ऋतूचक्र नव्हे तर दिवसाचे वेगवेगळे प्रहरसुद्धा मला ‘सुहृद’मधून न्याहाळताना मजा येते. सकाळी जाग येते, तीच मुळी पक्ष्यांच्या जुगलबंदीने! खारुताई इकडून तिकडे बागडत असतात. कधी कधी तर चक्क पोपटांचा थवा झाडांवरून आकाशात झेपावताना दिसतो आणि हो, कुठे तरी खालीच सकाळी सकाळीच पेटलेल्या बंबातून येणाऱ्या धुराचा, खोबरंमिश्रित सुवास मला बालपणीच्या आठवणीत घेऊन जातो…

मी माझं लोणावळ्याचं आधीचं घर विकून २०१० मध्ये लोणावळ्यातच नवीन घर घेतलं. असंच एकदा लोणावळ्यात भावाच्या बंगल्याकडे जात असता, त्याच्या बंगल्याजवळच; मुख्य रस्त्यावर एक नवी, दोन मजली बिल्डिंग बघितली. ‘सुहृद’ असं छान नाव होतं त्याचं! सुहृद म्हणजे मित्र! बिल्डिंगच्या पुढच्या बाजूला पाटी लावलेली होती. ‘फ्लॅटस फॉर सेल’. पाटी वाचून मी उत्सुकतेनं आत गेले. केअरटेकरनं पहिल्या मजल्यावरचे दोन फ्लॅटस दाखवले. पण त्यात विशेष असं काहीच वाटलं नाही. मुंबईच्या फ्लॅटसारखेच ते फ्लॅट होते. मी जरा निराश झाले. तेवढय़ात केअरटेकर म्हणाला, “बाई, वरच्या मजल्यावर चला ना. तिथला फ्लॅट नक्की आवडेल तुम्हाला.” मग मी दुसऱ्या मजल्यावर आले. पहिल्या मजल्यासारखाच दोन बेडरूम हॉल किचनवाला फ्लॅट होता तो! पण भरपूर हवा, खूप उजेड, मोठय़ा मोठय़ा फ्रेंच विण्डोज! आणि सगळ्यात छान म्हणजे हॉलला अगदी लागूनच खूप प्रशस्त म्हणजे जवळजवळ साडेसातशे फुटाची गच्ची. त्यातून वर नागमोडी गेलेला एक जिना आणि वरपण अशीच मोठी थोरली गच्ची. हे सर्व बघून मात्र मी या फ्लॅटच्या प्रेमातच पडले. ‘सुहृद’मधला हा फ्लॅट लवकरात लवकर घ्यायचाच असं ठरवूनच टाकलं मी. आणि दीड महिन्याच्या आत तो घेऊनसुद्धा टाकला. जुलैमध्ये फ्लॅट घेतला. आता रंगकाम, आतली सजावट व्हायला तीन-साडेतीन महिने तरी लागणार होते. दिवाळीत सर्व जवळच्यांना बोलावून मला पूजा करायची होती. घरात फार सामान नको पण सुखसोई मात्र सर्व पाहिजेत, या विचाराने सर्व आखणी केली. हॉलमधलं सर्व फर्निचर प्रदर्शनात विकत घेतलं. थोडं सुतारांनी केलं. सर्व कामगारांनी अगदी वेळेत काम पूर्ण केलं आणि दिवाळीत जवळच्या सर्वांना (चाळीस जणांना) बोलावून आम्ही त्या जागेचा शुभारंभ केला.

pune leopard marathi news, shirur leopard marathi news
कोंबड्यांच्या खुराड्यात बिबट्याची मादी कैद
Caste end thought of Babasaheb Ambedkar and Mahatma Jyotiba Phule
फुले-आंबेडकरांचा जाती-अंत विचार
500 Years Later Surya Grahan Collides With Rarest Chaturgrahi Yog
५०० वर्षांनी सूर्य ग्रहणाला अद्भुत दुर्मिळ योग; ८ एप्रिलपासून ‘या’ राशींच्या नशिबात अमाप श्रीमंती, नशीब चमकणार
shukra and rahu planet will make vipreet rajyog these zodiac could be lucky
राहू- शुक्राच्या संयोगाने ५० वर्षांनंतर तयार होणार विपरीत राजयोग; या तीन राशींच्या लोकांचे नशीब फळफळणार?

