परवा फेसबुकवर एका जुन्या मित्राचा फोटो पाहिला आणि खूप आनंद झाला आणि त्याच वेळी मन व्याकूळही झाले. कारण हा बालमित्र आता माझ्या अंगणात नाही.. तुतु..तुतु नाव त्याचे. हो मी तुतु म्हणजे मलबेरी या झाडाबद्दल बोलत आहे.

फळ झाडाला आल्यापासून तर ते पिकेपर्यंत तीन रंगांचे आणि तीन भिन्न चवीचे होत जाते. कच्चे असताना हिरवे-तुरट चवीचे, पिकायला लागले की लालचुटूक आंबटगोड आणि पूर्णपणे पिकल्यावर गडद जांभळा किंवा काळ्या रंगाचे आणि रसाळ गोड चवीचे. किती अद्भुत ना हे इटुकलसं फळ. आजीच्या वडिलांनी तिला दिले होते याचे रोपटे आणि माझ्या पिढीपर्यंत आम्ही या आंबटगोड फळाची मज्जा घेतली. खरंतर हे झाड थंड वातावरणात वाढते, म्हणजे विचार करा माझे गाव (तळेगाव दाभाडे) किती थंड आणि प्रदूषणमुक्त असेल काही वर्षांपूर्वी. आता हे झाड जास्तकरून महाबळेश्वरला पाहायला मिळेल आणि रोपटे मिळाले तरी ते जगेल की नाही यात शंकाच आहे.

आमच्या वाडय़ात म्हणजेच घराच्या मागच्या अंगणात तुतुसारखे अजूनही खूप वृक्षमित्र होते. प्रामुख्याने फळझाडांमध्ये जांभूळ, रामफळ, सीताफळ, डािळब, पेरू, चिक्कू, मोसंबी, इडिलबू, पपई, इत्यादी; तर मोगरा, जास्वंदी, गुलाब इत्यादी फुलराण्याही होत्या. तसेच अळूची पाने, गवती चहा हेही होते.

इतकी टपोरी, काळीभोर रसरशीत जांभळं अजूनपर्यंत बाजारात बघायला मिळाली नाही. आकडीने जांभळाचे घड हलवायचे आणि चादरीची टोके धरून जांभळाचे घड झेलायचे. टपोऱ्या टपोऱ्या जांभळाचा घड वरून चादरीत पडताना पाहताना जो आनंद व्हायचा तो आनंद कशात नाही. सिझनमध्ये तर वाडय़ातल्या जमिनीवर जांभळ्या रंगाचा सडाच पडायचा. अक्षरश: जांभळे चालताना पायाखाली यायची.

जास्वंदीच्या फुलांपासून आई जास्वंदीचे तेल करायची. याची सर मोठय़ा पार्लरमधील हेअर-स्पालापण नाही येणार. सकाळच्या कोवळ्या उन्हात मी आणि आजी रोजची परात भरून मोगऱ्याची फुले तोडायचो. रात्रीच्या काळोखात ही पांढरी शुभ्र फुले झाडावर चांदण्या बसल्या की काय अशीच भासायची.

या सगळ्यांमध्ये रामफळाचे झाड फार जुने होते. आजोबांच्या आईने ती तरुण असताना हे झाड लावले होते. वृद्धापकाळामुळे आजारी पडली त्या वर्षी या झाडाला इतकी जास्त फळे आली की  तिला भेटायला आलेल्या सर्व नातेवाईकांना रामफळे भरलेली पिशवी मिळाली. सांगायचा उद्देश असा की प्रत्येकाच्या आठवणीत राहतील इतकी जास्त रामफळे त्या वर्षी झाडाला आली. ती गेल्याच्या पुढच्या वर्षीपासून या एवढय़ा मोठय़ा झाडाला फळे यायचीच कमी झाली.. योगायोग का? की झाडालाही भावना असतात?

या सर्व वृक्षमित्रांनी आम्हाला खूप काही भरभरून दिले. स्वच्छ प्राणवायू, थंडगार हवा, गोड गोड फळे, सुगंधित फुले, शीतल सावली आणि कधीही न विसरता येणाऱ्या घट्ट बालपणीच्या आठवणी. याच झाडांखाली बसून कितीतरी वेळा अंगतपंगत केली. हा झाडांनी भरलेला वाडा कधी आमचा पिकनिक स्पॉट होता, कधी वाढदिवसाच्या पार्टीचा हॉल, तर कधी चक्क ओपन किचन. मे महिन्याच्या सुट्टीत मत्रिणींबरोबर आतुकली-भातुकलीही याच वाडय़ात व्हायची आणि दिवाळीच्या सुट्टीतही याच वाडय़ात घरकुल बांधून खेळायचे.

या सर्व आठवणीत रमता रमता असे उमजले की या सर्व वृक्षमित्रांमुळे आणि त्यांना वाढविण्यासाठी, जगविण्यासाठी माझ्या आधीच्या पिढीने घेतलेल्या कष्टांमुळे माझे बालपण किती समृद्ध झाले आणि आताच्या नवीन पिढीपेक्षा किती वेगळे अनुभवायला मिळाले. निदान लहानपणी तरी मला ‘पेस्टिसाइड फ्री’ फळे खायला मिळाली. पण एवढय़ावरच समाधान मानणे ही किती केविलवाणी गोष्ट आहे ना.

फ्लॅट सिस्टीममुळे आता आपण इच्छा असूनसुद्धा मोठी झाडे लावू शकत नाही आणि आजकालच्या कॉम्पिटिशनच्या युगात नोकरी करत असताना आधीच्या पिढीसारखे एकाच जागेवर पिढय़ान्पिढय़ा राहणेही अवघड झाले आहे. मग काय आपण काहीच करू शकत नाही? शकतो.

झाडे लावण्यासाठी अंगण नसेल तर संत ज्ञानेश्वरांनी म्हटल्याप्रमाणे ‘हे विश्वची माझे घर’ असे मानून जी काही झाडे निसर्गात आहे ती तरी वाचविण्याचा प्रयत्न करू शकतो. त्यासाठी कागद, इलेक्ट्रिसिटी, पाण्याचा कमीत कमी कसा वापर करता येईल आणि प्लास्टिक, धोकादायक केमिकल्स इत्यादींचा वापर कसा आपल्या दैनंदिन जीवनात टाळता येईल याचा प्रत्येकाने विचार करून एक लिस्ट करायला हवी आणि त्यानुसार वागायला हवे, त्यामुळे झाडे जगविण्यासाठी हातभार लावल्याचे समाधान नक्की मिळेल.
आरती सुमेश – response.lokprabha@expressindia.com