उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजप खासदार विनय कटियार सातत्याने चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहेत. प्रचारानिमित्त आयोजित प्रत्येक सभेत ते राममंदिराचा मुद्दा पुढे करत आहेत. आज त्यांनी पुन्हा एकदा हा मुद्दा उपस्थित केला आहे. उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी मतदानाचा आज पाचवा टप्पा आहे. या वेळी कटियार यांनी पुन्हा राममंदिरचा मुद्दा छेडला. उत्तर प्रदेशमध्ये विकास, रोजगार, शिक्षण सर्व देण्यात आले आहे. पण राममंदिर शिवाय हे सर्व बेकार आहे, असे एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी म्हटले. अयोध्येत राम मंदिर उभारणार असल्याचा दावा त्यांनी या वेळी केला.

 

फैजाबाद येथे झालेल्या एका प्रचारसभेत त्यांनी राम मंदिर उभारले नाहीतर त्याच्याविरोधात प्रचंड जनआंदोलन करण्याचा इशारा दिला होता. राम मंदिर बनवण्यासाठी तीन उपाय सुचवले होते. पहिला उपाय म्हणजे न्यायालयाने राम मंदिर बनवण्यासाठी मंजुरी द्यावी. संसदेत राम मंदिर कायदा बनवून तो संमत करावा नाहीतर देशातील सर्वसामान्य जनतेची सहमती मिळवून हे मंदिर उभारावे, असे तीन उपाय त्यांनी सुचवले होते. ‘ज्याप्रकारे बाबरी मशिदीचा ढाचा पाडला, त्याचप्रकारे मंदिराची निर्मिती करु,’ असे वक्तव्य कटियार यांनी या रॅलीला संबोधित करताना केले होते. राम मंदिराला विरोध करणाऱ्या व्यक्तींची तुलना कटियार यांनी अराजकाशी केली होती.

तत्पूर्वी नुकताच झालेल्या एका सभेत त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये भाजपला विजय मिळणे आवश्यक आहे, असे म्हटले होते. भाजपला यूपीत बहुमत मिळाले तरच भाजपला राज्यसभेत बहुमत मिळवता येईल. जर पक्षाकडे राज्यसभेत बहुमत असेल तेव्हाच मंदिर बनवता येईल. त्यामुळे इथे होणारा विकास हा राम मंदिराशिवाय अर्धवट असल्याचे त्यांनी म्हटले होते. देशातील एकता व अखंडतेसाठी इथे मंदिर बनवावेच लागेल, असेही ते या वेळी म्हणाले होते. त्यांनी समान नागरी कायदा आणि तिहेरी तलाक सारख्या मुद्यांवरही भाष्य केले होते. तिहेरी तलाक हा मुस्लिम महिलांवर अन्याय आहे. त्यामुळे त्यांच्यावर बंदी आणणे आवश्यक आहे. देशात एका लग्नाचाच कायदा असला पाहिजे, असे ते म्हणाले होते.