गेली सहा वर्षं मी त्या जागेचा ‘आस्वाद’ घेते आहे आणि दरवेळी मी त्या जागेच्या नव्याने प्रेमात पडते आहे. घरातल्या तीन खोल्यांतून तर सतत हिरवाईचंच दर्शन होत असतं. एका बेडरुमच्या खिडकीतून मात्र माणसं दिसतात. एक तरी खिडकी लोकांशी संवाद साधायला हवीच ना? भावाचं घर जवळच असल्यानं, कधी नातेवाईक तर कधी ओळखीची माणसं त्या खिडकीतून दिसतात. कधी नुसता हात तर कधी थोडा संवादही साधला जातो. माझ्या बेडरुमच्या खिडकीतून तर खाली फुललेली बाग, समोर हिरवीकंच झाडं आणि वर निळंशार आकाश एवढंच दिसतं. या घरानेच, तर मला वेगवेगळ्या

ऋ तूतला निसर्ग दाखवला. त्याचं सौंदर्य दाखवलं. पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा, हे तिन्ही ऋतू मात्र तितकेच भुरळ घालतात. हेही या घरानेच दाखवलं मला!

नुकताच, उन्हाळा संपायला लागतो. जून सुरू होतो. मग मळभ दाटायला लागतं. असंख्य काजव्यांचे बल्ब झाडाझाडांतून पेटू लागतात. जोराचा वारा सुटतो आणि विजांच्या कडकडाटात, ढगांच्या गडगडाटात पश्चिमेकडून पावसाच्या मुसळधार सरी, अगदी वाजतगाजत यायला लागतात. पहिला पाऊस एखादा व्रात्य मुलासारखा सैरावैरा धावायला लागतो. इथला पाऊस रिमझिम रिमझिम बरसणारा नाहीच. तो येतो तोच मुळी तांडव नृत्य करीत. हवेत सुखद गारवा पसरतो. एखाद्या चांगल्या परफ्युमच्या तोंडात मारेल असा मातीचा सुगंध दरवळायला लागतो. उन्हाने तृषार्त झालेली झाडं आता समाधानानं डोलायला लागतात. एका दिवसातच ते दृश्य डोळ्यात साठवून मी मुंबईला यायला निघते. तसे मे महिन्यातले आणि दिवाळीतले चार/चार दिवस सोडले तर दर पंधरा दिवसांनी फक्त  एक दिवस मी येथे येते. पण दरवेळी सृष्टीतले बदल मला अचंबित करतात. हळूहळू सर्व सृष्टीवर एक नवा तजेला पसरतो. पावसाच्या आगमनानंतर दोन/तीन महिन्यांतच सृष्टी जणू कात टाकते. उघडीबोडकी झाडं, हिरवी वस्त्र परिधान करून नटायला लागतात. ड्रेसकोड असल्यासारखी! हिरव्या रंगांच्या विविध छटा लेवून ही झाडं आणि ठिकठिकाणी रानटी फुलांची ती रांगोळी दिवाळीच्या स्वागतासाठी सज्ज होते. दवांनी भिजलेल्या पानांवर सूर्याचे कोवळे किरण पडल्यामुळे भर दिवसा सर्व सृष्टी चमचम करायला लागते. जणू सृष्टीच्या असंख्य पणत्याच!

