उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी सर्वच पक्षांनी प्रयत्नांची शिकस्त चालवली आहे. याचदरम्यान जात, धर्मावरील राजकारणाने पुन्हा एकदा वेग घेतल्याचे दिसत आहे. नुकताच केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी भाजपने यूपीत एकही मुस्लिम उमेदवारास विधानसभेचे तिकिट दिले नसल्याबद्दल खंत व्यक्त केली होती. उमा भारती यांचा हा मुद्दा खासदार विनय कटियार यांनी खोडला होता. मुसलमान भाजपला मतदान करत नाहीत तर त्यांना का उमेदवारी द्यायची असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. आता यामध्ये केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनीही उडी घेतली असून यूपीत भाजपने मुस्लिमांना उमेदवारी दिली असती तर चांगले झाले असते, असे त्यांनी म्हटले आहे.
परंतु, यावरून पक्षातील नेत्यांमध्ये वाद असल्याचे वृत्त त्यांनी नाकारले आहे. भाजप समाजातील सर्व वर्गांना बरोबर घेऊन जाण्यावर विश्वास ठेवते. पक्ष सत्तेवर आल्यानंतर मुस्लिम समुदायाला याची भरपाई केली जाईल, असेही त्यांनी म्हटले. तिकिट वाटपाबाबत बोलायचं म्हटलं तर मुस्लिमांना उमेदवारी दिली असती तर परिस्थिती चांगली राहिली असती. सरकार सत्तेवर आल्यानंतर आम्ही त्यांच्या (मुस्लिम) अडचणी दूर करू आणि त्यांना भरपाईही देऊ, असेही ते म्हणाले.
दरम्यान, उमा भारती यांनी भाजपने एकाही मुस्लिम उमेदवाराला निवडणुकीत उमेदवारी दिली नाही. पण विधान परिषदेत त्यांना स्थान देऊ असे म्हटले होते. यासाठी त्यांनी प्रदेशाध्यक्ष केशव प्रसाद मौर्य आणि राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याबरोबर याविषयी चर्चा झाली असल्याचे म्हटले होते. तर विनय कटियार यांनी मुस्लिम समाज भाजपला मत देत नाही. त्यामुळे त्यांना उमेदवारी का द्यावी असा उलट सवाल केला होता. त्याचबरोबर त्यांनी पुन्हा एकदा राममंदिरचा राग आळवत राममंदिराशिवाय काहीच विकास नसल्याचे विधान केले होते.