आशाताईंची लांबलचक कारकीर्द आणि आतापर्यंतचं जीवन बघितलं की वाटतं आशाताई म्हणजे एक आनंदाचा खळाळता झराच आहेत! अनंत खाचखळगे पार करत आजूबाजूला स्वरांचे तुषार उडवीत वेगाने पुढे पुढे जाणारा झरा! डोळ्यांतले अश्रू उरात अडवून संगीताचा झरा त्यांनी खळाळता ठेवला आहे.. येत्या ८ सप्टेंबरला आशाबाई ८४ व्या वर्षांत पदार्पण करीत आहेत. गुरुस्थानी असणाऱ्या आशाताईंविषयी..

स्थळ – फिल्म सेंटर! वेळ सकाळची, साधारण साडेअकराची. ५०/६० वादकांचा ताफा सज्ज आहे. अ‍ॅरेंजरसुद्धा आपलं काम चोख बजावत आहेत. मध्ये उभे राहून संगीतकार आर. डी. बर्मन वादकांना काही सूचना देत आहेत. आम्ही कोरस गाणाऱ्या मुली एका बाजूला तयार आहोत आणि मध्ये उभं राहून साक्षात रफीसाहेब आणि ग्रेट आशाताई गाण्याची तालीम करत आहेत. अ‍ॅरेंजर पुकारतात, एक दोन तीन आणि म्युझिक सुरू होतं. रफीसाहेब गायला सुरुवात करतात. त्यांच्या आवाजात गाण्याचा मुखडा पूर्ण होतो आणि त्या क्षणीच आशाताईंच्या एका तानेने सुरुवात होते, टिपेत सुरू झालेली तान सर्रकन् खाली षड्जावर येते. जणू खाली ओघळत आलेला मोत्यांचा एक सरच! प्रत्येक स्वर मोत्यासारखा टपोरा आणि चमकदार! ‘‘जियो आशा, जियो, जियो’’! अगदी उत्स्फूर्तपणे पंचमदा आशाताईंना दाद देतात. अशा जवळजवळ तीन वेळा त्याच गाण्याच्या तालमी होतात. आशाताईंची ती तान प्रत्येक वेळी हुकमीच येत असते आणि प्रत्येक वेळी पंचमदा त्यांना अगदी दिलखुलासपणे दाद देतात. असा हा विलोभनीय क्षण अनुभवण्याचं भाग्य आम्हा काही भाग्यवंतांनाच मिळतं! गाण्याचे शब्द असतात, ‘पल दो पल का साथ हमारा, पल दो पलके याराने है’ अगदी थोडा काळ कोरस गाऊन मी ते सोडलं. त्या काळातच रेकॉर्ड झालेलं हे गाणं!

Police raid on Dancers obscene dance in bungalow at lonawala
लोणावळा: बंगल्यात सुरू होता नृत्यांगनाचा अश्लील नाच; पोलिसांनी टाकला छापा
I experienced a golden age in advocacy asserted Justice Bhushan Gavai
‘‘वकिली करताना मी सुवर्ण काळ अनुभवला,” न्यायमूर्ती भूषण गवई यांचे प्रतिपादन; म्हणाले, “नवोदित वकिलांनी…”
CJI DY Chandrachud
“एवढ्याश्या कारणावरून मला ट्रोल केलं जातं…”, सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सांगितली व्यथा
Loksatta career article about A career in singing
चौकट मोडताना: गोड गळय़ाच्या मल्हारचे बाबा

