प्रियंका गांधी यांचा पंतप्रधान मोदींना टोला

‘उत्तर प्रदेशात  अनेक तरुण आहेत, जे या मातीत जन्मले, वाढले. शिवाय ज्यांच्या मनात आणि हृदयात उत्तर प्रदेश आहे असे अखिलेश आणि राहुल यांच्यासारखे दोन तरणेबांड नेते उत्तर प्रदेशाला लाभले आहेत. असे असताना उत्तर प्रदेशातील जनतेला बाहेरच्या व्यक्तीला दत्तकपुत्र म्हणून स्वीकारण्याची गरजच नाही’, असा टोला हाणत काँग्रेसच्या ‘स्टार प्रचारक’ प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत उडी घेतली. वाराणसीने मला दत्तकपुत्र म्हणून स्वीकारले आहे. वाराणसीचा विकास करून येथील जनतेचा उतराई होण्याचा मी हरतऱ्हेने प्रयत्न करेन. उत्तर प्रदेशानेही मला दत्तकपुत्र म्हणून स्वीकारावे, असे आवाहन मोदी यांनी प्रचारादरम्यान केले होते. तोच धागा पकडत प्रियंका यांनी पंतप्रधानांना वरीलप्रमाणे टोला हाणला. प्रियंका यांनी समाजवादी पक्ष व काँग्रेस आघाडीला मतदान करण्याचे आवाहन उपस्थित मतदारांना केले.

राहुल यांचे टीकास्त्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढविताना काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी बॉलीवूडच्या दोन गाजलेल्या चित्रपटांचा आधार घेतला. दिलवाले दुल्हनिया ले जाएंगेमधील शाहरूख खानप्रमाणे मोदी यांनी अच्छे दिनचे आश्वासन दिले आणि शोलेमधील गब्बरसिंगप्रमाणे त्याचा समारोप केला, असे राहुल गांधी म्हणाले.

पक्ष कमकुवत करणाऱ्यांना थारा नाही -अखिलेश

इटावा: अखिलेश यादव यांनी काका शिवपाल यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. खऱ्या समाजवादी पक्षाचे मीच प्रतिनिधित्व करत असून, हा पक्ष कमकुवत करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी येथील सभेत  दिला.मुलायमसिंह व माझ्यात मतभेद निर्माण  प्रयत्न काहींनी केल्याचा आरोपही केला.