‘‘श्रीकांतजी म्हणजे अनेक कलांच्या पसाऱ्यात रमणारे एक मनस्वी कलावंत होते. मला गाणं शिकवताना पंजाबी ढंगाच्या हरकती, त्यांच्या तोंडून अशा काही निघत की, मोठय़ा प्रयासानेसुद्धा मला त्या जमत नसत. त्यासाठी ते पंचवीस/ तीस वेळासुद्धा त्या जागा म्हणायला कंटाळत नसत आणि हो, चिडतही नसत. पाच मिनिटं जरी यायला उशीर झाला, तरी मला धारेवर धरणारे श्रीकांतजी दुसऱ्या मिनिटाला राग विसरून गाणं शिकवण्यात गुंग होऊन जात..’’ २७ जून हा श्रीकांतजी ठाकरे यांचा जन्मदिवस त्यानिमित्ताने जागवलेल्या त्यांच्या आठवणी.

‘दूरदर्शन’चे दिवस होते ते! त्या वेळी ‘दूरदर्शन’ ही एकच वाहिनी होती, त्यामुळे तिला खूप महत्त्व होतं. पाश्र्वगायनाच्या क्षेत्रात माझी काही र्वष उलटून गेली होती. एके दिवशी संगीतकार श्रीकांतजींचा (श्रीकांत ठाकरे) मला फोन आला. ‘‘दूरदर्शनवरच्या ‘आरोही’ कार्यक्रमासाठी गाणं करतोय. त्यातली एक लोरी तू गायचीस, पलकोंकी पालकी में, निंदिया रानी झुला झुले.’’ मी लगेच ‘हो’ म्हणून टाकलं. ‘‘माझ्याकडे गायचं म्हणजे भरपूर रिहर्सल्स करायला लागतील,’’ ते म्हणाले. मी नम्रपणे फक्त ‘हो’ म्हटलं. मग तालमीच्या निमित्तानं, त्यांच्याकडे जायला लागले. एक दिवस धीर करून मी त्यांना विचारलं, ‘‘श्रीकांतजी, मला हिंदी गाणी शिकवाल का?’’ गीत, गझल, भजन ते उत्तमरीत्या करीत असत. त्यांचा उर्दूचा व्यासंग बघून मी थक्क होई. कित्येक वेळा संपूर्ण गाणं ते उर्दूमध्ये सुवाच्य अक्षरात लिहून काढीत. मग तेच गाणं हिंदीतही सुरेख अक्षरात लिहून काढीत आणि हे सर्व करताना ते खूप आनंदी असत. शिकवताना पंजाबी ढंगाच्या हरकती, त्यांच्या तोंडून अशा काही निघत की, मोठय़ा प्रयासानेसुद्धा मला त्या जमत नसत. पण मी सातत्याने प्रयत्न करीत राही. त्यासाठी ते पंचवीस/ तीस वेळासुद्धा त्या जागा म्हणायला कंटाळत नसत आणि हो, चिडतही नसत. पाच मिनिटं जरी यायला उशीर झाला, तरी मला धारेवर धरणारे श्रीकांतजी दुसऱ्या मिनिटाला राग विसरून गाणं शिकवण्यात गुंग होऊन जात. शिकवलेली कित्येक गाणी त्यांनी माझ्याकडून रेकॉर्डिग्जसाठीही गाऊन घेतली. मोठमोठय़ा कलावंतांचं त्यांच्याकडे येणंजाणं असे, तरी ओळख झाल्यापासून जवळजवळ प्रत्येक कॅसेटमध्ये किंवा इतर कमर्शियल रेकॉर्डिग्जमध्ये ते मला आवर्जून गायला बोलावीत. कधी कधी गाणं शिकवताना रेकॉर्डिग्ज मला ऐकवीत. एकेक जागा रिवाइंड करून परत परत मला ऐकवीत. त्यातली सौंदर्यस्थळं दाखवीत. कधी ‘सामना’ किंवा ‘मार्मिक’मध्ये लिहिलेलं चित्रपटाचं ताजं परीक्षणसुद्धा ऐकवीत.