लहानपणी रेडिओवर रोज सकाळी ‘मंगलप्रभात’ हा कार्यक्रम लागे. अंथरुणात पडल्या पडल्या ‘पंढरीनाथा झडकरी आता’, ‘धागा धागा अखंड विणू या’, ‘नाम घेता तुझे गोविंद’, ‘उठी श्रीरामा’, ‘ये गं ये गं विठाबाई’ अशी छान छान भक्तिगीतं कानावर पडत. आशाताईंच्या आवाजातले ते भक्तिरसाने ओथंबलेले स्वर ऐकताना माझी ‘प्रभात’ मात्र ‘मंगल’मय होऊन जाई. पुढे कॉलेजमध्ये गेल्यावर त्यांच्या मादक गाण्यांनी माझ्या तरुण मनावर गारुड केलं. ‘दम मारो दम’, ‘ये है रेशमी’, ‘तरुण आहे रात्र अजुनी’, ‘आईये मेहेरबां’ अशी असंख्य गाणी! ती ऐकल्यावर वाटे, अरे, ज्या रोमँटिक आणि मदभऱ्या गाण्यांसाठी, पडद्यावरच्या नटय़ांना कमीत कमी कपडे घालून, अंगविक्षेप आणि हातवारे करून डान्स करावा लागतो, ती मादकता आशाताई, आपल्या आवाजाच्या एका फेकीतून उभी करतात. ‘त्या पाश्र्वगायिका नाहीत, तर पाश्र्वनायिका आहेत’, हे उगाचंच का पु. ल. देशपांडे यांनी म्हटलंय! पुढे शास्त्रीय संगीत शिकायला लागल्यावर, त्यांच्या शास्त्रीय गाण्यांनीही तितकीच मोहिनी घातली. ‘छोटासा बालमा’, ‘काहे तरसाए’, ‘सखी सुन’, ‘पिया बावरी’, ‘देखो बिजली डोली’ या गाण्यांनी वेड लावलं. नंतर मात्र आशाताईंना नवीन नवीन गाणी श्रोत्यांना बहाल करण्याचं आणि श्रोत्यांना नवीन नवीन गाणी ऐकण्याचं व्यसनच लागलं! संगीतातला कुठलाच प्रांत त्यांच्यासाठी वज्र्य नव्हता. लावण्या पाहिजेत? घ्या, कव्वाली पाहिजे? तीही घ्या! भावगीत, बालगीतं, चित्रपटगीतं, नाटय़गीत, गझल हे सर्व पाहिजे? तेही सर्व घ्या. श्रोत्यांसाठी त्या सतत वेगवेगळ्या गाण्यांची उधळण मुक्तहस्ताने (का मुक्तकंठाने) करत राहिल्या आणि आम्ही श्रोते ते अधाशासारखं ऐकत राहिलो.

आशाताईंची ही एवढी लांबलचक कारकीर्द पाहिल्यावर वाटतं, ज्या स्वरांनी आमच्या बालपणाला न्हाऊ घातलं, ज्या स्वरांनी आमचं तारुण्य फुलवलं, ज्या स्वरांनी आमच्या प्रौढत्वाला खुलवलंय आणि जे सूर आमच्या वार्धक्यालाही साथ करतील, ते सूर आता ८३ वर्षांचे होणार? खरंच यावर विश्वासच बसत नाही. आज याही वयात त्यांची रेकॉर्डिग्ज, कार्यक्रम, प्रवास अगदी उत्साहात चालू आहेत. हा उत्साह असाच कायम टिकून राहो, हीच वाढदिवसाची त्यांना मनापासून शुभेच्छा!

कॉलेजमध्ये असताना माझा चित्रपटसृष्टीशी काहीच संबंध नव्हता. रोज कॉलेजमध्ये जाणं, अभ्यास करणं, शास्त्रीय संगीत शिकणं आणि रेडिओवरची गाणी ऐकून ती आत्मसात करणं, हाच काय तो माझा दिनक्रम असायचा. कॉलेजमध्ये आमच्या वर्गात नेत्रा जयकर नावाची मुलगी होती. तिने जेव्हा तिची आशाताईंशी ओळख आहे, हे सांगितलं, तेव्हा मी उडालेच! ती आशा मावशीच म्हणायची त्यांना! सुरुवातीला तर त्या थापाच वाटायच्या मला. पण एकदा गिरगावात लांबूनच मी नेत्राला आणि आशाबाईंना एकत्र बघितलं आणि माझा नेत्रावर एकदम विश्वास बसला. एवढी मोठी गायिका नेत्राच्या ओळखीची म्हणून नेत्राशी मैत्री वाढवू लागले. तिला माझ्या नोट्सही देऊ लागले. कॉलेज संपल्यावर माझं लगेच लग्न झालं. त्यानंतर जो काय थोडा काळ मी कोरस गायले, त्या काळात आशाताईंना जवळून बघण्याचं आणि ऐकण्याचं भाग्य मला लाभलं. कोरसमध्ये गात असताना, तर त्या कधी येताएत आणि गायला सुरुवात करताहेत, याकडे माझं लक्ष असायचं. त्या आर्टिस्ट रूममध्ये आल्यावर एक आदरयुक्त भीतीही वाटायची. आल्यावर कोरसमधल्या काही मुली प्रत्येक वेळी.. हो, अगदी प्रत्येक वेळी त्यांच्या साडीचं, गळ्यातल्याचं, कानातल्याचं वर्णन करायच्या, तेव्हा खरंच सांगते, मला त्यांची कीव यायची. वाटायचं, ज्या गायिकेच्या गळ्यातच हिरा बसवून परमेश्वरानं पाठवलंय, तिच्या बाह्य़रूपाकडे या मुलींचं एवढं लक्ष! संगीत दिग्दर्शक त्यांना चाल सांगतोय, ती सही सही उचलून, त्यातल्या स्वत:च्या जागा, हरकती आणि भावना घालताएत, ही सर्व प्रक्रिया पाहणं आणि ऐकत राहणं हा मला एक आनंदसोहळाच वाटे. गाणं कसं असावं याचा तो मूर्तिमंत नमुना असे! त्या वेळी मला सतत जाणवत राही की, या आवाजाला दैवी स्पर्शाबरोबरच मेहनतीची आणि काहीशा तंत्राचीही जोड आहे. कोरसमध्ये गात असताना कधी कधी आशाताई मला म्हणायच्या, ‘उत्तरा! कशाला कोरस गातेस? माझी मजबुरी होती म्हणून मी कोरस गायले. तुझी परिस्थिती तर चांगली आहे. तुझा नवरा एवढा शिकलेला आहे आणि शिवाय तुझा आवाजही चांगला आहे. तेव्हा सोलोवर लक्ष केंद्रित कर. हळूहळू तुला रेकॉर्डिग्ज मिळायला लागतील.’ आणि खरंच त्यांची भविष्यवाणी खरी ठरली.

