उत्तरप्रदेशच्या निवडणुकीत सध्या गाढव हा चर्चेचा विषय ठरला आहे. मुख्यमंत्री अखिलेश यादव, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर आता दिग्विजय सिंह यांनी गाढवाचा उल्लेख करत भाजपवर निशाणा साधला आहे. मोदींजी खरे बोलतात, ते खरंच गाढवाप्रमाणे काम करत आहेत अशी टीका काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी केली आहे. मात्र पंतप्रधानांवर अशा आक्षेपार्ह शब्दात टीका केल्याने अनेकांनी दिग्विजय सिंह यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे.

उत्तरप्रदेशमधील निवडणुकीतील राजकीय वातावरण आता तापले आहे. सर्वपक्षीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असून एकमेकांवर विखारी टीकाही केली जात आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी महानायक अमिताभ बच्चन यांना गुजरातचे सदिच्छा दूत म्हणून काम करु नये असे आवाहन केले होते. त्यावेळी यादव यांनी गाढवांचा उल्लेख केला होता. ‘बच्चन यांनी गुजरातच्या गाढवांचा प्रचार करु नये’ असे यादव यांनी म्हटले होते. अखिलेश यादव यांच्या या विधानावर गुरुवारी नरेंद्र मोदींनी प्रत्युत्तर दिले होते. गाढवापासूनच प्रेरणा घेतो हे मी गर्वाने सांगतो. मी देशासाठी गाढवाप्रमाणे काम करत असून देशातील १२५ कोटी जनता माझे मालक आहेत. गाढव हा प्रामाणिक असतो. गाढव दिलेले काम नेहमी पूर्ण करतो असे मोदींनी म्हटले होते.

मोदींच्या या विधानावर आता काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शुक्रवारी मोदींच्या विधानावर दिग्विजय सिंह यांनी ट्विट केले आहे. दिग्विजय सिंह म्हणाले, ‘मोदी म्हणतात मी गाढवासारखे काम करतोय. मोदीजी तुम्ही बरोबर बोललात. तुम्ही खरंच गाढवासारखे काम करत आहे’ असे वादग्रस्त ट्विट सिंह यांनी केले  मोदींवर दिग्विजय सिंह यांनी केलेली टीका ट्विटरवर अनेकांना रुचली नाही. दिग्विजय यांच्यावर ट्विटरवर टीका होत आहे.

कॅशलेस व्यवहारांवरही दिग्विजय सिंह यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आरबीआय आणि अन्य बँक ग्राहकांनी कष्टाने कमावलेले पैसे हॅकर्सपासून सुरक्षित ठेवण्याची हमी देणार का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.