पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणा-या प्रियांका गांधी यांच्यावर भाजपने पलटवार केला आहे. प्रियांका गांधी या बलात्कार आणि हत्यासारख्या गुन्ह्यांमधील आरोपींसाठी मत मागत असल्याची टीका भाजपने केली आहे.

उत्तरप्रदेश निवडणुकीचा प्रचार आता रंगात आला असून भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांनी राज्यभरात प्रचारसभांचा धडाका लावला आहे. रायबरेलीमध्ये काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारसभेत प्रियांका गांधी यांनी थेट मोदींवर टीका केली होती. उत्तरप्रदेशमधील अखिलेश यादव यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री गायत्री प्रजापती यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. गायत्री प्रजापती हे अमेठीतून निवडणूक लढवत आहेत. तर समाजवादी पक्षाचे अरुण वर्मा यांच्यावरही हत्येचा आरोप आहे. या दोन्ही उमेदवारांवरुन भाजपने शनिवारी प्रियांका गांधी यांच्यावर निशाणा साधला.

प्रियांका गांधी या बलात्कार आणि हत्यासारख्या गंभीर गुन्ह्यांतील आरोपींसाठी मत मागत असल्याची टीका भाजपचे प्रवक्ते श्रीकांत शर्मा यांनी केली आहे. अमेठी हा गांधी कुटुंबाचा पारंपारिक मतदारसंघ आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी या मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले आहेत. तर रायबरेलीमधून सोनिया गांधी निवडून गेल्या आहेत. विधानसभा निवडणुकीत हत्या, बलात्कारसारखे गंभीर गुन्हे असलेल्या उमेदवारांविषयी प्रियांका गांधी यांनी मौन बाळगले आहे. प्रियांका गांधी आणि राहुल गांधी हे उत्तरप्रदेशमधील जनतेच्या नव्हे तर गुन्हेगारांच्या बाजूने आहेत. त्यांनी या गुन्हेगारांना संरक्षण दिले असा आरोपच भाजपने केला.

समाजवादी पक्षाचे आमदार वर्मा यांच्यावर महिलेच्या हत्येचा आरोप आहे. याच महिलेने वर्मा यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. पण सत्ताधारी पक्षाने त्यांच्यावर कारवाई करण्यात दिरंगाई करत असल्याचा आरोप भाजपने केला. दुर्दैवाने राहुल गांधी आणि प्रियांका गांधी मोदींवर टीका करतात. पण गुन्हेगारीवृत्तीच्या उमेदवारांविषयी ते काहीच बोलत नाही असे भाजपने म्हटले आहे. समाजवादी पक्षाच्या कार्यकाळात उत्तरप्रदेशमध्ये ६.८ लाख गुन्हे घडले आहेत. पोलीस यंत्रणा या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरत आहे. पण आम्ही सत्तेवर आल्यास गुंडांवर कठोर कारवाई करु असे श्रीकांत शर्मा यांनी सांगितले.