आता गेली अनेक र्वष, स्वतंत्र पाश्र्वगायन करायला लागल्यावरसुद्धा कधी कधी समारंभातून, तर कधी स्टुडिओत आशाताईंची माझी भेट होते. प्रत्येक वेळी त्या आवर्जून माझी दखल घेतात. चौकशी करतात. क्वचित स्टुडिओत त्यांचं गाणं ऐकण्याचा योग आला, तर सूर वगैरे बरोबर लागतोय ना, असं मला विचारून मला लाजवतातसुद्धा! जेव्हा स्टुडिओत त्यांचं गाणं ऐकण्याचा योग येतो, तेव्हा त्या दिवसाचं सार्थक झाल्यासारखं वाटतं. माझ्यासारख्या संगीतातल्या विद्यार्थिनीला त्यांचं हे गाणं खूपच प्रेरणादायी ठरतं!

एवढय़ा मोठय़ा गायिकेच्या घरी ३-४ वेळा जाण्याचा मला योग आला. ते क्षण मात्र चिरस्मरणीय असेच म्हणावे लागतील. एक थोर गायिका, त्याबरोबरच एक सहृदय व्यक्ती मी त्यांच्यात बघितली. जेव्हा त्यांना साठ र्वष पूर्ण झाली, तेव्हा माझ्या ड्रायव्हरबरोबर मी त्यांना फुलांचा गुच्छ व चिठ्ठी पाठवली. मला त्यांच्या घरी

जायचं मात्र धाडस झालं नाही. मी गाडीतच बसून रहिले. ड्रायव्हरची विचारपूस तर त्यांनी केलीच, त्या बरोबरच त्याला खायला दिलं, पैसेही दिले. घरी आलेल्या निर्माता, संगीतकार आणि पाहुण्यांच्या गर्दीत त्यांनी एवढं भान ठेवावं!

गेली काही र्वष मी आशाताईंवर ‘सलाम आशा’ हा हिन्दी कार्यक्रम करते. तो माझा एक प्रयत्न  आहे. त्यांच्यातल्या अष्टपैलुत्वाने साऱ्यांनाच अचंबित केलेलं आहे. एवढय़ा वेगवेगळ्या मूडस्ची अवघड गाणी गाणं, हादेखील माझ्या गळ्याला एक मोठाच व्यायाम आहे. आज काल अशा सुंदर चाली क्वचितच बनतात. ‘सलाम आशा’चा पहिला कार्यक्रम ठरला, तेव्हा पाऊण महिना आधी माझा नवरा गेला! खरं तर कार्यक्रमाआधी आशाताईंना भेटून मला त्यांचे आशीर्वाद घ्यायचे होते. पण एवढय़ा मोठय़ा संकटामुळे मी एक चिठ्ठी लिहून ती सुधीर गाडगीळबरोबर त्यांना पाठवली. त्यांनी मोठय़ा मनाने मला आशीर्वाद दिले.

