उत्तरप्रदेशमधील निवडणुकीची रणधुमाळी रंगात आली असून नेत्यांनी एकमेकांवर तिखट शब्दात टीका सुरु केली आहे. बुधवारी भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी मुंबई हल्ल्यातील दोषी कसाबचा दाखला देत विरोधी पक्षांवर निशाणा साधला आहे. मतदारांनी उत्तरप्रदेशला ‘कसाब’मुक्त करा असे आवाहनच त्यांनी केले आहे.

उत्तरप्रदेशमधील गोरखपूरमध्ये अमित शहा यांनी बुधवारी प्रचारसभा घेतली. या प्रचारसभेत शहा यांनी काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांच्यावर निशाणा साधला. उत्तरप्रदेशमधील मतदारांनी राज्याला ‘कसाब’मुक्त करावे असे आवाहन केले. कसाब या शब्दाचा उलगडा करताना अमित शहा म्हणाले, क म्हणजे काँग्रेस, स म्हणजे समाजवादी पक्ष आणि ब म्हणजे बहुजन समाज पक्ष असा याचा अर्थ होतो.
सत्ताधारी समाजवादी पक्षाच्या लॅपटॉप वाटपामध्ये जात आणि धर्माला महत्त्व दिले जाते असा आरोपच त्यांनी केला. सत्ताधारी पक्षाचे नेते सर्वात आधी तुम्हाला जात आणि धर्म विचारतात. यात तुम्ही अयोग्य ठरला तर तुम्हाला लॅपटॉप मिळणार नाही असे शहा यांनी सांगितले.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात रंगत येताना दिसत आहे. दररोज होणाऱ्या जाहीर प्रचारसभांमधून एकमेकांवर चिखलफेक करण्यात सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आघाडी घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांचा उल्लेख स्कॅम (scam) असा केला होता. यात एस म्हणजे समाजवादी, सी म्हणजे काँग्रेस, ए म्हणजे अखिलेश आणि एम म्हणजे मायावती असे त्यांनी म्हटले होते. समाजवादी पक्षाचे नेते राजेंद्र चौधरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना दहशतवाद्यांची उपमा दिली होती. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीदेखील भाजपवर टीका करताना गाढवांचा उल्लेख केला होता. सध्या टीव्हीवर एक जाहिरात येते ज्यामध्ये गाढव येतो. मी महानायक अमिताभ बच्चन यांना आवाहन करतो की त्यांनी या गाढवांचा प्रचार बंद करावा असे अखिलेश यांनी म्हटले होते.