स्टुडिओत येताना तारामती एखाद्या महाराणीसारख्या येत. दागिन्यांनी नखशिखांत मढलेल्या असत. गाडीतून उतरत आणि अगदी संथ लयीत त्या स्टुडिओत येत. मग सगळ्यांचे नमस्कार, प्रेमाने स्वीकारीत. मोठे नावाजलेले वादकसुद्धा त्यांना खाली वाकून नमस्कार करीत. पण काळ बदलला आणि ..

पं. तारानाथ. गुजराती चित्रपटसृष्टीतील एक मोठं नाव! असंख्य गुजराती चित्रपट त्यांच्या गीत संगीताने नटले होते. मी त्यांना बघितलं तेव्हा ते खूप वयस्कर होते. असतील ७०/७२ वर्षांचे. पण अजूनही काम जोरात सुरू होतं. गुजराती चित्रपटातील गाण्याची सिटिंग्ज, प्रत्यक्ष रेकॉर्डिग, बॅलेसाठी डायलॉग व गाणी लिहिणं व त्यांना चाली देणं! अशा एक ना दोन भरपूर व्यापांत ते व्यग्र होते. त्यांच्या मदतनीस होत्या तारामती, त्यांच्या पत्नी, त्यांच्यापेक्षा खूप लहान होत्या त्या, साधारण पन्नाशीच्या! त्या एका नामवंत मराठी गायकाच्या कन्या होत्या. त्यामुळे गाण्याची जाण त्यांना खूपच चांगली होती. मराठी, गुजराती या दोन्ही समाजांत वावरल्यामुळे, त्या दोन्ही भाषा त्यांना चांगल्या येत.

मी माझ्या करिअरच्या सुरुवातीला काही काळ त्यांच्याकडे कोरस गायले. तारामतींचा गाण्यांच्या सिटिंगमध्येसुद्धा सहभाग असे. मग प्रत्यक्ष रेकॉर्डिगला आल्यावर, आम्हाला त्या दिवशी रेकॉर्ड होणाऱ्या गाण्याचे शब्द व उच्चार सांगणं, त्याची चाल आमच्याकडून बसवून घेणं, मुख्य गायक/ गायिका आले की त्यांचं स्वागत करणं, त्यांचं चहापाणी बघणं, त्यांना गाण्याचे शब्द देणं, मग बॅलन्सिंगसाठी रेकॉर्ड रूममध्ये जाणं व प्रत्यक्ष रेकॉर्डिग चालू असताना आमच्या बरोबर कोरसही गाणं, ही सर्व कामं त्या अगदी सहजतेने करीत. त्या हुशार आणि धूर्तही होत्या. आल्या आल्या त्यांची नजर सर्वत्र फिरत असे. कोण कसं वागतेय, कोण काय बोलतेय यावर त्यांची बारीक नजर असे. त्यांच्याबद्दल आदरयुक्त भीती वाटत असे. स्टुडिओत येताना त्या एखाद्या महाराणीसारख्या येत. अतिशय स्थूल असल्या तरी खूप गोड चेहरा होता त्यांचा! दागिन्यांनी त्या नखाशिखांत मढलेल्या असत. होतच त्यांचं ऐश्वर्य तसं! मोठ मोठे कानातले, त्याच्यावर सोन्याच्या साखळ्या, नाकाच्या दोन्ही बाजूंना चमक्या. दोन्ही हात सोन्याच्या बांगडय़ांनी भरलेले, गळ्यात वेगवेगळे, सोन्याचे किंवा हिऱ्याचे अलंकार! पायांत पैजण, अशा थाटात त्या गाडीतून उतरत आणि अगदी संथ लयीत त्या स्टुडिओत येत. मग सगळ्यांचे नमस्कार, प्रेमाने स्वीकारीत. मोठे नावाजलेले वादकसुद्धा त्यांना खाली वाकून नमस्कार करीत. त्या एका प्रसिद्ध आणि कर्तृत्ववान कलाकाराच्या त्या पत्नीही होत्या ना! कधी लताबाई, आशाताईंसारख्या मोठय़ा गायिकांना यायला वेळ नसेल, तर शूटिंगसाठी त्या माझ्याकडूनही गुजराती गाणी गाऊन घेत. त्या वेळी उच्चार, चाल त्याच सांगत. तेवढाच मलाही अनुभव मिळे. त्यांच्याकडेच या मोठय़ा गायिकांना अगदी हाताच्या अंतरावरून ऐकता आलं मला आणि गाण्याचं सोनं करणं म्हणजे काय ते कळलं. डिसेंबर/ जानेवारीत गुजराती समाजाचे बॅले असत. नटनटय़ा नुसते अ‍ॅक्शन व हावभाव करीत. पण स्टेजच्या एका बाजूला काळोखात आम्ही गाणारे व संवाद बोलणारे बसत असू. प्रत्येक वेळी तारामती मला त्या बॅलेसाठी सोलो गाणी देत. त्यांच्यामुळेच तर गुजरातीत सोलो गाण्याची संधी मला मिळाली.

