भाजपवर चांगले संस्कार आहेत. आम्ही एकदा साथ दिली ती शेवटपर्यंत निभावतो अशी भावनिक साद पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तरप्रदेशमधील मतदारांना भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाने उत्तरप्रदेशचा विकास केला नाही, आता त्यांना शिक्षा देण्याची वेळ आली आहे असेही मोदी म्हणालेत.

उत्तरप्रदेशमधील महूमध्ये सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारसभा घेतली. उत्तरप्रदेशमधील निवडणुकीतील चित्र बघून राज्यात भाजपचे सरकार येणार हे स्पष्ट होते असा दावा मोदींनी केला. ‘सबका साथ, सबका विकास’ हा आमचा मूलमंत्र असून आम्ही एकदा साथ दिली ती आयुष्यभर निभावतोच असेही ते म्हणालेत. समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाला तिस-या टप्प्यानंतरच त्यांचा पराभव दिसू लागला आहे. म्हणूनच ते आमच्या मार्गात अडथळे आणत आहेत असा आरोप मोदींनी केला. मतदारांनी भाजपला मतदान करावे, सत्तेवर येताच आम्ही शेतक-यांचे कर्ज माफ करु अशी घोषणा त्यांनी केली. जगभरात आज भारताचा जयजयकार होत आहे. देशातील जनतेने ३० वर्षानंतर एक मजबूत सरकार सत्तेवर आणल्यानेच हे शक्य झाले असे मोदींनी म्हटले आहे.

सपा, काँग्रेस आणि बसपाने भाजपचा पराभव करण्यासाठी वाटेल ते करावे, पण उत्तरप्रदेशच्या भविष्याशी खेळू नये. यंदाची निवडणूक उत्तरप्रदेशचे भविष्य ठरवणार आहे असे मोदींनी नमूद केले. देशाला गरीबीतून मुक्त करायचे असून विकासाची नवी उंची गाठायची असल्याने सर्वांचा विकास होणे गरजेचे असल्याचे मोदींनी स्पष्ट केले.

उत्तरप्रदेशमधील सत्ताधारी समाजवादी पक्षावर टीका करताना मोदी म्हणाले, मुख्यमंत्री अखिलेश यादव हे शेतकरीविरोधी आहे. त्यांनी धर्म आणि जातीच्या आधारे समाजात दुही निर्माण केली असा आरोपच त्यांनी केला. उत्तरप्रदेशमधील कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आली आहे. गुन्हेगारीचा आलेख वाढला आहे. दरोडा, बलात्कार आणि दंगलीसारख्या घटना वाढल्या. आता हे सर्व थांबवण्याची गरज आहे असे मोदींनी नमूद केले. निवडणुकीच्या काळात उत्तरप्रदेशच्या घराघरात वीज पुरवठा होतो. पण निवडणूक गेल्या की वीज पुरवठा पुन्हा खंडीत होतो असा आरोपही त्यांनी केला.