रेसबरोबर आघाडीच झाली नसती. उत्तर प्रदेशमधील निवडणुका अखेरच्या टप्प्यात असताना अखिलेश यांनी हे वक्तव्य केले आहे.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी समाजवादी पक्ष आणि काँग्रेसमध्ये आघाडी झाली आहे. यामध्ये समाजवादी पक्ष २९८ जागांवर तर काँग्रेस १०५ जागांवर लढत आहे. तर अमेठी आणि रायबरेली येथील पाच ठिकाणी दोन्ही पक्षांनी आपापले उमेदवार रणांगणात उतरवले आहेत.
शिवपाल यादव यांनी अफजल अन्सारी आणि मुख्तार अन्सारी या अन्सारी बंधूंचा कौमी एकता दल समाजवादी पक्षात विलिन केला होता. परंतु, अखिलेश या विलिनाकरणाच्या विरोधात होते. तेव्हापासून पक्षात दुही माजण्यास सुरूवात झाली होती. यांच्यातील वाद इतका विकोपाला गेला की पक्ष मुलायमसिंह यादव आणि अखिलेश यादव अशा दोन गटांत विभागला गेला. ‘सायकल’ या निवडणूक चिन्हावरून यांची लढाई निवडणूक आयोगापर्यंत गेली होती.
उद्या १२ जिल्ह्यातील ५३ जागांसाठी मतदान
उद्या (गुरूवारी) उत्तर प्रदेशमध्ये चौथ्या टप्प्यात १२ जिल्ह्यातील ५३ जागांवर मतदान होत आहे. निवडणुकीच्या आधी येथे हिंदू-मुस्लिम समाजात संघर्ष झाला होता. या निवडणुकीत सप-काँग्रेसची भाजप आणि बसपशी लढत आहे.