• बीएसपी म्हणजे बहनजी संपत्ती पार्टी’ – मोदी
  • मोदी हे निगेटिव्ह दलित मॅन’ – मायावती

पंतप्रधान नरेंद्र मोदी व बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी उत्तर प्रदेश निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सोमवारी एकमेकांवर वैयक्तिक स्वरूपाची टीका केल्याने राज्यातील राजकीय चिखलफेकीत आणखी भर पडली.

मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाचे (बीएसपी) मोदी यांनी ‘बहनजी संपत्ती पार्टी’ असे वर्णन केले. मायावती यांनी भ्रष्टाचाराच्या माध्यमातून प्रचंड संपत्ती गोळा केल्याच्या आरोपाचा संदर्भ त्यांच्या या विधानाला होता.

राज्याच्या माजी मुख्यमंत्री असलेल्या मायावती यांनी मोदी यांच्या नावाच्या आद्याक्षरांवर कोटी करत या वक्तव्याला प्रत्युत्तर दिले. (नरेंद्र दामोदरदास) मोदी हे ‘मिस्टर निगेटिव्ह दलित मॅन’ असल्याचे सांगून, ते आपल्या पक्षाचा आधार असलेल्या दलितांच्या विरोधात आहेत असे मायावतींनी सुचवले.

नोटाबंदीच्या निर्णयाला मायावतींनी केलेल्या विरोधाच्या संदर्भात बोलताना, बीएसपी आता बहुजन समाज पक्ष उरलेला नसून तो ‘बहनजी संपत्ती पार्टी’ झाला आहे, अशी थट्टा मोदींनी उडवली. जे स्वत:साठी गोळा करतात ते लोकांचे प्रश्न कधीच सोडवू शकत नाहीत, असे बुंदेलखंड क्षेत्रातील जलाऊँच्या ओराई भागातील सभेतील निवडणूक प्रचारसभेत मोदींनी सांगितले. निश्चलनीकरणाच्या निर्णयाला विरोध केल्याबद्दल त्यांनी सप व काँग्रेस यांच्यावरही टीका केली.मायावती यांनी आपल्यावरील या आरोपाचे जोरदार खंडन केले. दलित, वंचित व दुर्बल घटक तसेच मुस्लीम यांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी मी स्वत:चे जीवन वेचले असून हे लोक मला त्यांची ‘संपत्ती मानतात’ असे त्या म्हणाल्या.पंतप्रधानांची वागणूक लक्षात घेता त्यांची व्याख्या ‘निगेटिव्ह दलित मॅन’ अशी करण्यास मोदी यांनी मला भाग पाडले आहे, असे मायावतींनी सांगितले.