२-३ वर्षांनी मी कोरस सोडलं. पण त्यांचं काम मात्र जोरात सुरू होतं. तारानाथजी आता खूप थकले होते. एके दिवशी अचानक त्यांच्या निधनाची बातमी आली. दोन दिवसांनी मी तारामतींना भेटायला गेले. सगळी रयाच गेली होती त्यांची! पांढऱ्या साडीत, शून्यात बघत त्या बसल्या होत्या. पार खचून गेल्या होत्या त्या! मग थोडय़ाच काळात त्यांनी दुसरं लग्न केल्याचं कळलं. एके दिवशी अचानक त्या मला दादरला आमच्या सोसायटीबाहेर भेटल्या. मला म्हणाल्या ‘‘उत्तरा! मी दुसरं लग्न केलं. तुझ्यापासून १० मिनिटांच्या अंतरावर राहते मी. ये ना कधी तरी माझ्या घरी!’’ मी हो म्हटलं. पण काही दिवसांनी मीच त्यांना व त्यांच्या बहिणीला चहाला माझ्या घरी बोलावलं. मग खूप गप्पा, हसणं, जुन्या आठवणी निघाल्या. बरं वाटलं. मला नाव मिळाल्यामुळे त्यांनी माझं खूप कौतुक केलं! काही काळानंतर माझ्या कानावर आलं. या दुसऱ्या संसारात त्या सुखी नाहीत. दुसरा नवरा छळ करतो त्यांचा. मला काही त्यांच्या घरी जाण्याचं धैर्य झालं नाही!
मग अचानक एके दिवशी आकाशवाणीच्या एका सहकाऱ्याने मला सांगितलं, ‘अगं तारामतींना त्या दुसऱ्या नवऱ्याने पूर्ण लुबाडलं. घरातून बाहेर काढलं त्यांना. अगदी कंगाल झाल्या आहेत त्या आणि आता त्या इथे राहतही नाही. त्यांची परिस्थिती फार बिकट आहे. मुंबई सोडली त्यांनी आणि आता दिल्लीतल्या रस्त्यावर भीक मागत हिंडतात त्या.’

माझा कानांवर विश्वासच बसेना. धक्काच बसला मला. एवढी शोकांतिका! एकेकाळी महाराणीसारखी वावरणारी ही बाई आता भिकारीण? छे! कल्पनाच करवेना मला. शेवटी म्हणतात ना. लक्ष्मी ही चंचल असते! पण इतकी चंचल की एखाद्या व्यक्तीची एवढी फरफट व्हावी..
(पं. तारानाथ आणि तारामती यांची नावे बदललेली आहेत.)