थंडीचा कडाका घेऊन मग दिवाळी येते. जागोजागी मग शेकोटय़ा पेटायला लागतात. धरित्रीच्या कुशीत निजलेली बी बियाणं, आता तरारून वर येऊन मोठी होतात. शेतकरी कापणीच्या तयारीला लागतात. सुखद गारवा आणि त्यात कोवळं ऊन अशा अपूर्व संगमामुळे, लोणावळा पर्यटकांना खुणावू लागतो. असेच काही महिने जातात आणि एक दिवस अचानक कुठून तरी कोकिळा तार स्वरात गाऊ लागते. बंगल्यांचं कंपाऊंड बोगनवेलीनं फुलून जातं. लाल फुलांनी डवरलेला गुलमोहर साऱयांचं लक्ष वेधून घेतो. गच्चीपर्यंत आलेल्या आंब्याच्या झाडांना आता बोटाएवढय़ा कैऱ्या धरू लागतात. आंब्यांची बाळंच जणू! दर पंधरा दिवसांनी त्या बाळसं धरू लागतात. वसंताची चाहूल लागते. हळूहळू परीक्षा संपतात आणि लोणावळा एप्रिल-मेमध्ये पर्यटकांनी फुलून जायला लागतं. एव्हाना कैऱ्यांच्या भाराने फांद्या गच्चीत वाकायला लागतात. एखादं तीन/चार वर्षांचं छोटं मूलदेखील आपल्या हाताने कैऱ्या काढू शकेल, एवढय़ा त्या फांद्या गच्चीत खालपर्यंत येतात. मग आमच्या छोटय़ा पाटर्य़ा गच्चीत रंगायला लागतात. गच्चीत टेबलखुर्च्या टाकून, वर निरभ्र असलेल्या आकाशाखाली चटपटीत पदार्थ खायला व गप्पांना वेगळीच लज्जत येते. अशी धमाल करण्यात मे महिना संपला की परत झाडं, काजव्यांनी भरून जातात. काळोखी दाटते. पाऊस सृष्टीला भेटण्यासाठी खाली झेपावतो! असं हे ऋतूचक्र माझ्या घरातून मी गेली सहा वर्षे निरखते आहे.

अहो, हे ऋतूचक्र सोडा, पण दिवसाचे वेगवेगळे प्रहरसुद्धा मला या घरातून न्याहाळताना मजा येते. सकाळी जाग येते, तीच मुळी पक्ष्यांच्या जुगलबंदीने! वेगवेगळे पक्षी झाडांवरून किलबिलाट करत असतात. खारुताई इकडून तिकडे बागडत असतात. कधी कधी तर चक्क पोपटांचा थवा झाडांवरून आकाशात झेपावताना दिसतो. कधी घरात पाहुणे असले, तर त्यातले पक्षीमित्र झाडांवरच्या पक्षांची नावसुद्धा सांगतात. आणि हो, कुठे तरी खालीच सकाळी सकाळीच पेटलेल्या बंबातून येणाऱ्या धुराचा, खोबरंमिश्रित सुवास मला अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या माझ्या वडिलांच्या बंगल्यात घेऊन जातो. लहानपणी दिवाळीत थंडीमुळे रजईत गुरफटलेल्या आम्हा मुलांना आई भल्या पहाटे प्रेमानं उठवायची. “उठा मुलांनो, दिवाळी आहे ना. लवकर आंघोळी करा.” तिनं पेटवलेल्या बंबातून धुराला पण असाच खोबऱ्याचा सुगंध यायचा. कारण जळण म्हणून तिने बंबात नारळाच्या करवंटय़ा टाकलेल्या असायच्या. आई पाट ठेवायची, त्याच्या बाजूने रांगोळी काढायची आणि आम्हा प्रत्येकाला पाटावर बसवून तेलाने छान मसाज करून त्या बंबातल्या कडकडीत पाण्याने न्हायला घालायची. ते आठवून आजही मन गहिवरतं! तर, सकाळी ही पक्ष्यांची मैफिल आटोपली की मी वरच्या गच्चीत जाते. सुखद गारव्याने मन प्रसन्न होऊन जातं. आजूबाजूचे डोंगर, मध्येच डोकावणारा एक्स्प्रेस वे, उंच उंच झाडं बघत मी जरा व्यायाम करते. मध्येच गाण्याच्या लकेरी घ्याव्यात, कितीही मोठय़ाने गावं, कुणीही डिस्टर्ब करायला नाही. खाली येऊन ब्रेकफास्ट करावा. हळूहळू उन्हं तापायला लागतात. टळटळीत दुपार सुरू होते. झाडांचं नर्तन जरा हळुवार बनतं. गच्चीवरून खालचा रस्ता अगदी एखाद्या अजगरासारखा सुस्त भासायला लागतो. एखादी कातकरीण टोपलीतली कांदाभाकर झाडाच्या सावलीत बसून खाताना दिसते. थकलेला एखादा कामगार फुटपाथवर बसून वडापाव खात असतो.

