उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांची तारीख तोंडावर आली तरी, सत्ताधारी समाजवादी पक्षातील अंतर्गत वाद अद्यापही शमलेले दिसत नाही. पक्षात अखिलेश यादव यांचेच वर्चस्व आहे, हेच आता स्पष्ट होत आहे. पक्षाने शिवपाल यादव यांना उमेदवारी दिली असली तरी, निवडणुकांसाठी जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीतून त्यांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे पक्षातील दुफळी अजून कायम आहे, हेच यातून स्पष्ट होत आहे.

समाजवादी पक्षाने मंगळवारी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. त्यात मुलायमसिंह यांचे भाऊ शिवपाल यादव यांचे नाव नसल्याचे दिसते. समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस रामगोपाल यादव यांनी निवडणूक आयोगाकडे स्टार प्रचारकांची यादी सोपवली. त्यात मुलायमसिंह यादव, अखिलेश यादव यांच्यासह इतर ३८ नेत्यांची नावे आहेत. मात्र, त्यात मुलायमसिंह यांचे भाऊ शिवपाल यादव यांच्या नावाचा समावेश नाही. रामगोपाल यादव यांनी दिलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत किरोणमय नंदा, आझम खान, रामगोपाल यादव, नरेश अग्रवाल, जया बच्चन, राजेंद्र चौधरी, समाजवादी पक्षाचे महाराष्ट्रातील नेते अबु आझमी यांच्यासह ३८ नेत्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे पक्षाने शिवपाल यादव यांना विधानसभेची उमेदवारी दिली आहे. इटावाह जिल्ह्यातील जसवंत नगर मतदारसंघातून समाजवादी पक्षातर्फे शिवपाल यादव यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

दरम्यान, रविवारी समाजवादी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यावेळीही मुलायमसिंह आणि शिवपाल यादव हे अनुपस्थित होते. वाहतूक कोंडीमुळे जाहीरनाम्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकलो नाही, असे कारण पक्षाकडून देण्यात आले होते. दरम्यान, समाजवादी पक्ष दोन गटांत विभागले गेले आहे, हे यावरून स्पष्ट होत आहे. अखिलेश यादव यांना पक्षाच्या सर्व आमदारांचे समर्थन आहे. त्यामुळे पक्षाच्या चिन्हाची निवडणूक आयोगाच्या दारात पोहोचलेली लढाई अखिलेश यादव यांनी जिंकली होती. निवडणूक आयोगाने पक्ष आणि निवडणूक चिन्ह हे दोन्हीही अखिलेश यादव यांना दिला होता.