गुरुदक्षिणा
तो बहुतेक रोटरी क्लबतर्फे माझा कार्यक्रम असावा. सुमारे चाळीस एक मिनिटं गाऊन मी मागच्या बाजूच्या खोलीत येऊन बसले. आता परत स्टेजवर जायला निदान अर्धा तास तरी होता. कोचावर बसते, तोच साधारण ६०-६२ वर्षांच्या एक बाई मला भेटायला आल्या. त्यांनी विचारलं, ‘‘व्हिक्टरी क्लासेसचे मालक केळकर, त्यांच्या तुम्ही सूनबाई ना?’ मी ‘हो’ म्हटलं.. आणि त्या आपली कहाणी सांगू लागल्या.
‘‘माझं लहानपण गिरगावात गेलं. तिथे तुमच्या सासऱ्यांचे ‘व्हिक्टरी क्लासेस’ जोरात चालू होते. कित्येक वेळा क्लास तुडुंब भरल्यामुळे मुलांना बसायलाही जागा नसायची. काही जण तर उभं राहूनसुद्धा केळकर सरांचं इंग्लिश ऐकत राहायचे. होतच त्यांचं शिकवणं तसं!’’
‘‘जून महिन्याची सुरुवात होती आणि प्रवेशासाठी भली मोठी रांग लागली होती. फीचे पैसे गोळा केले जात होते. केळकर सर सर्वत्र नुसती नजर ठेवून होते. इतक्यात त्या रांगेच्या बाजूला दोन तास ताटकळत उभ्या असलेल्या मला सरांनी हेरलं आणि बोलावून विचारलं, ‘कोण तू? काय काम आहे?’ मी संकोचून म्हटलं, ‘ही लाइन संपू दे मग मी बोलते.’ त्यावर सर म्हणाले, ‘अगं, ही रांग आता अशीच खूप वेळ चालू राहील. बोल तू!’ मग माझा नाइलाज झाला. मी त्यांना सांगितलं, माझे वडील नुकतेच वारले. आई काही तरी छोटी-मोठी कामं करते आणि मला व माझ्या धाकटय़ा तीन भावंडांना सांभाळते. मला तुमच्याकडे शिकायचं आहे. पण फीचे पैसे द्यायला मला परवडणार नाही. यावर ते म्हणाले, ‘ठीक आहे, नको भरू तू पैसे. उद्यापासूनच यायला लाग आणि हो तुझ्या बाकीच्या भावंडांनाही घेऊन ये. तीसुद्धा इथे शिकतील. पैसे नकोत, पण दांडय़ा न मारता शिकलं मात्र पाहिजे.’ हे ऐकल्यावर मी एकदम खूश होऊन गेले. त्यांच्याकडे शिकत मी चांगल्या मार्कानी पास होऊन मॅट्रिक झाले व लगेच नोकरीला लागले. धाकटय़ा भावंडांना शिकवायचं होतं ना!’’

‘‘मॅट्रिक झाल्यावर मी दोन स्टीलची छोटी पण जाड अशी पातेली विकत घेऊन सरांना भेटायला गेले. फूल नाही पण फुलाची पाकळी! सरांनीसुद्धा ती प्रेमानं स्वीकारली. आज माझं लग्न होऊन खूप र्वष झाली आहेत. खूप शिकलेला आणि मोठय़ा हुद्दय़ावर असलेला नवरा मिळाला मला.  दोन्ही मुले इंजिनीअर, सुना, नातवंडं असा परिवार आहे. आज माझी आर्थिक स्थिती उत्तम आहे. पण त्या वेळचे दिवस आठवले की अंगावर शहारा येतो नुसता! पण तुमचे सासरे मात्र खंबीरपणे आमच्या पाठीशी राहिले. कसलीही अपेक्षा न करता. म्हटलं, सरांची भेट नाही होणार आता, पण निदान त्यांच्या सुनेला तरी भेटावं. म्हणून आवर्जून तुम्हाला भेटायला आले.’’
तिची कहाणी ऐकून माझे डोळे पाणावले. मी त्या बाईंना म्हटलं की, ‘‘आता माझं ऐका! सासरे गेल्यावर, लोणावळ्याचा बंगला त्यांनी मला दिला. तिथल्या संसारात ती तुम्ही दिलेली ती दोन छान पातेली आज, पन्नास वर्षांनंतरही आहेत आणि आता ती मी वापरते..’’ आता त्या बाईंचे डोळे पाणावले, पण आनंदाने ..

उत्तरा केळकर यांचा  मो.क्र. – ९८२१०७४१७३