प्रवासात अनेक चेहरे भेटतात. त्यांच्याशी संवाद साधला तर आपण किती सुखात आहोत, तरीही माणूस म्हणून किती शून्य आहोत, याचा प्रत्यय येतो. आजचाच अनुभव. खूप काही शिकवून जाणारा.

आजच्या आत्मकेंद्रित जगात अल्पशिक्षित असूनही त्यागाचे जीवन जगणारा ‘संदेश’ भेटला. आदिवासी मुलगा. वय साधारण २१ वष्रे. आज विरार स्टेशनकडे बाईकवर प्रवास करीत असताना त्याने रस्त्यात हात केला व लिफ्ट मागितली. मी संवाद साधला. तो आपल्या घरी डहाणूकडे निघाला होता. गावात एका कारखान्यात कामाला होता. दिवसाची २५० रु. मजुरी.

मी त्याला अजून बोलतं केलं. आठवीपर्यंत शाळा झालेली. मग कुटुंबाची जबाबदारी पडल्याने शाळा सोडावी लागली. दर महिन्याला पाच हजार रुपये तो गावी पाठवतो. स्वत:चं शिक्षण न झाल्याचं क्षल्य उरी असूनही आज छोटा भाऊ दहावीत शिकत असल्याचं समाधान त्याच्या बोलण्यातून जाणवत होतं.

कुटुंबाचं भल व्हावं म्हणून राबणारा, दोन वेळ डाळ-भात खाणारा अन् फक्त रविवारी भाजीची चव चाखणारा संदेश ‘माणूस’ म्हणून खूप ग्रेट वाटला. रस्त्यात त्याने गाडी थांबवायला सांगितली. देवदर्शनासाठी त्याला मंदिरात जायचे होते. बहुतेक त्याच्या संघर्षांचं बळ श्रद्धेत असावं.  मला मंदिरात न जाताही देव भेटला होता, माणसाच्या रूपात.

छोटी छोटी माणसंसुद्धा किती मोठा संदेश देऊन जातात ना? फक्त संवाद हवा.
response.lokprabha@expressindia.com