श्रीकांतजी म्हणजे अनेक कलांच्या पसाऱ्यात रमणारे एक मनस्वी कलावंत होते. अनेक विषयांत त्यांना गती होती. त्यांना काय येत नव्हतं? गाण्यांच्या चाली तर ते करतच. पण त्याशिवाय सतत त्यांचं लेखन चालू असे. ते उत्तम चित्रकार, व्यंगचित्रकार होते. व्यंगचित्रकारासाठी लागणारी सूक्ष्म निरीक्षणशक्ती त्याच्याकडे होती. होमिओपॅथीचा त्यांचा चांगला अभ्यास होता. व्हायोलीनसारखं कठीण वाद्यं ते छान वाजवीत असत. प्रत्येक ठिकाणी त्यांची सौंदर्यदृष्टी दिसून येई. आपली पुस्तकं, आपली वाद्यं, आपला टेपरेकॉर्डर, आपल्या कॅसेट्स यांची ते खूप काळजी घेत. नवीन चाल दिलेला गाण्याचा कागद तर एखादा दागिना दाखवावा, तशा नजाकतीत ते मला दाखवीत आणि म्हणूनच स्वरदेवता त्यांच्यावर प्रसन्न होती. स्वरांच्या दुनियेत ते स्वत:ला हरवून बसत. त्यामुळेच बाहेरच्या व्यावसायिक दुनियेशी त्यांचा जराही संबंध नव्हता. मी त्यांना कित्येक वेळा सांगे, ‘‘श्रीकांतजी, तुमच्या तत्त्वांना थोडी मुरड घाला ना, कित्येक रेकॉर्डिग्ज तुमच्याकडे चालत येतील.’’ पण शेवटी ते ठाकरे होते. हार जाणारे नव्हते. म्हणायचे, ‘‘मी थोडं काम करीन पण माझ्या पद्धतीने आणि तब्येतीत करीन.’’ आणि खरंच. जी काय रेकॉर्डिग्ज ते
करायचे, ते अगदी जीव ओतून करीत. आपल्याला त्या सर्वातून आर्थिक फायदा काय होईल, किंवा किती नाव, प्रसिद्धी मिळेल याचा विचार त्यांनी कधीही केला नाही.
खरं तर श्रीकांतजी खूप लोकांत रमणारे नव्हतेच, किंबहुना गर्दीपासून ते लांबच राहात. मात्र आपल्या घरातल्या लोकांवर त्यांचा फार जीव! जयूला (त्यांची मुलगी) मुलगा झाला, तेव्हा ते ठाण्यात होते. मला त्यांचा फोन आला आनंदी स्वरात ते म्हणाले, ‘‘अगं, मला नातू झाला, त्याला बघायला तू ठाण्याला ये ना!’’ मी लगेचच ठाण्याला गेले. छोटय़ा बाळाच्या आगमनाने ते अगदी हरखून गेले होते. कुठल्याही गोष्टीने आनंदित किंवा दु:खी झाले की ते लागलीच मला फोन करीत. फोनवर ते कधीच आपलं नाव सांगत नसत. नुसतं ‘हं’ म्हणत. कधी माझ्या नवऱ्याने फोन घेतला तर गमतीनं तो मला सांगे- ‘हं’ यांचा फोन आहे. लवकर घे.’ कधी नवी चाल सुचली म्हणून फोन तर कधी एखादी जुनी चाल आठवत नाही म्हणून फोन! कधी माझं एखादं गाणं टीव्हीवर बघितलं म्हणून कौतुकाचा फोन, तर कधी ‘काय गं, हल्लीच्या या चाली असतात’ म्हणून वैतागलेला फोन!
राजावर(राज ठाकरे)सुद्धा त्यांचा विलक्षण जीव! एकदा शिवसेनेने कुठल्या तरी निवडणुकीच्या प्रचाराची कॅसेट काढली होती. त्यात छोटी, छोटी गाणी होती. काही गाणी मी गायले होते. एक गाणं राजाही गायला होता. लागलीच मला श्रीकांतजींचा फोन. ‘‘उत्तरा! आधी ये आणि राजा कसा गायलाय ते ऐक. संगीत क्षेत्राशी संबंध नसतानासुद्धा किती सुलभ आणि एक्स्प्रेशनने गायलाय तो!’’ आणि त्यांचं म्हणणं खरंच होतं. मध्यंतरी राजचं नेहरू सेंटरला व्यंगचित्रांचं प्रदर्शन भरलं होतं. लगेच श्रीकांतजींचा मला कौतुकाचा फोन. ‘‘उत्तरा, जरा नेहरू सेंटरला जा आणि माझ्या राजाचं प्रदर्शन पाहून ये. काय जादू आहे माझ्या पोराच्या हातात!’’ आणि खरोखरच ते प्रदर्शन खूप गाजलं! कुंदाताईंना (त्यांच्या पत्नी) अपघात झाल्यावर तर व्याकूळ स्वरातला त्यांचा फोन. ‘‘अगं, कुंदाला एक स्कूटरवाल्यानं उडवलं आणि तिला हिंदुजामध्ये अॅडमिट केलय. तू हिंदुजाला ये.’’ हिंदुजात, आय.सी.यू.मध्ये नेहमीच्या उत्साही, हसऱ्या कुंदाताई निपचित, अगतिक होऊन पडल्या होत्या. त्यांना तशा अवस्थेत बघून श्रीकांतजींचा जीव वरखाली होत होता. मी आल्यावर लागलीच ते कुंदाताईंना म्हणाले, ‘‘कुंदा! मी काय म्हटलं तुला, माझी शागीर्द येणार म्हणजे येणारच!’’ कुंदाताई त्यांच्याबरोबर शेवटपर्यंत सावलीसारख्या राहिल्या. जितक्या आपुलकीनं श्रीकांतजींनी मला गाणं शिकवलं, तितक्याच आपुलकीनं कुंदाताईंनी मला घरी खाऊ घातलं. त्या खरोखरच सुगरण आहेत. आधी छोटय़ा साध्या घरात राहत होत्या, म्हणून मी त्यांना दु:खी बघितलं नाही, की आता आलिशान घरात राहतात, म्हणून मी त्यांना आनंदानं हुरळून गेलेलं बघितलं नाही. या नव्या घरातही, त्या पूर्वीसारख्याच आनंदी, उत्साही राहून पाहुण्यांचं स्वागत करताना दिसतात.