गावातील छोटी मुलं बर्फाच्या गोळेवाल्याकडून परत परत रंग टाकून गोळे खात असतात. हळूहळू उन्हं पिकायला लागतात आणि संध्याकाळ अवतरते. समोरची दुकानं जागी व्हायला लागतात. एखाद्या दुकानात वडे, पॉटीस तळले जातात. तर दुसऱ्या ठिकाणी चायनीजच्या वासाने भूक खवळते. गरम गरम जिलबी खाण्यासाठी गर्दी व्हायला लागते. त्यातच मेंढ्यांचे कळप आणि त्यांना आवरणारा गुराखी घरी परतायला लागतात. मधूनच देवळातल्या घंटेचा आवाज कानी पडतो. गाई म्हशींचे कळप गळ्यातल्या घंटा वाजवत घरची वाट धरतात. ‘पर्वतांची दिसे दूर रांग, काजळाची जणू दाट रेघ’ किंवा ‘धूळ उडवीत गाई निघाल्या, शामरंगात वाटा बुडाल्या’ हे सुधीर मोघेंचं शब्दचित्र प्रत्यक्ष दिसायला लागतं. अवघी संध्याकाळ शामरंगात न्हाऊन निघते. खालच्या गच्चीत फेऱ्या मारता मारता ही दृश्य न्याहाळत रात्र कधी घरात प्रवेश करते, ते कळतसुद्धा नाही.

रात्री साडेनऊलाच इथे चिडीचूप होऊन जातं. समोरचे दुकानदार आपापला पसारा आवरायच्या मार्गाला लागतात. एखाद्या झाडाच्या पारावर तरुणांचं टोळकं बसलेलं असतं, रात्रीच्या सुरक्षेची जबाबदारीही जणू काही त्यांच्यावरच असते. रस्ते सामसूम व्हायला लागतात. घराघरातले दिवेसुद्धा बंद व्हायला लागतात. समोरचे डोंगर ऋ षीतुल्य भासायला लागतात. थोडावेळ गच्चीतच वाऱ्याचा झुळका घेत मी पण निद्रादेवीची आराधना करायला लागते. हे एका दिवसाचं एकटेपण मी अगदी आनंदाने एन्जॉय करते. तरीपण वाटतंच की या एवढय़ा मोठय़ा घराला माणसांशिवाय शोभा नाही.

मी मुंबईला असताना जावयाचा म्हणजे कौस्तुभचा कधी तरी फोन येतो. “ममा,  मी आणि माझे मित्र लोणावळ्याच्या ‘सुहृद’मध्ये आहोत. वरच्या गच्चीत मस्त तीर्थप्राशन, स्टार्टर्स एन्जॉय करणं चालू आहे.” हे ‘तीर्थप्राशन’ करूनसुद्धा मला माणसांमुळे भरून पावल्यासारखं वाटतं. कधी मुलीचा म्हणजे मानसीचा रात्रीच्या वेळी फोन येतो, “अगं आई, आमचा दहा-बारा मित्रमैत्रिणींचा ग्रुप खालच्या गच्चीत मस्तपैकी कराओकेवर गातोय. गच्चीतल्या भिंतीचा स्क्रिन केलाय आणि त्यावर सगळ्या गाण्यांचे शब्द येताएत. एकीकडे बिर्याणी, आईस्क्रीमही एन्जॉय करतोय.” वा! हे ऐकून घर घेतल्याचं सार्थक झाल्यासारखं वाटतं!

गेल्या पाच वर्षांत खूप लोकं या ‘सुहृद’मध्ये येऊन गेले. ‘सुहृद’मुळेच तर मला हे ऋ तूंचे सोहळे बघायला मिळाले, दिवसाच्या वेगवेगळ्या प्रहरांचे रंग अनुभवता आले. ‘सुहृद’च्या रूपानं खरोखरच मला एक ‘सुहृद’च मिळालाय. एक दिवस राहा/ चार दिवस राहा दरवेळी मुंबईला परतताना ‘सुहृद’मधील वास्तव्य मला नवा आनंद, नवा उत्साह आणि नवी ऊर्जा देऊन जातो.

उत्तरा केळकर

uttarakelkar4@gmail.com