उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्यात आघाडी झाली आहे. काँग्रेसचे नेते आणि उत्तर प्रदेशमधील पक्षाचे निरीक्षक गुलाम नबी आझाद यांनी आज, मंगळवारी ही माहिती दिली. समाजवादी पक्ष आणि काँग्रेसमध्ये जागावाटपाची चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. समाजवादी पक्षासोबत आघाडी झाली असली, तरी महाआघाडीवर प्रतिक्रिया देणे त्यांनी टाळले.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक सत्ताधारी समाजवादी पक्ष, भाजप, काँग्रेससह सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. उत्तर प्रदेश जिंकण्यासाठी भाजपने कंबर कसली असून, समाजवादी पक्षानेही आपली सत्ता राखण्यासाठी रणनिती आखल्याचे सांगण्यात येत आहे. निवडणुकीच्या प्रचारात रंग भरला असून, भाजपसह सर्वच पक्षांचे नेते उत्तर प्रदेशमध्ये ठाण मांडून बसले आहेत. त्यात समाजवादी पक्षात उफाळलेल्या ‘यादवी’भोवती उत्तर प्रदेशचे राजकारण घिरट्या घेत होते. त्यामुळे उत्तर प्रदेशात काँग्रेससोबत आघाडी करण्याबाबतची चर्चा लटकली होती. आता हा वाद शमला असल्याने समाजवादी पक्ष आणि काँग्रेसने ‘एक पाऊल पुढे’ टाकत आघाडी केली आहे. या दोन्ही पक्षांमध्ये आघाडी झाली आहे. काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी याबाबत माहिती देऊन आघाडीवर शिक्कामोर्तब केले आहे. या दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपाची चर्चा सुरू झाली आहे, असेही आझाद यांनी सांगितले आहे. याबाबत पुढील काही दिवसांत विस्तृतपणे माहिती दिली जाईल. अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखाली समाजवादी पक्ष आणि काँग्रेस आघाडी निवडणुकांना सामोरे जाईल, असेही आझाद यांनी यावेळी सांगितले.

काँग्रेस नेते आझाद यांनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षात आघाडी झाल्याची घोषणा केल्यानंतर अखिलेश यादव यांनीही आघाडीबाबतच्या माहितीला दुजोरा दिला आहे. पुढील काही दिवसांत याबाबत अधिकृत घोषणा करण्यात येईल, असे अखिलेश यादव यांनी सांगितले. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) नेते लालूप्रसाद यादव यांचे चिरंजीव आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यासाठी प्रचार करतील, अशी घोषणा मंगळवारी खुद्द लालूप्रसाद यादव यांनी केली आहे. माझ्यासोबत तेजस्वीही अखिलेश यादव यांना पुन्हा निवडून आणण्यासाठी प्रचार करू, अशी माहिती लालूप्रसाद यादव यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. उत्तर प्रदेशमधील काँग्रेसच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार शीला दीक्षित यांनी या आघाडीचे स्वागत केले होते. तसेच काँग्रेस-समाजवादी पक्षाची आघाडी झाली तर, मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून बाहेर होईल, असे दीक्षित म्हणाल्या होत्या.