माझा ‘सलाम आशा’चा पंचविसावा कार्यक्रम परदेशी, कतार येथे झाला. परत आल्यावर मी आशाताईंना नमस्कार करायला जायचं ठरवलं आणि गेलेही! गेल्यावर अत्यंत साधेपणाने त्या माझ्याशी बोलत होत्या. कार्यक्रम कसा चाललाय, त्यात गाणी कुठली कुठली घेतलीस, याची त्यांनी आस्थेने चौकशी केली. एक आंतरराष्ट्रीय कीर्तीची गायिका माझ्यासमोर बसल्येय, याचं भान मला जरूर होतं, पण माझ्यासारख्या सामान्य गायिकेवर त्यांनी कसलंही दडपण येऊ दिलं नाही, वर  आदरातिथ्यही केलं. काही वर्षांपूर्वीच त्यांचं नाव जेव्हा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये गेलं, तेव्हा त्यांचं अभिनंदन करायला परत मी त्यांच्या घरी गेले. काम करणाऱ्या बाईनं दार उघडलं. ती मला आशाताईंच्या बेडरूममध्येच घेऊन गेली. त्या छान तयार होऊन बसल्या होत्या. भिंतीवर, मास्टर दीनानाथांचा फ्रेम केलेला मोठा फोटो होता. अत्यंत पवित्र वातावरण वाटत होतं. मी विचारलं, ‘‘आशाताई, रेकॉर्डिगची तयारी चाललेय?’’ त्या म्हणाल्या, ‘‘नाही गं, ३-४ दिवसांनी अमृतसरला कार्यक्रम आहे, त्याची सुरुवात पंजाबी गाण्यानं करायचीय, ती बसवतेय.’’ मी खजील झाले. या वयातही केवढी अभ्यासू वृत्ती! त्या वेळीही अत्यंत मोकळेपणाने त्या माझ्याशी बोलत होत्या. पण बोलण्यात मधूनच मुलीबद्दलची काळजी, कळकळ जाणवत होती. पुढे एक-दीड वर्षांतच त्यांची मुलगी गेली. मोठा आघातच होता त्यांच्यावर! प्रत्येक वेळी दैव त्यांना यशाच्या शिखराकडे घेऊन जातं आणि तेच दैव त्यांना संकटाच्या, दु:खाच्या दरीतही लोटतं, पण तरीही त्यातून सावरत, नव्या उत्साहात, आनंदात त्या नवं शिखर पार करायला सज्ज होतात! गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये त्यांचा मोठा मुलगा गेला, दैवानं त्यांच्यावर पुन्हा मोठा घाला घातला. त्यानंतर १०-१२ दिवसांनी मी व रवींद्र साठे त्यांच्या नव्या घरी त्यांना भेटायला गेलो. मुलगा गेल्याचं दु:ख त्यांना जरूर होतं, पण त्या अतिशय शांत होत्या. म्हणाल्या, ‘‘मी लोकांसमोर रडायचं नाही असं ठरवलंय!’’ उलट त्या नुकत्याच झालेल्या कार्यक्रमांबद्दल, त्यांच्या स्वत:च्या हॉटेल्सबद्दल भरभरून बोलत होत्या. ‘‘तुम्ही गळ्यासाठी कोणते व्यायाम करता रे?’’ असं आम्हाला उत्साहानं विचारून झालंच, पण त्याच उत्साहात त्यांनी नवीन शिकून घेतलेले गळ्याचे व्यायाम आम्हाला करून दाखवले. एकदा तर उठून स्वयंपाकघरात जाऊन त्यांनी बाईला आमच्यासाठी पोहे आणि चहा बनवायला सांगितलं. तेव्हा मात्र आम्ही त्यांना ठाम नकार दिला. कुठच्या कारणासाठी आम्ही गेलो होतो त्यांच्याकडे, तरीही चहा प्यायला लावलाच.

हे सर्व बघितलं की वाटतं आशाताई म्हणजे एक आनंदाचा खळाळता झराच आहेत! अनंत खाचखळगे पार करत आजूबाजूला स्वरांचे तुषार उडवीत उत्साहाने आणि वेगाने पुढे पुढे जाणारा झरा! डोळ्यांतले अश्रू उरात अडवून संगीताचा झरा त्यांनी खळाळता ठेवला आहे. रवींद्र साठे आणि मी आशाताईंचा निरोप घेऊन निघालो. निघताना एकाच आशयाचे शब्द आमच्या दोघांच्याही तोंडून निघाले की, ‘आशाताई, गाण्यात तर तुमच्याकडून शिकण्यासारखं आहेच, पण जीवन कसं जगावं हेही तुमच्याकडून शिकण्यासारखं आहे हो!’

संपर्क – ९८२१०७४१७३

उत्तरा केळकर

uttarakelkar63@gmail.com