जाण्याच्या अगोदर, शेवटच्या दोन वर्षांत श्रीकांतजींची तब्येत खूप खालावली. मधून मधून ते हॉस्पिटलमध्ये असत. फोनही कमी व्हायला लागले. जाण्याआधी दोन महिने आधी त्यांचा मला फोन आला- ‘‘उत्तरा! नवीन चित्रपट करतोय, ‘महानदीच्या तिरावर’ आणि मुहूर्ताचं गाण तू गायचंस. ठाऊक आहे ना? माझं गाणं म्हणजे चार-पाच तरी रिहर्सल करायला लागतील.’’ मी हसून म्हटलं, ‘‘तुमचं समाधान होईपर्यंत मी रिहर्सल करीन.’’ सगळ्या रिहर्सल त्यांच्या जुन्या घरात झाल्या. त्यांनी गाणं शिकवलं, चाल सांगितली. पण नेहमीचा उत्साह त्याच्यात नव्हता. पेटीवरची बोटं थरथरत होती. मधून मधून त्यांना दम लागत होता. त्यांची अवस्था मला बघवत नव्हती. चाल शिकल्यावर मी त्यांना म्हटलं, ‘‘श्रीकांतजी, चाल शिकवून झाली. आता तुम्ही बिलकूल टेन्शन घेऊ नका. पुढचं म्युझिक बसवणं वगैरे सर्व गोष्टी अनिल मोहिले करतील.’’ आजारी असतानासुद्धा त्यांनी रेकॉर्डिग केलं. पण नेहमीचे हास्यविनोद करणारे श्रीकांतजी तिथे नव्हते. होतं ते फक्त शांत, अगतिक व्यक्तिमत्त्वं! गाणं ओके झालं. मी घरी गेले, बस! तीच माझी शेवटची भेट! दुसऱ्या दिवशी मी त्यांना फोन केला. रेकॉर्डिग त्यांना आवडलं होतं.
डिसेंबरमध्ये माझा एक हिंदी कार्यक्रम होता. त्या वेळी मला त्यांचा सत्कार करायचा होता. पण त्याआधीच ते गेले! त्यांचा सत्कार करण्याचं भाग्य माझ्या नशिबात नव्हतं. १० डिसेंबर २००३. दुपारीच श्रीकांतजी गेले असा फोन आला. मन सुन्न झालं! वाईट वाटलं. ते आता यापुढे त्याच्याकडे जाऊन कधीच नवी नवी गाणी शिकता येणार नव्हती.
श्रीकांतजी, तुमच्या जाण्याने माझं वैयक्तिक नुकसान तर झालंच, पण तुमचं स्वत:चंही किती नुकसान झालं. तुम्ही गेलात तेव्हा तुमची नातवंडं अगदी छोटी छोटी होती. आता ती मोठी झाली आहेत. त्यांना वाढताना तुम्हाला पाहता आलं नाही. तुमचा राज आता खूप मोठा झालाय. शर्मिलाचीही त्याला उत्तम साथ आहे. राजचं वैभव, नाव, प्रसिद्धी, भाषणं यापैकी काही काही बघायला तुम्ही थांबला नाहीत हो श्रीकांतजी..!
uttarakelkar63@gmail.com